Skip to main content

आत्मचिंतन भाग १

आत्मचिंतन भाग १ (नवीन मालिका) 

खरतर मृत्यू आणि त्या पलिकडील जगत हा अनंत कल्पनांचा विषय आहे. ज्याची कल्पना मानवी मनाच्या उद्दाणा पलीकडे आहे. मानवाचा प्रवास हा सप्तलोकां तून स्वर्ग लोकाकडे होतो. पण कर्माच्या गतीनुसार तो, सप्त पाताळ या कडे सुद्धा होऊ शकतो.भुलोकीचं जीवन हा या अनंत प्रवासातील, मात्र एक टप्पा आहे. पण त्यातच अनेक जीव इतके गुरफटून गेलेले असतात की, त्यांना पुढच्या प्रवासासाठी, वेळ, विचार आणि कर्म, तीनही, असाध्य असतं. 

मानवी देहातील जन्मात इंद्रिय, अवयव, बुद्धी, देह, वाचा जिव्हा इत्यादी कर्म इंद्रिय आणि ज्ञान इंद्रिय प्राप्त असतात. त्याचा उपयोग जास्तीतजास्त ग्रहण करून, जतन करत, कर्माचा आलेख पुढे पुढे न्यायचा असतो. हा कर्माचा आलेख जितका चढता असेल (अर्थात उच्च पातळीवर जाण्यासाठी) तितका त्या देहातील आत्मा, पुढच्या पायरीकडे जाण्याची शक्यता आणि शाश्वती अत्याधिक असते. मानवी जन्मात. दिलेली कर्म, ज्ञान इंद्रिये, बुद्धी, मन ही विस्तारित इंद्रिये, पुढील कोणत्याही स्थितीत वा अवस्थेत असतं नाहीत.

म्हणजेच याचा दुसरा अर्थ हा की, मानवी देहाच्या सहाय्याने, मानवी देहातील मन व त्याला जोडलेला आत्मा, जे काही ग्रहण करू शकेल, तेच आणि तितकच, प्रत्येक आत्मकोषाला पुढच्या प्रवासाची शिदोरी म्हणून, कार्याला येतं. याचा अर्थ, आपण या देहात असताना, जे प्राप्त करू शकू किंवा प्राप्त करतो, त्याच आधारावर आपला आत्मा, देहातीत असतानाचा किंवा देहाबाहेर पडल्यानंतरचा प्रवास आखु शकतो. 

म्हणजे लक्षात घ्या, की आत्म्याला, देह सोडून गेल्यानंतर, उपलब्ध असलेल्या किंवा अनेकानेक जन्मात प्राप्त केलेल्या मर्यादित ज्ञान, कर्म व भक्ती या तीनही मार्गांनी हाती आलेल्या आणि मनोमय कोषात अर्थात अंतर्मनात साठवून ठेवलेल्या, शिल्लक असलेल्या,ज्ञानाच्या आधारा वर अवलंबून राहणे गरजेचे आहे. म्हणजे त्या स्थितीत त्या आत्म्याला, साऱ्या गत जन्मातील प्रवासाचा, वाया घालवलेल्या संधीचा व संधी असून माया, काम क्रोध यापायी वाया घालवलेल्या साधन व संधीचा किती पश्र्चाताप होत असेल. नक्कीच होत असणार. पण याची कल्पना आपल्याला आता देहात असताना येणार नाही. 

कारण तिथे ग्रहण, साठवण, या दोन्ही क्रिया उपलब्धच नाहीत. आहे ते फक्त, उपयोग करणे आणि त्यायोगे, त्या स्थितीतील प्रवासात, पुढे जाण्याचा प्रयत्न करणे. कदाचित यामध्ये कर्माने आलेले प्राक्तन, संचित, हीच शिदोरी असते. ज्ञान प्राप्ती न करता वृथा अज्ञान ग्रहण व जतन केलं असेल, तर नक्कीच ते त्या स्थितीत घातक ठरते. वेळीच ज्ञानाची न जमा केलेली शिदोरी वा पूंजी, त्यावेळीं मारक ठरते. आता हे ज्ञान श्रवण, किर्तन, स्मरण, शरण, अर्पण यांपैकी कोणत्यातरी मार्गाने प्राप्त केलेलं किंवा झालेलं असणार. 

म्हणून म्हणतात की, काही नाही म्हटलं तरी कानावरून गेलेलं ईश्वराचं स्मरण वा चिंतन हेसुद्धा पुण्यकारक आहे. म्हणजेच कर्म ज्ञान व भक्तीने प्राप्त पुण्य अथवा या अभावी घडलेलं पाप हीच आत्म्यासाठी पुढील प्रवासाची शिदोरी असाणार. कारण. या मर्त्य लोकी प्राप्त ज्ञानाचा उपयोग, फक्त या जगतात आणि या जगतापुरता उपयोगी आहे. 

त्यावेळी अनेक गोष्टी, स्मरतात, अनेक पश्चाताप होतात. ज्यांचा त्यावेळी काहीही उपयोग नसतो. म्हणजे या देहात असताना, काय व कोणती ज्ञान, कर्म व भक्तिरुप शिदोरी साठवली पाहिजे, यावर चिंतन उद्याच्या भागात करूया. आज इथेच थांबू.

©® संकल्पना आणि लेखन: प्रसन्न आठवले
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
आश्विन शुद्ध दशमी अर्थात विजयादशमी म्हणजेच दसरा, शके १९४५. अर्थात २३/१०/२०२३

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...