Skip to main content

भोग आणि ईश्वर २३०

भोग आणि ईश्वर  २३०

 जन्मोजन्मी अनेक देहातून फिरत असलेला आत्मा आणि कर्माच्या, वासनेच्या, मायेच्या सापळ्यात अडकून, देह हेच  सर्वकाही आणि देह हेच साध्य मानणारा मी, यांच्या बेडीत जखडलेला अशुद्ध स्वरूपातील आत्मा शुद्ध व पवित्र करण्याचं एकमेव तंत्र व मंत्र म्हणजे आध्यात्म. म्हणजेच आत्मशुद्धी साधून आत्मउन्नती व आत्मउद्धार साधणं म्हणजे या देहात आल्याचं सार्थक करून घेणं.

जन्मोजन्मीच्या गतीत, देहाच्या व्यापारात, सर्व साधून, वृद्धपणी देवाचं नाव घेऊन, वेळ असेल तर काही चार पुण्य जोडण्याच्या गोष्टी आपण करतो. सर्वसाधारणपणे हीच प्रक्रिया प्रत्येक मानवी जन्मात व देहात करून, सरते शेवटी देह सोडून, पुढील जन्माकडे जाणारे आपण, कितीशी आत्मशुद्धी साधत असू, विचार करा. 

आपण घरातील पिण्याच्या पाण्यासह सर्व प्रकारची भांडी ठराविक दिवसांनी स्वच्छ करुन पुन्हा भरतो. कदाचित प्यायच्या पाण्याची भांडी रोजसुद्धा धुवून भरत असू. का तर दूषित पाण्याने शरीराला काही अपाय होऊ नये, म्हणून. पण त्याचवेळी मायेचे मोहाचे, लोभाचे संस्कार पोसणारे आपणच असतो. 

मग विचार करा, की नश्वर देहाची, तो देह असेपर्यंत इतकी चिंता करणारे, त्याला शुद्ध, सात्विक अन्न,पाणी, औषध उपचार, जीवनसत्त्व इत्यादी देऊन शेवटपर्यंत सुदृढ रहाण्याची कांक्षा व त्यासाठी प्रयत्न करणारे आपण, जन्मोजन्मी फिरत, विविध देहातून, वासनेचे, मोहाचे, गैर भावभावनांचे कुसंस्कार सहन करत, त्यावर कर्मफलाची, अहंकाराच्या अनेक पदरी रंगांची,  पुटच्या पुटं चढवत नेणारे आपण, कधीही शेवटच्या क्षणापर्यंत विचारही करत नाही की, हा देहच मुळात प्राप्त का झालाय.

इतकं सर्व गैरवर्तन आयुष्यभर केल्यानंतर, आत्मा ज्यावेळी हा देह सोडतो, त्यानंतर त्याची स्थिती, त्या निष्प्राण देहाला पाहून, किती पश्चात्तापदग्ध होत असेल, विचार करा. पुन्हा हीच संस्कारांची चढलेली पुटं घेऊन, त्यांच्या शुद्धीकरणाची इच्छा बाळगून, कर्मगतीचा भरलेला संचिताचा लोटा हाती घेऊन, अजून एका देहाच्या प्रतीक्षेत कितीकाळ तिष्ठत राहायचं. बर त्यानंतर पुन्हा मिळालेला देह कसा असेल ते काळ, विधाता व ईश्वरच जाणे. 

त्या देहात गेल्यानंतर, त्या देहाचे, कुटुंबाचे, समाजाचे, काळाच्या फेऱ्याचे जे संस्कार होतील आणि संचितातील भोगातून, जी मनःस्थिती प्राप्त होईल व पुन्हा वेळ मिळून मन, बुद्धी, देह साथ देईल,त्यावर त्या जन्मात करायच्या साधनेचा विचार होईल. कृती खूप दूरची गोष्ट आहे. 

म्हणजे या एवढ्या चिंतनातून हे लक्षात आलं असेल की, या क्षणापर्यंतचा, या जन्मातील, किती बहुमूल्य काळ आपण, मायेच्या खेळात, संचिताच्या फेऱ्यात, मनाची मर्जी सांभाळण्यात, राग लोभ, क्रोध, मोह,मत्सर द्वेष यांच्या पालख्या वाहण्यात व या सर्वांचे देहाने भोई होण्यात व्यर्थ दवडला आहे. हे लक्षात आल्यावर जे जाणवेल ती खरी जाणीव. त्याआधी जी होती ती देहाची जाणीव. आता आली ती आत्मज्ञानाची जागृती.

पण हे सर्व उमगल्यानंतर, आत्म्याबद्दल म्हणजेच खऱ्या खुऱ्या व देहापलीकडील स्व बद्दल जी जाणीव जागृत झाली असेल, त्या जाणिवेतून जो पश्चात्ताप येईल, आज पर्यंत वाया घालवलेल्या क्षणांबद्दल, ती आता पर्यंतच्या सर्व जन्मातील खरी जाणीव. ही जाणीव एकदा जागृत झाली की, तिचा हात धरून, आत्मशुद्धीचा सर्वात सोप्पा मार्ग जो नामस्मरण आहे, त्याचा हात धरून, आत्म्याच्या शुद्धीकरणाला सुरवात करावी. 

कारण संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या एका अभंगात म्हटल्या प्रमाणे 

नारायण हरी उच्चार नामाचा 
तेथे कळीकाळाचा रीघ नाही 

म्हणजेच या नामस्मरणाची जादू वा परिणाम किंवा प्रभाव असा आहे की एकवार तू या नामाचा उच्चार करून पहा, यांच्या प्रभावात कली आणि काळ दोघानाही प्रवेश नाही. आता हा प्रवेश कुठे नाही, तर त्या देहात, देहातील मनात, बुद्धीत आणि अंतरातम्यात. 

म्हणून एकदा नाम उच्चारायला सुरवात करा, या जाणिवेने की, आजपर्यंत वाया घालवलेला वेळ, आता भरून काढायचा आहे. म्हणून मिळेल तसं व मिळेल तितका काळ नामस्मरण करा, नव्हे चातुर्मासाचा संकल्प कराच की, ठराविक वेळ व काळ यासाठी देईन, म्हणजे चार महिन्यात सवयीने मन आपोआप साथ देईल आणि सोबत येईल. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१८/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...