Skip to main content

भोग आणि ईश्वर २१७

भोग आणि ईश्वर २१७

भक्तीचं मर्म हे दोन शब्दात सोप्प्या पद्धतिने सांगता येईल. ते मर्म सर्वात शेवटी भगवंतांनी गीतेत अठराव्या अध्यायात सांगितलं आहे. तो श्लोक शेवटच्या परिच्छेदात उद्धृत केला आहे. तोच चित्तशुद्धीसह भक्ती साधण्यासाठी हा सर्वात सोप्पा मार्ग आहे. भक्ती आणि भक्ताबद्दल विषद करून झाल्यानंतर अठराव्या अध्यायात सर्वांचं सार भगवंतांनी गुह्यातील गुह्य ज्ञान, म्हणून, अर्जुनरुप सदभक्ताला कथन करताना सांगितलं आहे. हा श्लोक संपूर्ण गीतेतील, परम संदेशात्मक श्लोक आहे, असं माझं मत आहे.

मुळात भक्त म्हणून सिद्ध होताना , भक्ती करताना चित्तशुद्धी साधून, निरपेक्ष मनाने, आत्मसंयमी साधक वा भक्त म्हणून जीवन जगताना, फक्त प्रभूना साक्षी व साध्य मानून, मात्र स्मरण करत, सर्व कर्मफल त्यागून, अर्थात सर्व कर्मफलांची इच्छा नामशेष करून वा शून्यवत करून, पुढे घडणारी सर्व कर्म, ईश्वराला अर्पण करून, हा भक्तियोग साधण्याचा सल्ला भगवंत देतात.

हा योग म्हटलं तर कठीण नाही . कारण यामध्ये कर्म टाकायचं नाही,परंतु त्या कर्माच्या फलातील इच्छा वा वासना जाळून टाकायची. म्हणजे कर्म तर करायचं, पण त्याच्या फलात आसक्ती धरून असलेलं, अर्थात गुंतलेलं, मन काढून घ्यायचं. म्हणजेच कर्म हे निरपेक्ष मनाने करून मोकळं व्हायचं.

याने काय साध्य होईल तर, फलप्राप्तीनंतर येणारा उन्माद आणि अप्राप्तीमुळे येणारा विषाद हे दोन्ही मनाला ग्रासू शकणार नाहीत. एकदा मन त्यात गुंतलं नाही की, मायेचे बांध व बंध अश्या निरपेक्ष मनाला चुकीचं कर्म करायला प्रवृत्त करणार नाहीत. त्यामुळे अकारण येणारी कर्मबद्धता येणार नाही. हे सर्व साध्य करायला, मनाला कर्म संपलं की, त्वरित त्यातून बाहेर काढता आलं पाहिजे.

यासाठी मन अंतर्मुख होणं किंवा असणं जरुरी आहे. मन आत म्हणजेच अंतर्यामी न्यायला, हृदयात वसलेल्या एका ईश्वराला सतत स्मरत राहिल की, आतल्या आत्मरुप ईश्वराला, मनाने व मनापासून घातलेली साद, पोचते. भक्त तोच जो आपल्या हृदयातील आत्मरुप ईश्वराला जाणतो, त्याला जाणून, त्याला प्राप्त करण्या साठी, नाम घेऊन त्याला पुकारून, मज भक्ताला समीप घेऊन जाण्यासाठी करुणा भाकतो.

म्हणून नाम घेताना ही भावना सतत जागृत असली पाहिजे की, मला माझ्या आत्म्यात वसलेल्या ईश्वराला बोलावून, त्याला जागृत करून, त्याच्या समीप जाण्याची इच्छा व्यक्त करायची आहे. म्हणजे तो आतच आहे. जन्मजन्मांतरीच्या कर्मबंधनाच्या व कर्मफलाच्या वेढ्यामुळे, आत हरवून गेलेल्या ईश्वराप्रत पोचण्याची पराकाष्ठा म्हणजे भक्ती.

त्या कर्मफलांची इच्छा यासाठी त्याज्ज करायची की, ती वेष्टनं वा ती आवरणं गळून पडतील आणि आतील ईश्वराचं मनोहारी रूप, मनःचक्षूंना दृष्टीस घडेल. त्यानंतर येणारा आनंद हा अलौकिक आहे. पण तिथे पोचण्या साठी मन, बाह्य जगातून काढून घेऊन, अंतर्यामी हळूहळू नेत स्थिर करता आलं पाहिजे. सद्गुरू वा ईश्वर यावर श्रद्धा दृढ ठेवून, मन तिथे स्थिर करण्याचं कारण व उद्देश तोच आहे. आधी भरकटलेलं मन स्थिर करून, त्याला एकलक्ष देऊन, मग एकाग्रता येण्यासाठी, नामसाधना करून, त्या एकचित्त झालेल्या मनाला आता आत नेण्याचा प्रयत्न करावा.

त्याचसाठी मनाला बाहेर ओढणारे मोह, माया, संबंध, विकार या सर्वांचे पाश, एका नामाच्या चरणी वाहता येणं गरजेचं आहे. हे एक साध्य झालं नाही तर, शेवटचा गुह्य मार्ग सांगताना, भगवंत श्रीमद्भागवद्गीतेत अठराव्या अध्यायातील ६६ व्या श्लोकात म्हणतात.

सर्वधर्मान्, परित्यज्य, माम्, एकम्, शरणम्, व्रज,
अहम्, त्वा, सर्वपापेभ्यः, मोक्षयिष्यामि, मा, शुचः।।१८:६६।।

या श्लोकावर आणि त्याचा भक्तीसंदर्भात विस्तृत भावार्थ, उद्याच्या भागात पाहूया. तोपर्यंत नाम हाच एकमेव आधार आहे, हे ध्यानात धरून, नाम घेत रहा, म्हणजे ईश्वर समीप आहे याची जाणीव जागृत होईल. ती जागृत करण्यासाठी नाम घेत रहा.

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता.

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे.

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०५/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...