भोग आणि ईश्वर २३६
२३४ व्या भागात सुरू असलेला विषय पुढे नेऊया. पंच महाभूते आणि त्यांची निर्मिती, हे मुळात एक गणित आहे. कारण जी पंचमहाभूते आपल्या आजूबाजूला या पृथ्वीवर आणि आसमंतात, अर्थात ब्रह्मांडात आहेत, त्याच तत्वांना घेऊन, नियंत्याने हा देह निर्माण केला. म्हणजेच देहाबाहेरसुद्धा जी तत्वे तीच देहाच्या आतमध्ये अस्तित्वात आहेत.
म्हणजेच या देहातून, या देहातील चैतन्याला, विश्व चैतन्यात समाविष्ट करून मोक्ष वा मुक्ती प्राप्तीसाठी याच मृत्यूलोकातील पाच तत्त्वांनी तयार झालेल्या देहाची जरुरी आहे, हे तर नक्की. म्हणजेच त्याच साधनांना आधारभूत घेऊन, त्याच जगताच्या पार जाण्याची किमया साधता आली की झालं, अस सोप्प तत्व या मागे आहे.
आपण क्षेपणास्त्र निर्माण करून, तयार केलेल्या तंत्र ज्ञानाचा वापर करून, यान पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर अंतराळात सोडून, अनेक ग्रह, आपली सूर्यमाला, इतर अस्तित्वातील सूर्यमालेतील ग्रह, तारे या सर्वांचा अभ्यास केला व करत आहोत. त्यासाठी अग्नीतत्वाचा वापर करून, जल तत्वाच्या विरुद्ध दिशेने, वायू तत्वाला कापत कापत, आकाश या तत्वाला भेदून, यान व उपग्रह अंतराळात, अर्थात पृथ्वीच्या कक्षे बाहेर सोडतो.
म्हणजे पंचतत्वातील एक वा अधिक तत्वांचा उपयुक्त वापर करून, त्यांच्या मधील ऊर्जा व शक्तीला वृद्धिंगत करून, त्याला अतिरिक्त बळ देऊन, आपण या पृथ्वी लोकातून पार होऊ शकतो, हे विज्ञानाने दाखवूनच नव्हे तर सिद्ध करून दिलंय. यातून सिद्ध हे झालं की, याच अस्तित्वातील तत्वांचा वापर करून, आपण याच वाता वरणाच्या कोषाला भेदू शकतो.
याच तत्वाला खूप पूर्वी जाणून, त्यावर आधारित आध्यात्म शास्त्र व त्यातील अनेक प्रथा, परंपरा, मार्ग निर्माण करून, या सनातन संस्कृतीतील शास्त्रज्ञांनी, या वातावरणाला भेदून, या सर्व ब्रह्मांडाच्या निर्मात्याप्रत पोचण्याची कला, विद्या, शास्त्र, निर्माण करून, लाखो वर्षांपूर्वीच आपल्या हातात ते तंत्रज्ञान सुपूर्द केलं आहे.
त्या तत्वप्रणालीवर आधारित, अष्टांग योग, ध्यान धारणा समाधी, जप तप, यज्ञयाग इत्यादी अनेक मार्ग निर्माण केले.
आपला देह हा एक परिपूर्ण यांन आहे, हे सर्वात प्रथम लक्षात घ्या. त्यातील पंचमहाभूतरुप तत्व ही, या यानाच्या आतील, क्षेपणास्त्राला ऊर्जा प्रदान करून, त्यांची शक्ती वाढवून पुढील कार्य साधण्यासाठी आहे, हे ध्यानात ठेवा. त्यांचा उपयुक्त वापर करून, या देहरुप यानातील आत्मरुप तेजाला, ऊर्जा प्रदान करून, या देहाच्या, या विश्वाच्या पार असलेल्या पूर्णांशाला सुपूर्द करण्याचं तंत्र फार पूर्वीच या ऋषीमुनिरुप तज्ञानी, आपल्याला सिद्ध करून दाखवलं आहे. यातील सर्वांनी याच तंत्राचा वापर करून, प्रकाश व ध्वनी यापेक्षाही अत्यंत वेगवान असा, मनाच्या वेगाचा वापर करून, कक्षा भेदून, त्या उच्च स्थानाप्रत जाण्याचे प्रयोग सप्रमाण सिद्ध केले आहेत.
हे सर्व तंत्रज्ञान, मंत्रबद्ध, स्तोत्राबद्ध करून मांडता मांडता यापैकी अनेकांना ही गोष्ट जाणवली वा लक्षात आली, किंवा दुरदृष्टीला दिसलं की, बदलत्या काळात आणि पुढील कित्येक वर्षातील प्रगतीत वा अधोगतीत, या शास्त्रशुद्ध तंत्राचा वापर सर्वांनाच करायला, प्रत्यक्षात जमेल याची शाश्वती नाही. बदलणाऱ्या काळाच्या स्वरूपांना, युगांच्या संज्ञा देऊन व युगांची परिमाणं लावून, भविष्याचं विश्लेषण करताना लक्षात आलं की, अनेक प्रकारचे सांस्कृतिक बदल वा स्थित्यंतरं होणार आहेत.
परंतु या सर्व बदलातसुद्धा उपयुक्त ठरेल आणि शास्त्रात सिद्ध झालेली, अतिरिक्त ऊर्जा निर्मिती करून, त्या अतिरिक्त शक्तीच्या वापराने, आत्मा या वातावरणाला भेदून, विधात्यापर्यंत किंवा ब्रह्मांडात कुठेही भ्रमण करायचा असेल तर, एखादं सर्वकालीन साधन असावं. ते साधन, त्याचं तत्व आणि तंत्र, त्याचा उपयोग, त्याची उपयुक्तता, सिद्धता, यावर उद्याच्या लेखात चर्चा करू. पण हे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान व इंधन वापरून, ऊर्जानिर्मिती करून, यानाच्या द्वारे, पंचमहाभूतरुप आकाश कक्षा भेदून जाण्याच्या वरील विवेचनाचं चिंतन करा, बाकी उद्याच्या लेखात बघूया.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२४/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment