Skip to main content

आत्मचिंतन भाग ५

आत्मचिंतन भाग ५
 
मृत्यू पश्चात आपला हिशोब कसा असावा, याचा विचार माणूस तोपर्यंत करत नाही, जोपर्यंत मृत्यू साक्षात समोर येत नाही. कदाचित त्याही वेळी, हाच विचार मनात येत असावा की,मी काय कमावलं किंवा काय गमावलं म्हणजे पुन्हा बेरीज वा वजाबाकी. म्हणजे पुन्हा व्यापारी हिशोब. पण हा व्यापारी हिशोब वरती किंवा जिथे कुठे ही कर्माच्या हिशोबांची उजळणी होते, त्या ठिकाणी होत नाही. तर तिथे किंवा त्या व्यवस्थेत, कर्म, ज्ञान आणि भक्ती, या तीनच मोजमापात आत्म्याच्या त्या देहातील जन्माचा हिशोब होतो. 

त्यावर आधीच्या संचीतातील किती ठेव वा देणी शिल्लक आहे, ते मिळवून, एकूण ताळेबंद मापला जाऊन, त्यातून पुढे या जीवाला काय भोगायचे किंवा उपभोगायचे आहे ते काढले किंवा ठरवले जाते. म्हणजे आपण एखाद्या जन्मात मौज मजा आणि नुसती धमाल केली असेल तर, त्यानुसार आधीच्या संचीतातील ठेवीमधे घट होऊन, पुढील जन्मी फक्त आणि फक्त भोग अर्थात देणी शिल्लक राहू शकतात. 

नक्कीच आपल्यासमोर, आत्मा देह सोडून गेल्यावर, हा हिशोब, होत असणार. म्हणजे तिथे आपल्याला नक्कीच आपल्या त्या आणि आधीच्या जन्मांची शिलकी समजत असेल. चैतन्य रुपात असलेल्या आत्म्याला, हे ज्ञान व ही जागृती सदैव असते. पण ही जागृती कुठपर्यंत असते तर, देह धारण करू तोपर्यंतच. पण देह धारणे पश्चात पंच महाभूत रूप देहाला, माया ग्रासून, सर्व स्मृती मागे जातात. 

म्हणजे त्या स्मृती असतात पण त्या स्मृतींच्या ठेवी, आत्म कोषात, विरघळून जातात. त्यामुळे जीव या जगतात हरवून, आपल्या देहातील कर्तव्य, वासना भाव यांमध्ये गुरफटून जातो. पण त्या स्मृती चाळवळ्या गेल्या तर, तर नक्कीच त्यांना गती मिळून, त्या आत्मकोषाच्या वरच्या पातळीवर येऊ शकतात. कारण शेवटी त्यांना तिथे लहरी वा स्पंदन रुपात साठवण्यात आलेलं असतं. त्यामुळे लहरींना लहरीच, स्पर्शून, त्यांना, चेतवण्याचं काम करू शकतात. 

पण त्यासाठी तितक्याच शक्तिवान लहरी, उत्पन्न करता आल्या पाहिजेत. कारण त्यांची साठवण ही आत्म्याच्या परमोच्च कोषात अगदी आत असल्या मुळे, त्या अत्यंत शुद्ध आणि सात्विक रुपात असतात. त्यामुळे त्या कोषा पर्यंत पोचण्यासाठी,मनाची, बुध्दीची व देहाची, तितकीच शुद्धता आत्म्याला साधता आली पाहिजे. त्यासाठी यम नियम, शास्त्र, विधी,साधना इत्यादींची व्यवस्था करण्यात आली. त्या सर्व साधनांद्वारे, आत्मयज्ञ साधावा लागतो. 

याचं महत्वाचं कारण आत्म्यावर साठलेली किंवा जमा झालेली, अनेक जन्मातील संस्कारांची पुटं, सहसा साधनेशिवाय निघत नाहीत. त्यासाठी साधनेची जोड असावी लागते.ही अनेक जन्मांची अस्वच्छता, काढायला आणि आत्मतत्व उजळून यायला, तप घडावं लागतं. त्यासाठी भोगांची देणी धुवून काढावी लागतात आणि उपभोगांची येणी रीती करावी लागतात. 

आता या चक्राला भेदण्यासाठी काही प्रयत्न आवश्यक आहेत. अन्यथा प्रत्येक जन्मात मृत्यू पश्चात, आपल्या, ताळेबंदात, येणी व देणी यांचा असमतोल असणारच आणि त्यासाठी पुन्हा भुलोकी येणं आहेच. कारण हे मर्त्य जगत हा एकच असा फासा आहे, जो देणी व येणी फेडून घेतो. बरं यात मोठी गुह्य बाब ही आहे की, कर्महिन वा अकर्मी सुद्धा राहता येत नाही. 

मग काय करायचं, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. 

©® संकल्पना आणि लेखन: प्रसन्न आठवले
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
२८/१०/२०२३

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...