भोग आणि ईश्वर २१४
शुद्ध भक्तियोग साधण्याच्या मार्गातील मुख्य शत्रू क्रोध नियंत्रित करण्यासाठी काय काय करावं,हे आपण पाहिलं आहे. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, श्रीमद्भगवद्गीतेत श्रीपुरुषोत्तम, अर्जुनाला सांगताना क्रोधात भवति संमोहात ....... अशी सुरवात का करतात. कारण क्रोधाइतका बलवान आणि तितकाच घातक असणारा दुसरा शत्रू काम, यावर प्रभूंनी अध्याय ३ श्लोक ३७ ते ४२ मध्ये विस्तृत कथन केलेलं आहे. अध्याय ३, ३७ व्या श्लोकात भगवंत म्हणतात की,
श्रीभगवानुवाच
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विद्धयेनमिह वैरिणम् ॥
यापुढे ४२ व्या श्लोकापर्यंत, अजून विस्ताराने भगवान श्रीकृष्ण यांनी, यावर भाष्य करताना, जे सांगितलं त्याचं विश्लेषण करू. त्रिगुणात्मक प्रकृतीयुक्त देहाच्या रजो गुणातून हा काम उत्पन्न होतो. देहाच्या वासनांचा हा अधिकारी आहे आणि क्रोधाची प्रथम पायरी. तसे क्रोध हा अनेक गोष्टींपासून उत्पन्न होतो, पण कामवासनेने उत्पन्न होणारा क्रोध हा अति घातक आहे.
यावर विस्ताराने कथन करताना ते म्हणतात की, काम हा देह, बुद्धी व मन या तिन्ही ठिकाणी वास करून असतो आणि याच्या पोटी अनेक इतर वासना जन्म घेतात. हा मुळातच कधीही न शमणारा अग्नी आहे. ज्यामध्ये कितीही आहुत्या पडल्या तरीही, हा अग्नी सतत चेतलेलाच राहतो.
हा बुद्धीचा नाश करतो आणि मनाची शक्ती क्षीण करून, आत्म्याला या सर्वांचा उत्तराधिकारी करतो. हा जन्मो जन्मी कधीही शांत होत नाही. हा विषयाला मनात व बुद्धीत सतत जागृत ठेवून, ज्ञानी मनुष्याच्या ज्ञानाला ग्रासून, त्या ज्ञानासह त्या व्यक्तीचा आत्मघात करूनही शमत नाही. याच्या कर्मफळामुळे मनुष्य अनेक भोगांचा धनी होतो. ते भोग भोगूनसुद्धा हा कामरूप अग्नी प्रज्वलितच राहतो.
म्हणून कोणत्याही अध्यात्ममार्गी मनुष्याला सर्वात प्रथम या वृत्तीवर नियंत्रण मिळवून, या अवगुणाचा सर्वप्रथम त्याग केला पाहिजे. यावर नियंत्रणप्राप्ती ही मनाला व बुद्धीला योग्यप्रकारे योग्यवेळी विषयातून निवृत्त करून, त्या मनाची, बुद्धीची व आत्म्याची सर्व शक्ती ईश्वर चिंतना मागे, अर्थातच नामस्मरणामागे, योग्य प्रकारे लावावी वा वळवावी.
उपयुक्त क्रोध हा धर्मकार्यार्थ, प्रत्यक्ष भगवंतांनीसुद्धा योग्य व प्राप्त परिस्थितीत उपयोगात आणला आहे. अर्थात तो सात्विक संताप होता,जो रिपू दमनार्थ व जनरक्षणार्थ गरजेचा होता. परंतु वासनेचा हा कामरूप शत्रू कधीही उपयुक्त नव्हता आणि नसणार. म्हणूनच भगवंतांनी अर्जुनाला हा मंत्र दिला की, हा काम मन, बुद्धी यामध्ये वास करून असतो आणि इंद्रियांना वापरून आपला अग्नी शांत करून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तरीही हा शांत होत नाही. परंतु अति झाल्यास हा लोकलज्जेचा धनी बनवतो.
म्हणूनच सर्वात प्रथम इंद्रियांवर नियंत्रण अथवा विजय प्राप्त करून, त्याद्वारे, विषयाला बुद्धी व मन यातून नष्ट कर, असंही प्रभू सांगतात. पण यासाठी उपाय काय. तर, यासाठी अनेक संकल्पांसह स्वस्त्री व्यतिरिक्त बाकी सर्व स्त्रिया या पूज्य व माताभगिनीसम मानणं. हेच स्त्रियांना सुद्धा लागू आहे. याशिवाय नियम क्रमांक दोन म्हणजे योग्य वयामध्ये या चारपैकी एका पुरुषार्थातून निवृत्त होऊन, वैराग्याकडे मनोवृत्ती वळवणे.
या कामरूप चिरंजीव गुणाला, अवगुणात परिवर्तित होऊ न देणं आपल्या हाती आहे. त्यासाठी बुद्धी आणि मन यांनी योग्य व सकारात्मक विचार करून, जितके आपल्या अधिकारात प्राप्त झालं, तितकंच आपलं दान होतं, हा भाव दृढ करून, मनाला योग्यवेळी व योग्यप्रकारे बांध घालणं अत्यंत जरुरी आहे. कारण या जगात, योग्य ते जिंकतं आणि अति होता सर्व कार्य नाश पावतं.
भक्तीच्या प्रांगणात जाताना आणि चित्तशुद्धी प्राप्त करताना, दोन महत्वाच्या शत्रूंबद्दल आपण बोललो. पण भक्तियोगावर अजून लिहायचं बाकी आहे. म्हणून उद्या चर्चा पुढे सुरू ठेवू. तोपर्यंत नामात रहा, मनाला एकच छंद उत्तम आहे, तो म्हणजे नामाचा, तोच जडवून घ्या.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले दहा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०२/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment