भोग आणि ईश्वर २३८
खरतर नाम या सार्वसामान्यांना सहजसाध्य उपायाची ओळख करून द्यायची आवश्यकता नाही. पण मागील दोन लेखांमध्ये दिलेल्या शास्त्रीय माहितीच्या आधारावर आपण नामाचा पुनः विचार करू. एक गोष्ट नक्की, की आत्मउन्नती व आत्मउद्धारासाठी ज्या इंधनाची व ऊर्जेची आवश्यकता असते, ते इंधन म्हणजेच नाम आहे.
नामाच्या दीर्घ, सतत, निश्चित स्मरणाने, उच्चारणाने आवश्यक बल, ऊर्जा व तेज, बुद्धी व मन याद्वारे, आत्म्या पर्यंत पोचून, त्या आंचेने आत्मतेज उजळून निघते. आत्म्यावर जमा झालेली, जन्मानुजन्मांची कर्म, विकार, वासना व माया यांच्या प्रभावाने तयार झालेली काजळी, जोपर्यंत पूर्ण जात नाही, तोपर्यंत उन्नती व उद्धार शक्य नाही. त्यासाठी चित्तशुद्धीची नितांत आवश्यकता आहे.
ती चित्तशुद्धी, अनेक कर्ममार्गानी प्राप्त होऊ शकते. अष्टांग योग, यज्ञादी कर्मकांड, तपसाधना, दानधर्म इत्यादी अनेक मार्गांनी आवश्यक चित्तशुद्धी प्राप्त करता येते. पण हे सर्व मार्ग सद्यस्थितीत आणि सांप्रत काळात सर्वांना प्रत्यक्षात शक्य होतील असं नाही. मग यासाठी, पूर्ण शरणागत भावाने घेतलेले, प्रभूंचे नाम व त्या नामाचे सतत उच्चारण व स्मरण, हे, वरील सर्व मार्गांचे लाभ प्राप्त करून देतं. वरील अनेक मार्ग जसं योग, यज्ञ इत्यादी अनेक प्रकारच्या पूर्वतयारीनंतर व अनेकांच्या सहाय्याने करता येतं.
त्याचप्रमाणे त्या साधनांमध्ये सातत्य व नियमितता राखता येईलच असंही नाही. या साधनांना वेळ व पैसा देखील खर्चावा लागतो. हे सर्वसामान्य जनांना जमेलच हे असं नाही. पण वेद शास्त्र, पुराणं इत्यादींनी सांगितलेलं व ईश्वरकृपेची प्राप्ती करण्याचं कार्य, सामान्य माणसाला शक्यच नाही का. असा विचार आल्यानंतर एक तत्व वा धागा, जो या व अश्या सर्व मार्गात आढळतो. तो म्हणजे, ईश्वराशी अनुसंधान, संपर्क, वा भगवंताच्या चरणी आपली प्रार्थना, साद, विनवणी, प्रश्न पोचवता यावा.
याबाबत एक निश्चित आहे, की भगवंत हा सर्वव्यापी व चराचर भरून असलेला असा सर्वसाक्षी असल्याने, सर्वांच्या आवाक्यात आहे किंवा असावा. तो परम दयाळू, कृपावंत असल्याने, सूक्ष्मातून स्थूलापर्यंत सर्व रुपात व निर्गुणात आणि सगुणात प्रकट होऊ शकत असल्यामुळे, जशी त्याला साद घालणाऱ्याची इच्छा, तसा त्याचा कृपाप्रसाद देण्याचा मार्ग असतो.
म्हणून चराचरातील या अव्यक्त, पण व्यापक रूपातील, कोणत्याही एका रुपाला भक्तिभावे आळवण्यासाठी अनेक मार्ग वेद, पुराणं, ऋषीमुनी आदींनी उपलब्ध करून , त्याची उपयुक्तता, उपयोगिता आणि शक्यता, स्वतः त्या मार्गाने चालून सिद्ध करून आपल्याकडे दिली आहे. म्हणजे भगवतप्राप्तीची किल्ली ही अप्राप्य व अशक्य नाही. किंवा त्यावर नव्याने वा प्रथम वाटचाल करणारे आपण नाही.
यातील अनेक मार्ग हे साक्षात मुक्ती व मोक्षाकडे नेऊन, जन्म जन्मांतरीची भेट प्राप्त करून देणारे आहेत. खरतर काळाच्या ओघात त्रेतायुगापर्यंत त्याच मार्गांचा अवलंब मुख्यत्वे केला जात असे. परंतु कलियुगाच्या प्रभावाचा परिणाम आधीच ओळखल्यामुळे, प्रत्यक्ष पूर्णावतारी भगवान श्रीकृष्ण यांनी, या सर्व मार्गातील तत्वविरहित कर्माचा व त्यातील गाभा नष्ट होऊन, मात्र कर्मकांड उरण्याचा धोका वेळीच ओळखला.
म्हणूनच त्या चक्रात न अडकता व नुसतेच कर्मकांडी राहून, भक्तीचा भाव नष्ट करून घेण्यापेक्षा सर्वात सोप्पा मार्ग सांगितला. जो वेदात पुराणात सांगण्यात आला होता, पण काळाने त्याचं महत्व पुन्हा अधोरेखित करणं गरजेचं आहे, याची चाहूल, त्यांना झाल्यामुळे, त्यांनी फक्त एकाच शब्दात ते तत्व, स्वस्तुतीचा प्रमाद शिरावर घेऊनही, स्वमुखे सांगितलं. ते तत्व म्हणजे मामेकं शरणं व्रज.
सर्व भाव, सर्व वासना, सर्व ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये, सर्व इच्छा, आकांक्षा, सर्व भावना, सर्व ज्ञान, सर्व जाणिवा हे सर्व माझ्या चरणी वाहून, फक्त माझ्या स्मरणात पडून रहा. इतका सोप्पा, साधा मार्ग त्यांनी सांगितला. तो मार्ग सांगून, ईश्वरकृपेची सर्वात मोठी गुह्य किल्ली वा पासवर्ड, दिशा, हे फक्त सामान्य भक्तांच्या हाती, अर्जुनाला माध्यम करुन, दिली. खरतर हे कोडं वा ही गुह्य गोष्ट किंवा हे गुपित वेदनाही अप्राप्य असं होतं. पण त्या सर्वांचं सार तेच होतं. फक्त भगवंतांनी ते प्रत्यक्ष स्वमुखातून, उघडपणे सांगितलं.
याचं महत्व अनन्यसाधारण आहे. ते उद्याच्या लेखात पाहू. आज इथेच थांबू. पण आपण नाम व नामाचा आग्रह मनाला करतच राहू. कारण तो सर्वात मोठा तारकमंत्र आहे.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२६/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment