भोग आणि ईश्वर ९९ आपण मागील काही भागात मनात नाम घेऊन ते ऐकण्याचा अभ्यास केला. तिथपर्यंतच्या पायऱ्या जमत असतील वा जमल्या नसतील तर जमतील. त्यामुळे आज आपण त्याच्या पुढच्या पायरीचा विचार करूया. इथपर्यंत आपलं वैखरी नाम आता बंद झालंय. ( हा प्रयोग बाकीचं नित्याचं नाम वा जप सुरू ठेवून करायचा आहे) आपण मनात नाम घेत आहोत. आता हेच नाम आपण पूर्ण मनात जाऊन वा मनाच्या कोषात शिरून घेत आहोत असं समजा. आता इथे, जर तुमची एकाग्रता पूर्ण साधली गेली, अगदी काही क्षण, तर तुम्हाला बाहेरचा कोणताही आवाज येणार नाही. फक्त तुम्ही आणि नाम. त्या मनात चालू असलेल्या नामाच्या लहरींचा कोष, हळूहळू तुमच्या भोवती गुंफला जातोय. या मनातून आलेल्या लहरी, वैखरीने केलेल्या जपापेक्षाही जास्त परिणामकारक असतात. जसं एखाद्याने मनातून आशीर्वाद दिला किंवा मनातून राग व्यक्त केला तर तो जास्त परिणाम करतो, त्याचप्रमाणे. कारण जेंव्हा एखादी व्यक्ती कोणतीही भावना व्यक्त करते, तेंव्हा तिचं अस्तित्व त्या व्यक्तीच्या मनातून संपतं. पण जेव्हा एखादी व्यक्ती कोणतीही भावना व्यक्त करत नाही, त्यावेळी त्या भावनेची ऊर्जा शक्तीस्वरूपात मनात साठवल...