भोग आणि ईश्वर २४१
नामाच्या सुक्ष्मरूपातून विशालरूप ईश्वराला प्राप्त करण्याच्या प्रयत्नात, सर्वात महत्वाचं साधन असलेलं नाम, घेत असताना, आपण त्यात हरवून जाणं महत्वाचं आहे. यात भाव असावा की नसावा हा मुद्दा इथे सध्या चर्चेत गौण ठरवू. कारण ते नाम इतकं सात्विक, शुद्ध आणि पवित्र आहे की, विरुद्ध भावाने जरी ते नाम घेतलं तरी, कर्मफल देऊनही, ते नाम उद्धार करतं याचं मोठं उदाहरण म्हणजे लंकापती रावण.
माता सीतेचं हरण केल्यानंतर, प्रत्यक्ष श्रीराम लंकेत दाखल झाल्यापासून, प्रत्येक क्षण श्रीरामाची भीती, छाया व त्याद्वारे माया रावणाच्या मनात आणि बुद्धीवर आरूढ झाली. मायेचा प्रभाव इतका विलक्षण असतो आणि कार्य बरोबर विपरीत घडतं वा घडवलं जातं. म्हणजे ती बुद्धीला उलट फिरवते, या तत्वानुसार, क्षणक्षण वाटणाऱ्या भीती, राग, द्वेष, दंभ, अहं या सर्व अवगुणांनी युक्त रावण, मनातच नव्हे तर जिव्हेने व सुप्तमनातूनसुद्धा श्रीरामांच्या नामाचा जाप करत असे.
कर्म अत्यंत हीन दर्जाची असल्यामुळे, त्याच्या प्रभावाने मृत्यूचं शासन मिळणं क्रमप्राप्त होतच. पण या नामाच्या विलक्षण प्रभावाने, मृत्यू साक्षात श्रीरामांच्या हातून आला. जेंव्हा श्रीमहाविष्णू अवतार व त्यांच्या मार्फत, एखाद्याला मृत्यू प्राप्त होतो, तेंव्हा त्या आत्म्याला नेण्याची हिम्मत प्रत्यक्ष यमराजसुदधा करत नाहीत. त्यामुळे प्रमादांचं शासन मिळूनही, अखंड श्रीरामनाम आणि चिंतन यामुळे मोक्षप्राप्ती झाली. याचप्रमाणे मरामरा असा जप करूनही, सततच्या जपामुळे मरामरा हे रामनामात परिवर्तित होऊन, वाल्या कोळ्याचं परिवर्तन वाल्मिकी महर्षींमध्ये झालं.
म्हणजेच नित्य नाम घेण्याचा परिणाम, प्रभुकृपेचा प्रसाद प्राप्त होण्यात होतो हे नक्की. अहं धरून ते घेतल्यामुळे रावणाला देह सोडून, शासन देऊन, श्रीचरणांशी स्थान मिळालं आणि सर्व समर्पण करून, शरणागत झाल्यामुळे त्याच राक्षस कुळातील विभीषणाला तेच श्रीचरण सदेह प्राप्त झाले. म्हणजे ज्या भावाने नाम घेऊ, त्या भावाने त्या नामात दडलेली, ईश्वरी शक्ती, त्या भावाची फाईल उघडून, ते विशालहृदयी कृपाळू चरण प्राप्त करून देते, हे यातून सिद्ध होत.
म्हणजेच नाम घेताना किंवा नामाची झिप फाईल अन झीप करताना, जे भाव असतील, त्या भावाचं फल प्राप्त होऊन, ईश्वरचरण योग साधला जातो. मग कर्म फलाचं काय, हा एक मुद्दा शिल्लक राहतो. याबाबत असं म्हणता येईल की, मुळात नाम हे आत्म्याला अर्थात या देहातील चैतन्याला परम चैतन्याशी भेटवून देणार असल्यामुळे आणि एकदा नाम धारण केल्यानंतर, देहाला देहाच्या गतीवर व प्रारब्धावर सोडून, नाम सुरू केल्या नंतरची सर्व कर्म ही ईश्वरार्पण भावाने केल्यास, पुढील गतीची जबाबदारी ही आपली राहात नाही.
म्हणजेच शरणागत व समर्पण भावाने नाम घेत गेल्यास, त्या समर्पणाच्या समिधेत, कर्मफल जळून जातं. तसा दाखला संतमहंतांच्या आयुष्यात सापडतो. दुसरं असं की, प्रारब्धाचा धोका व जोर, हा फक्त देहापुरता असल्या मुळे, जर नाम घेत असल्यामुळे, देहाचा मोह वर्ज्य झाला असेल, अर्थात देहाबद्दल वैराग्य आलेलं असेल तर, देहाच्या भोगांची चिंता ईश्वरालाच अर्पण करून, फक्त नामी राहणं हे आपल्या हातात आहे, इतकाच भाव दृढ धरावा.
म्हणजेच आपण सर्वभावरहित होऊन किंवा सर्व भावांचा त्याग करून, फक्त नामासाठीच नाम घेतलं पाहिजे. नामा साठी भाव, या एका भावात सर्व भाव वजा करावे.म्हणजे नामाची बेरीज आणि अन्य सर्व भावांची वजाबाकी करत, नाम घेत गेल्यास, देहाच्या इच्छा नाम स्मरणामध्ये येऊ शकणार नाहीत. म्हणून दृढतेने, भाववर्जित होऊन, नाम घेत गेल्यास, चित्तशुद्धी आपोआप साध्य होते, हा मोठा लाभ यातून प्राप्त होतो.
भावविरहित वा भाव वर्ज्य करून म्हणजे नक्की काय, यावर उद्या चर्चा करूया. पण तोपर्यंत नाम घेतच रहा, त्यानेच सर्वप्राप्ती होईल.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२९/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment