भोग आणि ईश्वर २२२
सर्वधर्मान्, परित्यज्य, माम्, एकम्, शरणम्, व्रज,
अहम्, त्वा, सर्वपापेभ्यः, मोक्षयिष्यामि, मा, शुचः।।१८:६६।।
सर्व कर्मातील सर्व मोह, माया लोभ आणि सर्व भोगातील व दुःखातील शोकभावाचा त्याग करून मला एकट्याला, एकात्म भावाने, शरण जा. त्यामुळे आणि त्यानंतर काय होईल याची शाश्वती वा खात्री किंवा वचन श्लोकांच्या पुढील ओळीत भगवंत स्वतः देत आहेत.
म्हणजे जो साधक, भक्त आपला भोळा भाव एकवटून माझ्या चिंतनात, स्मरणात, रममाण होईल आणि सर्व त्यागून माझ्या चरणी समर्पित भाव ठेवेल, अश्या भक्ताला ही शाश्वती देऊन ईश्वर सांगतो की, त्याला सर्व पापातून मुक्त करून, त्याला मोक्षाप्रत नेईन, माझ्या धामाला तो प्राप्त करेल.
पहिल्या ओळीचा विस्तारपूर्वक अर्थ पाहिल्यानंतर आणि शरणागती अर्थात समर्पण म्हणजे काय, हे जाणून घेतल्यानंतर या दुसऱ्या ओळीतील वचनाकडे बघण्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की, गीतेत श्रीकृष्णांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे इंद्रियांमध्ये ते मन आहेत. याच मनाला जडलेले विकार, विचार, अनेक विकल्प गैरमार्ग, माया, मोह सहा असुररूप शत्रू यांमुळे या मनातून, ईश्वरी अंशाचं अस्तित्व धूसर होत जातं. किंबहुना या सर्व पडद्यामागे ते अस्तित्व लपलं जातं.
मायेचा, मोहाचा जोर इतका असतो की, मनातच ईश्वर आहे आणि त्याला इतरत्र शोधण्या साठी साधना करतो. ती करण्यापेक्षा, त्या मनातील ईश्वराला स्मरून, सर्व समर्पण करणं हे मधुसूदनाला अपेक्षित असणार. म्हणजेच आपला समर्पणाचा, शरणागतीचा भाव, हा शुद्ध, निर्हेतुक असावा, आणि तो भाव मनातील आत्म स्वरूपाला स्मरून करावा. अश्याच समर्पण भावाला, जगदीश्वर वचन देतो की, जो या प्रकारे मला शरण जाईल,
त्याला मी सर्व पापातून मुक्त करून,बमोक्ष प्रदान करीन. इतकं स्वच्छ आणि अधोरेखित शब्दात वचन देणाऱ्या, ईश्वराचा शब्द आहे हा. पापातून मुक्ती हा शब्द जरा विस्ताराने पाहूया.
मुळात ज्या मनात, भोळा भाव आहे, सुखाचा अणुमात्र तरंग व दुःखातील शोकभावाचा स्पर्शही त्या मनाला शिवत नाही. म्हणजेच आलेलं दुःख हे ईश्वरी कृपा, त्याचं नित्य स्मरण राहावं म्हणून आणि मिळालेलं सुख हा विधात्याच्या कृपेचा प्रसाद आहे, त्यामुळे ते सुख त्याच भावात उपभोगून, जो अशाश्वत सुखाच्या व तात्पुरत्या दुःखाच्या मागे जात नाही किंवा त्यात राहूनही जो कोरडा आहे, अश्या साधकाच्या शोधात, प्रत्यक्ष ईश्वरसुद्धा फिरत असतो.
किंबहुना अश्या साधकालाच्या सेवेसाठी प्रसंगी, द्वारकेचा राणा, श्रीखंड्या रूप घेऊन, नाथमहाराजांच्या गृही उणेपूरे एक तप, राहून नाथांची सेवा करण्यात तो वचन कर्ता श्रीहरी, धन्यता मानतो. म्हणजेच आपल्या वचना तील खरेपणाची साक्ष पटावी, व गीतेतील वचन, कलियुगीसुद्धा, पूर्ण करण्यास मी बद्ध आहे, याची खूप मोठी खूणगाठ, यात बांधून घ्यावी.
हाच श्रीहरी याच वचनपूर्तीसाठी विठू महार बनून दमाजी पंतांची थकबाकी चुकती करून येतो, तोच श्रीहरी तुकोबारायांचे अभंग इंद्रायणीच्या पाण्यात कोरडे ठेवतो, आपल्या ब्रीदरक्षणार्थ तुकोबारायांना सदेह वैकुंठाला घेऊन जातो. अशी अनेक उदाहरणं आहेत. मुद्दा हा आहे की, ज्यांनी ज्यांनी आपला भाव एका ईश्वराच्या चरणी वाहून, निष्काम कर्म केलं, त्या सर्वांना दिलेल्या वचनानुसार मुक्त करून मोक्षाप्रत नेलं.
कदाचित त्यांच्या या जन्मीच्या भक्तीभावामुळे, शरणा गतीमुळे आणि वृत्ती एका स्थानी स्थिर ठेवून, सर्व कर्मफलत्यागयोग साधल्यामुळे, ईश्वर आपलं वचन खरं करायला बद्ध झाला आणि त्यांच्या संचितातील ठेवी व कर्ज, असलीच तर, ती नक्कीच शुद्ध करून, मुक्ती साध्य करून दिली. म्हणजे सर्वपापेभ्यो, मोक्षयिष्यामी हे वचन तो नक्कीच पाळतो, आपणच त्या भावाप्रत जायला कमी पडतो. म्हणजे आपल्याला काय करणं अपेक्षित आहे आणि आपण प्रत्यक्षात काय करतो, हे ध्यानात येईल.
थोडक्यात जे सोडून, त्याला शरण जाऊन समर्पण अपेक्षित आहे, ते न करता, त्याला अजून घट्ट धरून, भौतिकातच गुरफटून राहण्याची इच्छा, मागण्या करतो आणि त्याचसाठी जगण्याची प्रेरणा घेतो. विचार करा, निरिच्छ होऊन नाम घ्या, सर्व साध्य होईल.
शेवटी भगवंतांनी मा शुच: म्हटलंय, त्याचा विस्तृत अर्थ उद्या पाहूया.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१०/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment