भोग आणि ईश्वर २२९
एका अर्थाने निष्ठा व समर्पण वा शरणागत असणं, हा भक्तीचा एक उत्तम पाया आहे. आता पाया म्हटलं की, पहिली गोष्ट तो सुरवातीलाच बांधला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो जितका मजबूत, तितकीच त्यावर उभी राहिलेली इमारत, मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारी असते. म्हणून इमारतीचा पाया बांधताना विशेष काळजी घेतली जाते आणि पुरेसा वेळ व उत्तम साहित्य वापरलं जातं.
याच नियमाने आपल्या आध्यात्मिक, आत्मिक उन्नती साठी निष्ठा आणि शरणागती या दोन पायांना पूर्ण सक्षम व मजबूती यावी यासाठी, आपण स्वतः विशेष काळजी घेतली पाहिजे. आपली साधनेतील निष्ठा ही किती दृढ आहे, याची परीक्षा , ही भोगांचा व दुःखांच्या काळात होते.
कारण कर्माने आलेले भोग भोगताना व दुःख सहन करताना, आपण त्यात ईश्वराला वा सद्गुरूंना किती दोषी मानतो अथवा मनाने कणखर व खंबीर राहून, सर्व भोग दुःख हे आपलंच कर्मफल आहे हे जाणून, त्याही परिस्थितीत आपली साधना, त्याच दृढतेने पुढे नेतो, यावर आपल्या निष्ठेची पातळी पारखली जाते.
मुळातच आपल्या कर्मातील दोष, साधना करत असताना जास्त प्रकर्षाने पुढे येत असतील, तर ते वास्तविकपणे, उत्तम लक्षण आहे. कारण कर्माचे भोग हे जितक्या लवकर भोगून जातील, तितक्या लवकर आपली साधना व भक्ती यांचा मार्ग, निर्धोक होत जाईल. याव्यतिरिक्त जीवन हे चक्राप्रमाणे आहे. कारण काळसुद्धा चक्राकारच फिरतो. त्यामुळे सुख आणि दुःख हे एकामागून एका क्रमाने येणारच, हे ध्यानात ठेवलं पाहिजे.
मुळातच साधना व भक्ती यांचा उद्देश मन बुद्धी व आत्मा यांची शुद्धता साधून, आत्म्याला या देहातून जाताना पुढील देह, उत्तम प्राप्त होवो, हा असल्यामुळे, कर्माचे, संचितातील आणि या जन्मातील जितके दोष, भोगून व सहनशीलतेने जाळून नष्ट होतील, तितका अंतरात्मा पवित्र व शुद्ध होत जाईल, हे निश्चित ध्यानात ठेवावं.
एक उदाहरण घेऊ. पाणी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत, पाणी अनेक माध्यमातून, अनेक प्रक्रियांमधून व अनेक कसोट्यांमधून पार झाल्यावरच ते शुद्ध होऊन आपल्या पर्यंत पोहोचतं. जे पाण्याचं, तेच जीवनासाठी आवश्यक हवेतील प्राणवायूचं. तो सुद्धा पुरेसा शुद्ध असावा असं शास्त्र सांगतं.
जर पाणी आणि प्राणवायू पुरेसे शुद्ध नसतील तर, या देहाला अनेक प्रकारच्या व्याधी जडतात. किंवा उपलब्ध संशोधनानुसार हवा, पाणी व अन्न यांच्या अशुद्धतेतूनच बरेचसे रोग वा व्याधी जडतात आणि पसरतात सुदधा. म्हणून या तिन्हींच्या शुद्ध असण्यावर या देहाची व त्याद्वारे सुदृढ आयुष्याची गती अवलंबून असते. हे पाणी व हवा मूळ स्वरूपात शुद्धच आहेत आणि या शुद्ध पाणी व हवा यांच्याद्वारे तयार झालेली भाजीपाला, फळे इत्यादी मूलरूपात शुद्धच असणार. पण जगातील इतर व्यवहार त्यांना अशुद्ध करतात. म्हणून त्यांच्या शुद्धते साठी माणूस विशेष व्यवस्था, प्रक्रिया व खर्च करतो.
आता यावरून एक गोष्ट ध्यानात येईल की, ईश्वराकडून आलेली, मानवी कल्याणासाठीची प्रत्येक गोष्ट ही, शुद्धच असते. जगताच्या व्यवहारात, ती गोष्ट अशुद्ध होत जाते. नन्तर त्यावर शुद्धीप्रक्रिया करूनच ती शुद्ध स्वरूपात, प्राप्त करावी लागते. जर हे जड व विनाशी जगतातील वस्तुंना लागू होते, तर ज्या परम शुद्ध अविनाशी तत्वातून या देहात आत्मा येऊन स्थिरावतो व जन्मोजन्मी अनेक देह धारण करून, देहाच्या, मनाच्या व बुद्धीच्या संस्कारा तून अशुद्ध होत जातो, तो आत्मा परम तत्वाकडे पुन्हा पाठवण्याआधी, किती शुद्धीप्रक्रिया करायला हवी.
या शुद्धीकरणावर विस्ताराने उद्या चर्चा करूया. पण तोपर्यंत नाम घेतच रहा. अंतरात्मा, परमात्म्याला जोडण्याच्या प्रक्रियेतील महत्वाची प्रक्रिया म्हणजे नाम आहे, हे ध्यानात असुद्या.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१७/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment