भोग आणि ईश्वर २१८
त्याचसाठी मनाला बाहेर ओढणारे मोह, माया, संबंध, विकार या सर्वांचे पाश, एका नामाच्या चरणी वाहता येणं गरजेचं आहे. हे एक साध्य झालं नाही तर, शेवटचा गुह्य मार्ग सांगताना, भगवंत श्रीमद्भागवद्गीतेत अठराव्या अध्यायातील ६६ व्या श्लोकात म्हणतात.
सर्वधर्मान्, परित्यज्य, माम्, एकम्, शरणम्, व्रज,
अहम्, त्वा, सर्वपापेभ्यः, मोक्षयिष्यामि, मा, शुचः।।१८:६६।।
गीतेत सांगितलेले व युगानुयुगे अनेक तपस्वी, ऋषी, ज्ञानी, कर्ममार्गी यांनी अवलंबलेले, कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे मार्ग अवलंबून, जीव, परमजीवाशी एकरूप होऊन, मोक्षप्राप्तीच्या मार्गावर अग्रेसर होऊ शकतो. यासाठी करावं लागणारे कर्म, प्राप्त करावं लागणारं ज्ञान व भगवतभक्ती ही कशी का कधी आणि कोणत्या प्रकाराने करावी, याचं संपूर्ण ज्ञान, भगवंतांनी आपल्या शिष्योत्तम अर्जुनाला माध्यम करून, सर्व जगतासाठी अनंत काळ मार्गदर्शन करेल , अश्या पद्धतीने युध्दजन्य परिस्थितीत सांगून अनंत काळचे उपकार केलेत.
जगतपिता असल्या कारणाने आणि मातेचं हृदय असल्या मुळे आपल्या प्राप्तीसाठी सांगितलेले मार्ग प्रत्येकाला साध्य होतीलच असं नाही, हे जाणून, आई जशी सर्वात प्रथम दुबळ्या, अशक्त व परावलंबी पुत्रांची काळजी करते, त्याप्रमाणे भगवंतांनी, जाणतेपणी वा अजाणते पणी अनेक जिवात्मे करत असलेल्या कर्माच्या चुका, घोडचूका, प्रमाद किंवा यामुळे कर्मगतीच्या फेऱ्यात अडकून मार्गभ्रष्ट जीवांना , तरीही एखादा सोप्पा व सोयीचा मार्ग असावा या दृष्टीने अठराव्या अध्यायात हा ६६वा श्लोक सांगितला आहे.
म्हणजे ज्यांना ज्ञानयोगासारखे जड व कठीण मार्ग पार करता येतील त्यांनी त्या मार्गाने यावे. ज्यांना कर्मयोगा सारखे क्लिष्ट व तारेवरची कसरत असणारे, अवजड मार्ग अवलंबून पुढे येता येईल, त्यांनी त्या मार्गाने पुढे यावे. ज्यांना भक्तिमार्गासारखा, त्यातल्यात्यात सहज व सोपा आणि फार क्लिष्ट नसलेला आणि तरीही इच्छित स्थळी लीलया घेऊन जाणारा मार्ग पत्करून, मजप्रत येण्याचा प्रयत्न करावा.
यातील सर्व मार्गांवर सद्गुरुरूपात कृपा करून, मार्गदर्शन करायला, प्रभू स्वतः नक्कीच असतील, हा ठाम विश्वास, योगक्षेमं वहाम्यहं या श्लोकातून वचन रूपात प्रभूंनी सांगितलं आहेच. तरीही परीक्षेत काही विद्यार्थी असे असतात की, जे परीक्षा द्यायलाच तयार नसतात. त्यांना परिक्षेचीच भीती वाटते. प्रभू एक पिता, एक माता व एक गुरू या भूमिकेबरोबरच, एक संवेदन शील शिक्षक सुद्धा असल्याकारणाने, काही विद्यार्थी ज्ञान, कर्म व भक्ती या मार्गावरून चालत, पडत अडखळत, धडपडत मार्गक्रमण करतील, काही उत्तम रीतीने पुढे जाऊन, मोक्षपदाला प्राप्त करतील, हे जाणलं होतं.
पण ज्यांना यातील काहीही, बुद्धी, मन व देह यातील मायेच्या, कर्माच्या गुंत्यामुळे, साध्य होणार नाही. किंवा ज्यांना हे सुद्धा उमगणार नाही आपण कुठे जात आहोत. अश्या मोक्षपदप्राप्तीच्या मार्गाबद्दल पूर्ण अनभिज्ञ असलेल्या सामान्य जनांनी, का या संसार गुंत्यात अडकून राहायचं, म्हणून त्यांना एक सर्वात सहजसाध्य महामार्ग दाखवताना प्रभू ६६व्या श्लोकात म्हणतात.
तू निदान एक कर, सर्व धर्मांचा त्याग कर. इथे धर्म हा शब्द सनातन हिंदू वा इतर कोणताही धर्म हा नसून, चारही पुरुषार्थाचं पालन करताना करावे लागणारे कर्म या अर्थी आहे. म्हणजेच धर्माचं पालन करताना पूजा अर्चा यांचा खटाटोप, स्तोत्र मंत्र यांचं पठण, श्रवण कीर्तन स्मरण, संसाराच्या व संसाराच्या जबाबदारीत अर्थार्जना साठी केलेल्या व कराव्या लागलेल्या अनेक गोष्टी, अश्या धर्माची सर्व कर्तव्य.
या सर्व धर्म अर्थात जीव जगवण्यापासून मोक्षप्राप्तीसाठी केलेली वा करावी लागणारी कर्म, ही सर्व मजप्रत अर्पण कर. परित्यज्य या शब्दाचा व्यापक अर्थ आहे, तो उद्याच्या भागात पाहूया. आज इथेच थांबू. पण नाम घेत रहा, ते एक कर्तव्य सोडू नका, कारण ती उर्मी, ती जाणीव, आज या जन्मी जागी झालेली आहे, ती अशीच जागृत राहू दे.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०६/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment