भोग आणि ईश्वर २२१
सर्वधर्मान्, परित्यज्य, माम्, एकम्, शरणम्, व्रज,
अहम्, त्वा, सर्वपापेभ्यः, मोक्षयिष्यामि, मा, शुचः।।१८:६६।।
आपण धर्म, परित्यज्य, माम एकम आणि व्रज या शब्दांचं दीर्घ चिंतन केलं. पण हे सर्व शब्द एका शब्दा शिवाय व्यर्थ आहेत. हे सर्व शब्द समजले तरीही ते आत्मसात करून, त्याच्या पुढील, महत्वाची कृती, केल्या शिवाय, आधीचं सर्व फलहीन आहे, किंवा गौण आहे. हा कोणता शब्द किंवा कृती आहे, ज्यामुळे बाकीच्या सर्व संज्ञा अर्थपूर्ण होतात.
वरील सर्व शब्दातून अपेक्षित भाव या एका शब्दाने व्यक्त होतो. तो म्हणजे शरणम्. शरण या शब्दात अनेक भाव व कृती अपेक्षित आहेत आणि गीताकाराला, त्याच अपेक्षित असाव्यात. शरण जाणे म्हणजे समर्पण करणे. समर्पण म्हणजे नक्की काय. तर समर्पण शब्द वास्तविक दोन शब्दांची संधी आहे. सम् म्हणजे एक समान आणि अर्पण म्हणजे अर्पित करणे, वाहणे. हे देह आणि मन याद्वारे आत्म्यातून प्रकट झालेली कृती आहे
ज्यावेळी इडा आणि पिंगला या दोन्ही नाड्यातील उर्जा प्रवाह एकसमान असतो, ज्यावेळी उजव्या व डाव्या दोन्ही आज्ञाचक्राची गती एकसमान व स्थिर असते आणि ज्यावेळी दोन्ही श्वासांमध्ये एकसमान थंड प्रवाह प्रवाहित होत असेलतर, त्या ध्यानावस्थेत, प्रभुपुढे जे शून्यत्वाने समर्पित होईल, ते खरं समर्पण. ही अवस्था ध्यानातील, कुंडलिनीतील आणि प्रणायामातील उच्चावस्था आहे.
हा योगात अपेक्षित अर्थ झाला. आपल्या चिंतनासंदर्भात
अपेक्षित अर्थ अर्थात भावार्थ काय आहे, ते बघूया. ज्यावेळी धर्मातील अर्थातच निहित कर्मातील मोह, लोभ व अपेक्षा यांचा त्याग करून, चित्तशुद्धी साध्य करून, मानव, आपले सर्व भाव एकाग्र करून, फक्त आणि फक्त एकाच प्रभूच्या स्मरणात सतत रत होईल आणि कायम स्वरूपी त्यातच रममाण असेल, त्या स्थितीला समर्पण म्हणतात.
म्हणजेच इथे काही प्राप्त न झाल्याचं दुःख नाही, काही गमावल्याचा शोक नाही, मिळाल्याचा आनंद आहे, पण अहं नाही, प्राप्त होऊनसुद्धा बुद्धीचा भ्रम नाही, मिळणार की नाही याची उत्सुकता वा चिंता नाही. फक्त जीव आणि परम ईश्वर यांचं एकसमान पातळीवर येऊन शून्या वस्थेत रममाण होणं आहे. पण या अवस्थेत आत्मा अलौकिक आनंदाचा अनुभव घेत आहे. या अवस्थेत क्षणांचं आणि श्वासांचं गणित, हे फक्त ईश्वरासाठीच सुरू आहे.
म्हणजेच मानसिकदृष्ट्या कोणतेही विपरीत तरंग वा लहरी प्राप्त होणं वा प्रसारित करणं हे बंद असून, फक्त आनंद आणि परमानंद प्रसारित होतो आहे. आत्मा एकात्म भावाच्या अवस्थेत आहे. म्हणजेच एका ईश्वरा शिवाय, माझं मला, काही प्राप्त करायचं नाही आणि काही गमवायचं सुद्धा नाहीये. या स्थितीत यायला खूप मोठा योग साधायला हवा किंवा बरीच साधना करायला हवी, असा एक समज वरील विवेचन वाचून होऊ शकेल आणि ते सहाजिक आहे.
पण तसा काही प्रकार नाही. अन्यथा हा शेवटचा उपाय म्हणून, शेवटच्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं नसतं. इथे फक्त मनातील अपेक्षा, मोह, लोभ, मत्सर, द्वेष आदी एका चरणांवर वाहून, तिथेच श्रद्धेचा दृढ भाव स्थिर ठेवणं, इतकंच अपेक्षित आहे. म्हणजे कर्म करण्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवून, भगवंत फक्त फलाची इच्छा, अपेक्षा, त्यातील मोह बाजूला सारण्यास सांगत आहेत.
आता हे समर्पण साध्य कसं करायचं म्हणजे काय करायचं. तर एकच करायचं, कोणतंही कर्म करत असताना वा स्थिर चित्त बसलेल्या अवस्थेत असताना फक्त आणि फक्त प्रभूच्या नामाला शरण जाऊन, त्याचं नित्य स्मरण करायचं. म्हणजेच ज्या ज्यावेळी कोणत्याही भावाच्या उर्मी वा तरंग उठतील, जे मनाला मोह वा दुःख यात ओढून नेण्याचा प्रयत्न करतील, किंवा मनाची स्थिती दोलायमान करतील, त्या ठिकाणी भगवंत नामाला शरण जाऊन, त्या नामात व त्या चरणांवर चित्त स्थिर करायचं आणि शरणागत व्हायचं.
ही शरणागतीची अवस्था नित्य म्हणजेच प्रत्येक श्वासा गणिक व प्रत्येक विचारागणिक असली पाहिजे, तरच ते पूर्ण समर्पण असेल. या श्लोकाचा पुढील भावार्थ जाणूया पण उद्याच्या भागात. तोपर्यंत नित्य नामस्मरणाने नित्य प्रभुसामीप असल्याचा अनुभव घ्या.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०९/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment