भोग आणि ईश्वर २२५
नामाकरता मनाची तयारी कशी असावी, म्हणजे मूळ माती कशी असावी जेणेकरून, येणारं नामाचं पीक उत्तम येईल. कारण जितकी कसदार जमीन, तितकंच कसदार पीक, हा तर निसर्गनियम आहे. त्यासाठी सर्वात प्रथम आणि महत्वाची गोष्ट म्हणजे निष्ठा. खरतर निष्ठा हा शब्द नितिष्ठते अर्थात स्थापित होते या शब्दावरून आला असावा असा माझा अंदाज आहे. नितिष्ठते हा शब्द ष्ठा या धातूवरून आला आहे.
ष्ठा चा अर्थ स्थिर होणे हालचालरहित स्थिती येणे. तिष्ठते हे त्याचं रूप आणि त्यावरून आलेला शब्द नितिष्ठते. स्थापित होणे. पुन्हा त्यात नीती हा शब्दही आला आहेच. म्हणजे नीतीची ज्या ठिकाणी स्थापना झाली किंवा नीती जिथे स्थिर झाली, तिथे निष्ठा आली वा बसली किंवा प्राप्त झाली, असा त्याचा एक अर्थ होतो.
त्याव्यतिरिक्त निष्ठा याचा एक अर्थ आसक्ती किंवा ओढ हादेखील आहे. म्हणजेच जिथे नीती, आसक्ती वा ओढ स्थिर झाली तिथे निष्ठा स्थापित झाली. आता या सर्व विस्तृत विवेचनातून आपण नामासाठी निष्ठेचा अर्थ काय होतो ते पाहू. मुळात माणूस हा समस्या आल्यावर हाल चाल व मुख्यतः विचार करणारा प्राणी असल्यामुळे, ज्यावेळी आयुष्यात, अडचणी, प्रश्न येतात किंवा जीवनात व मन आणि बुद्धी यांमध्ये अस्थिरता निर्माण होते आणि त्यांची उत्तरं, आपण करत असलेल्या कर्मातून मिळत नाहीत, त्यावेळी त्यांची काही वेगळी उत्तरं आहेत का याचा शोध होतो.
या शोधात व प्रयत्नात भटकत मन स्थिर करण्यासाठी एखादी स्थिर वस्तू, वास्तू, व्यक्तित्व किंवा अज्ञात स्थान शोधून, अस्थिर चित्ताला काही काळ स्थिर करण्याचा प्रयत्न जीव करतो. मुख्यतः यामध्ये तात्पुरती स्थिरता शोधण्याचा त्याचा वरवरचा प्रयत्न असतो. पण सुज्ञ जन, जे इतरजनांहून भिन्न असतात आणि ज्यांना उपजत चिकित्सा व शोध घेण्याचा ध्यास वा वेड असतं, अश्या सुज्ञ लोकांनी एकत्रितपणे वा व्यक्तिगत पातळीवर, त्याचे विविध मार्ग शोधून, त्या अस्थिरतेचं मूळ कारण जाणलं.
ते मूळ कारण म्हणजे चित्त, ज्याची मूळ प्रवृत्ती ही सदैव अस्थिर राहणं हीच आहे, हे जाणलं. तद्नंतर सदर अस्थिर मनाला, स्थिर करण्याचे अनेक उपाय शोधून, त्यावर संशोधन करून, शास्त्रीय दृष्टिकोनातून हे साध्य व सिद्ध केलं की, विचार कितीही अस्थिर असले तरी जेंव्हा मनाला वा चित्ताला ज्यावेळीअशी एखादी स्थिरता प्राप्त होते आणि ,
ती स्थिरता शाश्वत गोष्टींपासून येते वा मिळते आणि जी एकवार प्राप्त होताच, शाश्वत गोष्टीतून पुनः पुनः चैतन्य प्राप्ती होते, त्या शाश्वत गोष्टीत एकदा मन स्थिर झालं की, मनाचा लगाम, या देहाचा व मनाचा मूळ मालक आत्मा, याच्या हातात जातो, तेंव्हा मन अलौकिक व अद्भुत आनंदासह, अनेक अद्भुत गोष्टींचा अनुभव घेतं.
अश्या स्थिर स्थितीला मनाला न्यायला काही आधार वा माध्यम जरुरी असतं. म्हणजेच मनाला खंबीर करायला तितकीच खंबीर , ताकदवान व चितन्यमयी आणि मनाला बांधून ठेवू पाहणारी वस्तू असावी लागते. अशाश्वताचा आधार हा कमकुवत असतो आणि तो कायमस्वरूपी असू शकत नाही.
या अश्या अशाश्वत आणि त्या शोधातून शाश्वत गोष्टींपर्यंत पोचण्याच्या या प्रवासात अनेक टप्पे पार करत, अनेक प्रकारची संशोधनं करत, सुज्ञ माणूस, ज्ञानप्राप्त करता करता, या शाश्वत गोष्टींपर्यंत पोचला. या खडतर प्रवासाचे अनेक टप्पे पार करत करत, तिथे पोचल्यानंतर, त्याच सुज्ञानी सदर मार्गाचं आरेखन करून, त्यांना लिपी बद्ध, नकाशाबद्ध करून, त्यांना अनेक समीकरणात बांधलं.
त्याबद्दलचं पुढील विवेचन उद्याच्या भागात पाहूया. पण नितिष्ठता अर्थात निष्ठेचा हा प्रवास जाणून घेईपर्यंत, नाम घेत रहा कारण तेच पुढील मार्ग दाखवणार आहे.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१३/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment