Skip to main content

भोग आणि ईश्वर ९७

भोग आणि ईश्वर  ९७
 
गेल्या भागात आपण सद्गुरूमहतीवर चर्चा करत होतो. खरतर मी यावर सांगणं म्हणजे विजेरीने(बॅटरी) सूर्य दाखवण्यासारखं आहे. सद्गुरू ही विश्वनियंत्याने आपल्या परमदयाळू अंशाचा, जगतोद्धारासाठी विणलेला तो कोष आहे, ज्यामध्ये साधक हा परम सुखाचा आणि परम आनंदाचा अनुभव घेतो. गुरुकृपा ही अशी पायरी आहे, जी, कित्येक जन्मांच्या साधनेची परिणती आहे. 

मायाकाराने जगताबरोबर माया निर्माण करून, मोक्षाचा मार्ग खडतर नाही तर, जवळजवळ अशक्य केला, सर्वसामान्य माणसांसाठी. परंतु या मायेला चकवून, सामान्य जनांना, पुनः मोक्षप्राप्तीच्या मार्गावर सुलभपणे वाटचाल करता यावी आणि  मायेचे अडसर वा अडथळे, ष्टविकारांचं जाळं, आपल्याच कर्मगतीचे भोग, यातून आधीच बिकट झालेल्या या मार्गाकडे, जाण्याचीदेखील पात्रता नसलेल्या व संसाराच्या बंधनात जखडलेल्या, मार्गभ्रष्ट जीवांना, मोक्ष मुक्तीच्या मार्गावर पुनः आणण्यासाठी ईश्वरी कृपेची परमोच्च देणगी आणि निर्मिती म्हणजे गुरूपद. 

मुळात या मार्गभ्रष्ट आणि लक्षलक्ष योनी भरकटत असलेल्या जीवाला मानवी देह प्राप्तीसाठी माता आणि त्यानंतर त्याच जीवाचा उद्धार करून, त्याला मुक्तीच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी, त्याचं मन आणि आत्मा यांना सोबत घेऊन,त्या जीवाला अज्ञात असलेल्या आणि ज्ञात असूनही अवघड, गूढ व गुह्य ज्ञानाची प्राप्ती, लीलया करून देण्यासाठी विश्व नियंत्याने दुसरी माय अर्थात सद्गुरू निर्मिती करून, एक प्रकारे जीवाला सर्वकाही सुलभ करून दिलं. 

यापेक्षा अधिक अतीव कृपा जगतपिता काय करू शकतो. या मार्गावर साधकांना, फक्त आपल्या सद्गुरूंवर श्रद्धा, विश्वास ठेवून, धीर धरून, वाटचाल करायची आहे. साधकाचं कर्म, फक्त गुरूंनी सांगितलेली साधना करत राहणं आणि त्या मार्गात काहीही अडचणी, बाधा, अडसर, मोहमायेचे क्षण, सुख दुःखाचे प्रसंग, यातील काहीही आलं तरी सद्गुरुंवरील श्रद्धा दृढ ठेवून व ती ढळू न देता, फक्त आपली साधना करत राहणं, हे ध्येय व लक्ष डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे.

सद्गुरुकृपा ही अशी भेट आहे जी, साधकांना त्यांच्या साधनेची फलरुप  प्राप्ती म्हणून मिळते, ज्यायोगे अनंत जन्मांच्या पापांचे पर्वत क्षणात नष्ट होऊ शकतात, कित्येक जन्मांचे भोग क्षणार्धात संपून जातात, अनेक जन्मात न प्राप्त होऊ शकणारी पुण्याई एका जन्मात प्राप्त होते. गुरुकृपा ही अशी ठेव आहे, ज्याच्या प्राप्तीने, प्रत्यक्ष परमेश्वराला अशक्य अशी नियती, संचित आणि प्रारब्ध यांच्या पोलादी भिंती क्षणात गळून पडतात आणि साधक एकाच जन्मात कित्येक जन्माचं पुण्य प्राप्त करून, मोक्षाच्या मार्गावर कित्येक योजनं अग्रेसर होतो. 

परंतु त्यासाठी साधनेची चिकाटी आणि सद्गुरुंवरील विश्वास ढळू देता कामा नये. यात क्षणमात्र आलेली शंका अनेक जन्मांची साधना नष्ट करू शकते. आपले भोगत असलेले भोग, सुलभ करण्याचं कार्य, प्रत्येक सद्गुरू करतातच. परंतु जर त्यात सद्गुरू काही साहाय्य करत नसतील तर, ते भोग भोगून संपवण्यातच आपलं हित आहे आणि हे सद्गुरु योग्यप्रकारे जाणतात हा विश्वास दृढ ठेवावा. ज्याक्षणी त्यांना वाटेल की आता यातून साधकाची मुक्तता व्हावी, त्यावेळी, क्षणात ते मुक्तीचा मार्ग अथवा त्यासाठीच्या योग्य व्यक्तीची आपल्याशी भेट घालून देतात. 

त्यामुळे भोग भोगण्यात आणि त्यातून सुटका होणं या दोन्हीत त्यांचीच कृपा आपल्या कामी येते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे साधनेचा जोर, कुठेही मनातील दुःख व शंका यामुळे, कमी होणार नाही, हे लक्षात ठेवावं.  कारण क्षणमात्र शंका घात करू शकते. त्यामुळे साधना हेच आपलं कर्म आणि मर्म आहे हे ध्यानात ठेवावं.

खरतर सद्गुरूमहती, ही जन्मोजन्मी गायली, तरी ती कमीच पडेल. पण आज या इथे विराम घेऊ आणि उद्याच्या भागात पुनः भेटू. तोपर्यंत  नामात रहा, मी आधीच्या भागात सांगितलेल्या पाच पायऱ्यांचा अभ्यास करा, गुरुवंदन करा, नित्य नाम घ्या, तेच तुम्हाला तारणार आहे. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०७/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...