Skip to main content

भोग आणि ईश्वर २२४

भोग आणि ईश्वर  २२४

खर पाहिलं तर श्रीमद्भागवद्गीता, उपनिषदं, पुराणं, संत वचनं यातून जे सार पुढे येतं, त्यातून काही निष्कर्ष जरूर काढता येतात. मुळात या भूतलावर येणं, त्यात हा मानवी जन्म मिळणं आणि त्यातही, संचितातील ठेवी वा कर्ज, पुढच्या जन्मासाठीच्या कर्मांची मशागत इत्यादी सर्व करण्याची वा निदान समजण्याची उर्मी वा जाणीव जागृत होणं, हीच मुळात खूप मोठी गोष्ट आहे, मानवी जीवनात. 

त्यामुळे ज्यांची जाणीव झाली, त्याबद्दल विचार करू लागणं वा करू शकणं ही त्याहून उत्तम स्थिती आहे. आता विचार केल्यानंतर काही गोष्टी मनात नोंदल्या जातात की, सर्वांना काहिनाकाही समस्या आहेतच, तरीही आपल्याला आपलं दुःख हे पर्वतासमान वाटतं आणि परदुःख हे नेहमी काकणभर उणं वाटतं, हे बर्याच प्रमाणात सत्य आहे.  

जाणीवा ज्यावेळी इतरांच्याही दुःखाकडे, भोगांकडे सजगपणे पाहतील आणि त्याबद्दल निदान आत्मीयता बाळगतील, त्यावेळी,  पुढील पायरी गाठली जाईल.  त्यानंतर  सुख आणि दुःखाच्या या चक्रातून बाहेर पडण्याचा विचार येणं ही पुढील पायरी. इथे एक सूक्ष्म घातक वाट आहे. ती म्हणजे वाट्याला आलेले किंवा पूर्वकर्मांनी येऊ घातलेले, ते भोग वा दुःख येऊच नयेत म्हणून वेगळा मार्ग वा साधनेचा मार्ग शोधणं हा त्याच चक्रात पुन्हा टाकणारा मार्ग आहे.

बऱ्याच प्रमाणात वा बऱ्याच जणांकडून ती चूक होते. अर्थात हे  साहजिक कारण आहे कारण, मन हे नेहमीच सुखाची आकांक्षा करतं आणि दुःख, भोग वा त्रास टाळण्याकडे मनाचा कल असतो आणि हे नैसर्गिक आहे. पण याच नैसर्गिक वृत्तीतून, भोगांबद्दल भीती, पूर्वकर्मांची चिंता, त्यामुळे आलेलं हताशपण यातून भोग टाळण्या साठी प्रयत्न करण्याकडे माणूस आपोआप ओढला जातो. 

या वृत्तीवरच अनेक संत महंत देवांचे अवतार इत्यादींनी कायम प्रहार केला आहे आणि आपल्या उदाहरणातून हे दाखवून दिलं आहे की, दुःखापेक्षा दुःखाची वा भोगांची 
भीतीच माणूस आणि त्याचं मन, काळीज व आत्मा यांना क्लेश देतं. बर असे भोग वाट्याला आल्यावर, सर्वजण त्यातून जातात, त्यांना तोंड देतात, धैर्याने वा भीतीने का होईना, पण ते दिवस काढून पुन्हा उभे राहतात. 

पण जे धैर्याने तोंड देतात ते खरे यशस्वी होतात, कारण धैर्यच मनाला उभारी देतं, मनातूनच देहाला, बुद्धीला ताकद मिळते. म्हणजेच खरी लढाई ही मनानेच लढली जाते. भोगांचा, दुःखाचा सामना हा मनाच्या स्थितीवर अवलंबून असतो. ज्याप्रमाणे मनःस्थिती असेल त्याप्रमाणे आपल्याला संकटांची ताकद जाणवते. 

आठवून बघा आपल्या आयुष्यात आलेली संकटं, भोग व दुःखाचे प्रसंग व दिवस, आले काही काळ, राहिले आणि निघून गेले. जे काही आर्थिक, शारीरिक व मानसिक  नुकसान करायचं होतं ते करून गेले असतील. पण आज आठवा की, त्या संकटांपेक्षा त्यांची भीतीच जास्त जीव जाळते. त्याच मनःस्थितीत माणूस चुकीची कर्म करतो आणि पुन्हा त्याची साखळी तयार करतो. 

वास्तविक हा सारा खेळ जर मनाच्या कमजोरीचा किंवा ताकदीचा आहे, तर एक गोष्ट ध्यानात घ्या की, आपण जे भोगत आहोत किंवा भोगणार आहोत, ते आपल्याच कर्माचं फलस्वरूप असल्यामुळे, त्याला टाकून वा टाळून पुढे जाणं, ही अशक्य गोष्ट आहे. कारण जे आज काही कृपेमुळे टाळता येईल, ते नन्तर समोर येणारच. कृपा झालीच तर ती मुक्ती वा मोक्ष यासाठीच व्हावी, कायमस्वरूपी. त्यामुळे आपण घडणाऱ्या वा प्राप्त होणाऱ्या भोगांचा वा उप भोगांचा विचार न करता, पुढे जमा होणारी कर्म, जी आज आपण करत आहोत वा करणार आहोत, त्यांचा विचार होणं जास्त गरजेचं आहे. 

म्हणून पूर्वकर्माने प्राप्त, सुख वा दुःख या  फलांचा विचार न करता, आपल्या पुढील कर्मांना सुधारण्यासाठी प्रयत्न करणं जरूर आहे. ते साधण्यासाठी मनाला त्या स्थिती कडे व त्या मार्गावर कसं न्यायचं याबद्दल उद्या चर्चा करूया. पण कोणत्याही परिस्थितीत नामाची कास सोडू नका. आत्मउद्धाराचा तो एक सहजसाध्य राजमार्ग आहे. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. काही अपरिहार्य कारणाने भोग आणि ईश्वर भाग २ व श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ या पुस्तकाचं काम लांबलं आहे. पण लवकरच त्याबद्दल पोस्ट करण्यात येईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१२/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...