भोग आणि ईश्वर २१६
निरामय, नियमनाने बांधलेली आणि नित्योपासनेत मन रमवणारी, उपासनेचं महत्व जाणणारी अशी साधी जीवनशैली जगणारी माणसं आणि अश्या माणसांचा समूह किंवा वस्ती, ही सहसा नदीकिनारी किंवा पाणी असलेल्या जागेजवळच असायची. सदभावना, सचोटी, सर्व स्वीकारयुक्त स्वभाव आणि शरणागतीची मानसिकता हे मुख्य मानवी गुणधर्म आणि मूल्य असायची.
भक्तियोगातील सर्वात महत्वाचे निकष किंवा जरुरी गुण म्हणजे जे समोर येईल ते स्वीकारून, ते ईश्वरी दान मानून, मनात कोणताही संदेह, शंका, किंतु यांचा तरंग सुद्धा उमटू न देता, इष्टदेवतेवर ठाम विश्वास हे आहेत.
अश्या निरामय व निरलस जीवनपद्धतीने जगणाऱ्या मनाला त्यावेळी आणि आज जगण्याची मानसिकता ठेवून जगलं तर आजही, भक्तियोग वा भक्तिमार्ग हा गीतेत अभिप्रेत आहे त्याप्रमाणे जगण्यात काहीही अडचण येणार नाही.
भक्त हा फक्त आणि फक्त भगवंतांशी बांधील असतो. म्हणजेच त्याला अन्य कोणत्याही गोष्टीत रस वा रुची असता कामा नये. अर्थात याचा अर्थ असा नाही की, त्याने पूर्ण निःसंग जीवन जगावं. याचा अर्थ असा आहे की, जे जे प्राप्त होत जाईल आणि जे जे सुटत जाईल, ते ते सर्व प्रारब्धाचे भोग व उपभोग आहेत हे मानून, दुःख व सुख दोन्हीमध्ये समानता मानून, विषयाचा उपभोग मात्र गरजेसाठी आहे तेवढाच घेऊन, त्यातून सहजपणे वृत्ती व मन बाहेर काढता आलं पाहिजे.
म्हणजेच उदाहरणार्थ समोर एखादा चमचमीत पदार्थ आल्यावर आडवा हात न मारता, मोजकं घेऊन, हात राखून, चव घेऊन आहार करावा. आवडीचा अन्नपदार्थ स्वल्प घेऊन, ते ईश्वरी प्रसाद समजून ग्रहण करणे. याने दोन गोष्टी साधतील. एक म्हणजे आपण अन्नाचा अपमान करत नाही. दोन आपण आपल्या पोटासह मुख्यतः वृत्ती व मन यावर नियंत्रण करू शकतो, हे आपल्यालाच समजेल.
दुसरं जे लक्षात ठेवायचं, ते म्हणजे जर काही कारणाने आपल्याला नाही मिळू शकलं, तर आपला हक्क वा अधिकार नव्हता आणि जे अल्प व स्वल्प आपण ग्रहण केलं, तितकाच आपला अधिकार होता, हे मनाला समजेल, जाणवेल आणि नियंत्रणाची सवय व तयारी मनाला जडेल. यातून आत्मसंयम साध्य होईल.
भक्तीचा हा सर्वात मोठा गुणधर्म आहे की, ती भक्ताला संतुष्ट, समाधानी आणि संयमी व्हायला शिकवते. कारण देहाची व मनाची भूक इतकी तीव्र, अनियंत्रित व अमर्यादित असते की, तीच माणसाला पशुत्वाकडे, असुरत्वाकडे आणि अनितीकडे नेते. म्हणून जिथे जिथे अश्या प्रकारे मन अनियंत्रित होण्याची शक्यता असते वा आहे, त्या त्या ठिकाणांना नम्रपणे हात जोडून नमस्कार करून सांगावं की, हे षड्रिपूंच्या अग्निदेवा मला इतकीच भूक दे,
ज्यामुळे जगणं सुलभ व सहज होईल आणि त्यापेक्षा तीच अतिरिक्त, प्राप्तीची आस वा विषयाकडे नेणारी ओढ, माझ्याने ईश्वराकडे वा ईश्वरी कृपा लहरींकडे नेता येईल. जी गरज व भूक, मला वा माझ्यातील आत्म्याला अकारण व जन्मजन्मांतरीच्या बनधात बांधेल, अशी गरज वा भूक, माझ्यापर्यंत येऊ देऊ नकोस. हे विषयाग्नी
तुझा सदुपयोग हा देह, मन आणि बुद्धी चालविण्यास गरजेचा आहे, तितकाच माझ्यापर्यंत यावा, माझ्या बुद्धीला व मनाला ग्रासून टाकणारा विषयाग्नी हा माझ्याकडून त्याज्य व्हावा किंवा माझ्यापर्यंत येऊच नये.
जर या प्रकारे आपण आपल्या मनाला बुद्धीला व त्याद्वारे देहाला सवय लावून घेत पुढे गेलो तर, प्राप्त परिस्थितीत झगडण्याची, जगण्याची इच्छा सकारात्मक पद्धतीने जागृत राहून, विषयाचा, मोहाचा अतिरेक टळेल. मला असं वाटतं की या करोना संकटात ती एक गोष्ट वा शिकवण, जी नियती वा निसर्ग देऊ इच्छिते, ती म्हणजे, सन्मार्गी रहा, अति विषय टाळा, अतिउपभोग टाळा, नियंत्रित व निरामय आयुष्य जगा. ईश्वराच्या अस्तित्वाला नाकारू नका. निसर्गाच्या साखळीचा, नियमांचा मान राखा, आपल्या जगण्याला अमर्यादित होऊ देऊ नका.
मोजक्या गरजा आणि भविष्याची मोजकी तरतूद करून काही हिस्सा समाजाला परत देत रहा, दानधर्म, पुण्यकर्म, समाजसेवा इत्यादी माध्यमातून, तुम्ही आपणहून जर समाजाला उपयोगी सिद्ध कराल तर, नियती व निसर्ग तुम्हाला तुमच्या अडचणीच्या काळात कशाहीप्रकारे
सहाय्य करण्यास तत्पर असेल.
मला वाटतं भक्तियोगाच्या सिद्धांतात अपेक्षित एक गुण जो आपण आज बघितला, तो म्हणजे, प्राप्त परिस्थितीचा स्वीकार, योग्य मानसिकतेचा अंगीकार, सर्वशक्तिमान ईश्वरी चरणांशी शरणभाव दृढ ठेवून पुढे जाणं. भक्तिमार्गाचे अजून अनेक पैलू व गुणधर्म पहायचे आहेत. उद्या त्याचा विचार करूया. पण तोपर्यंत नाम घेत रहा आणि सद्वर्तनी रहा.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment