भोग आणि ईश्वर २२३
सर्वधर्मान्, परित्यज्य, माम्, एकम्, शरणम्, व्रज,
अहम्, त्वा, सर्वपापेभ्यः, मोक्षयिष्यामि, मा, शुचः।।१८:६६।।
ह्या श्लोकात इतक्या स्पष्टपणे वचन दिल्यानंतर, त्या वचनाच्या पूर्ततेसाठी पूर्ण हमी देताना, प्रभू स्वतः शेवटी सांगतात की, मा, शुच:. एखादी वडीलधारी व्यक्ती एखाद्या लहान वा कमी वयाच्या मुलाला, एखाद्या अपरिचित कर्माबद्दल वा मार्गाबद्दल सांगत असताना, त्या लहान वयाच्या मुलाच्या किंवा व्यक्तीच्या डोळ्यात साशंकता, भीती पहात असेल तर सर्व सांगून झाल्यावर , त्याच्या डोळ्यात पहात, पाठीवर हात थोपटत ती व्यक्ती सर्वात शेवटी एक आत्म्यातून आत्म्याला, नजरेतून नजरेला , एक आश्वासन देते.
ते आश्वासन म्हणजे, तू घाबरू नकोस, चिंता करू नकोस, या सर्व मार्गात मी आहे तुझ्या सोबत, तू फक्त, मी सांगितलं त्याप्रमाणे, चालायला सुरवात तर कर. इतका आश्वस्त हात आपल्याला मार्ग सांगून, आपल्या पाठीवर थाप मारून सांगतो, तो फक्त आणि फक्त एका प्रेमळ मातेसमान किंवा पित्यासमान व्यक्ती वा व्यक्ती समान असलेल्या एखाद्याचाच असू शकतो.
जगतपिता, जगतपालक या नात्याने विश्वाच्या पालनाची, पूर्ण जबाबदारी, त्रिदेवातील एक आणि सर्वात मोठी जबाबदारी श्रीकृष्ण रूपातील, श्रीमहाविष्णूंकडे आहे. याची जाणीव त्यांच्या प्रत्येक कृतीत आहे. जगताच्या कल्याणासाठी अनेक रुपात प्रकटून, विश्वासाठी अनेक त्रास, भोग भोगण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे.
आपल्या भक्तांच्या रक्षणार्थ अनेक असुरांना व पापी महापापीना योग्य ती शिक्षा देण्याची क्षमता आहेच, पण महाभारत पर्वानंतर , ज्या यादवांना बल व शक्ती प्रदान करून त्यांच्यामार्फत, जरासंध, शिशुपाल यांच्या सह अनेक दुर्जनांचा निःपात केला. तेच यादव , कलियुगाच्या प्रभावाने, पृथ्वीला भार होऊन, विजयाच्या यशाच्या धुंदीत मदमस्त होतील, ही काळाची पावलं ओळखून, त्याच यादवांना आपापसात लढवून, कलियुगाच्या प्रारंभा आधीच पृथ्वीवरून नष्ट करण्याची क्षमता फक्त आणि फक्त, आत्मीयता असलेल्या पालकातच असते.
असा पालक जो प्रसंगी आपल्या पुत्रांच्या रक्षणार्थ धावून येऊ शकतो, प्रसंगी त्याच पुत्रांना वळण लावण्यासाठी श्रीमद्भागवद्गीतेसारखं, सर्व वेदांचं सार घोळवून, पाजू शकतो, कर्तव्याच्या पथावर चालताना पांडवांच्या चुकी मुळे त्यांच्या वाट्याला आलेले वनवासाचे भोग भोगण्याची शक्ती दिली, पण भोग कमी नाही केले.
म्हणजेच तो भोळा भक्त असेल तर प्रसंगी त्या परम भक्ताला हृदयात स्थान देईल, कर्तव्याच्या मार्गावर चालायचं धैर्य देईल, त्या मार्गाला सुलभ करण्याचा मंत्र देईल आणि सर्वसमर्पण करून चरणी शरण आलेल्या भक्तांना पापमुक्त करण्याचं आश्वासनच देत नाही तर, पाठीवर हात ठेवून, मा शुच: अर्थात घाबरूही नकोस किंवा चिंतासुद्धा करू नकोस, मी आहेच, हा विश्वास देखील देतो.
अश्या या भक्तप्रेमाला भुकेला असलेल्या, त्यासाठी पृथ्वीवर अठ्ठावीस युग विटेवर उभा राहू शकणाऱ्या, ईश्वराच्या या विश्वासाखातर आपण सर्व भाव, वासना, मोह, लोभ हे मार्गातील शत्रूंना बाजूला सारून, शरण जाऊ. त्यानंतरचं सर्व योगक्षेम पाहून, आपल्याला मोक्षा प्रत नेण्यास, श्रीयोगेश्वर सर्व रुपात व सर्व तत्वात समर्थ आहे, याची खात्री बाळगा. आपण एक पाऊल पुढे टाकलं, तर पुढे सावरायला तो नक्की असेलच. म्हणून समर्पण भावाने शरणागत होऊन, नाम घ्या, नाम सर्व सागर पार करून नेईल.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
११/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment