भोग आणि ईश्वर २३५
आषाढ पौर्णिमा अर्थात श्रीव्यासपौर्णिमा म्हणजेच श्रीगुरुपौर्णिमा !!!
प्रथम सद्गुरू वंदन ll देहासाठी मातृपितृजन ll
ईश्वर न सद्गुरुहून भिन्न ll जाण चिरस्मरणी ll
खरतर २३४ व्या लेखाचा विषय आज पुढे न्यायचा आहे. पण सद्गुरू महती न सांगता पुढे जाणं हे न जाण्या सारखं आहे. म्हणून २३४ चा विषय उद्या पुढे नेऊ. या चरा चराची निर्मिती केल्यानंतर, जगताचा निर्माता, जो नवनीत म्हणजेच लोण्यासम मृदू हृदयाचा आहे, त्याला, आपणच स्वसंकल्पे निर्मिलेल्या जगतातील, आपल्याच अंशरूपाचा विरह जाणवू लागला.
पापपुण्याच्या, कर्म गतीच्या फेऱ्यात अडकलेल्या आणि त्यातून सुटकेसाठी अजाण, मार्गभ्रष्ट, मायेच्या फेऱ्यात अडकलेल्या, मनुष्यादी सजीवांना संसार चक्राच्या भोवऱ्यात जन्मोजन्मी फिरताना , त्याच त्याच चुका, प्रमाद करताना , निसरड्या आध्यात्म वाटेवर चालताना पाहून, विश्वनिर्माता अत्यंत व्याकुळ होत असे.
या कठीण परीक्षेतून पार होणं म्हटलं तर सहज पण म्हटलं तर अत्यंत दुर्लभ व दुरापास्त आहे, याची जाणीव एक माता आणि पिता या रुपात प्रकटलेल्या परम शक्तीला होती. प्रश्न तर आहेत, त्यांची उत्तरं शोधून, त्या मार्गाने चालून, पुन्हा परम अंशाकडे परत जाणं, अर्थात मोक्ष साधणं, हे प्रत्येक जीवाला करणं क्रमप्राप्त आहे. या सर्वांना, आपलंच प्रत्येक अंश कसा सामोरा जाईल, वाट चुकेल, लक्ष लक्ष योनीत फिरत राहील, या विचाराने चिंतेत असताना , भगवंताला मार्गदर्शन करण्याचा एक मार्ग सुचला.
आपल्या अंशाहून भिन्न आणि त्रिगुणात्मक संगम असलेला हा अंश म्हणजे समस्त जगताला व्यापून, जगतातील सर्व सजीव देहातील आत्मतत्वाचं हित साधून, त्यांना साम, दाम, दंड, भेद जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर काढणारं तत्व म्हणजे, गुरुतत्व. या गुरुतत्वाला निर्माण करून, गुरुपदी योग्य व्यक्ती प्रस्थापित करून, अनंत काळासाठी परमात्मा, आपल्या समाधीमध्ये रत झाला. कलियुगी हेच सद्गुरुतत्व अखंड वरदायी व हितकारक आहे.
सर्व जीवांचा मार्गदर्शक, अडकलेल्याना आधार, पायवाटे वरील पथदीप असे हे सद्गुरू चिरंजीव आहेत. आपल्या भक्तांच्या रक्षणार्थ प्रसंगी परमेश्वराला आपल्या शब्दांनी बद्ध करू शकणारे आणि ज्यांच्या शब्दाने ईश्वर स्वतः बद्ध व्हायला सदैव तत्पर असतो, असे हे सद्गुरू जीवाची दुसरी माताच आहेत. एक माता आपल्या उदरात स्थान देऊन जीवाला त्या देहाची प्राप्ती करून देते आणि दुसरी माता गुरुरूपाने, त्याच देहातील आत्म तत्वाला मार्ग दाखवते, ज्याच्या आधाराने, तोच जीव मुक्तीच्या, हरि चरणांच्या वाटेवर पुढे जातो.
गुरू करणं ही खरतर निरर्थक संज्ञा आहे. कारण गुरूंनी तुम्हाला स्वीकारलं पाहिजे. तुम्हाला त्यांच्या हृदयी स्थान प्राप्त करणं गरजेचं आहे. या परम दयाळू सद्गुरूंनी तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकृत केल्यानंतर , तुमचं सर्व कुशल मंगल, योग व क्षेम, हे सद्गुरूंनी आपल्या शिरावर घेतलेलं असतं. सर्व शिष्याचं गुरुपद स्वीकारून, त्यांना संसार चक्रातून बाहेर काढून, अध्यात्म मार्गावर मार्गस्थ करणं, हा कार्यमाहिमा सद्गुरू करतात. किंवा त्या क्षमतेची पात्र व्यक्तीच त्या पदाला पोचून ते पद भूषवू शकते. त्यामुळे तशीच व्यक्ती तिथे विराजित होते.
एकदा तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकारल्यानंतर, तुमची सर्व चिंता ही त्यांच्या शिराचा भार आहे. पण हीच शिष्य व साधक या नात्याने आपल्या शिरावर जबाबदारी आहे. खरतर हे गुरुतत्व सर्व जीवनात अर्थात भौतिक व पारमार्थिक, दोन्ही प्रांतात अत्यंत पूजनीय आहे. कारण गुरुपदी असलेली कोणतीही व्यक्ती आपल्या शिष्याचं कल्याण, कुशल व मंगल कांक्षीते आणि त्यासाठी शिष्याला मार्गदर्शन करून, प्रसंगी हाताला धरून पुढे नेण्याचं कार्य करते.
अश्या या वंदनीय, पूजनीय सद्गुरुरूपात प्रकट ईश्वराला आत्मतत्वांपासून साष्टांग नमन व प्रणिपात करून, त्यांच्या कृपाप्रसादास पात्र होण्याचा सदैव प्रयत्न करूया. ही सद्गुरुकृपा प्रत्येक जीवावर अखंड, जन्मो जन्मी राहो आणि ते सदैव प्रत्येकाला मार्गदर्शन करत राहो. म्हणून त्यांना आवडीचं नाम घेऊनच त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करूया, त्या प्रयत्नाला तेच यश देतील.
श्रीराम जयराम जय जयराम !!!
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२३/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment