Skip to main content

अध्यात्म विराम १०४

अध्यात्म विराम १०४
 
आपण आता भागवत धर्माचा विचार आणि चिंतन करत आहोत. वास्तविक भागवत धर्म म्हणजे वारकरी आणि श्री विठ्ठल हे एक  अतूट नातं असलं आणि  संत सज्जन व लाखो वारकरी यांनी, आज शेकडो वर्ष, अविश्रांत त्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं असलं तरीही, भागवत धर्म म्हणजे एकाचवेळी सामुदायिक व व्यक्तिगत भक्तीचा एक अनोखा संगम आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन होऊन आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी शेकडो मैल वाट पायी तुडवत, वर्षानुवर्षे आपले श्वास त्यासाठी वेचणं हा भक्तीचा एक अद्भुत दाखला आहे.

अनेक संत महंतांच्या पालख्या व त्या पालख्यांमधे लाखो वारकरी, आपल्या भक्तीचा, भक्तीतील आत्मयोगाचा मनाच्या गुंतवणुकीचा आणि वैराग्य व विरक्ती यांचा एक विश्व रूप साक्षात्कार पेश करतात. वृत्तीचं वैराग्य, मनाचा निश्चय, विचारांची एकतानता, भक्तीची अद्भुतता हा या भागवत धर्मीय भक्तांचा खरा आत्मा आहे. अनेक संत महंत याना मानणारे, लाखों भक्तजन, चंद्रभागेच्या तीरा वर, फक्त आपल्या विठु रायाच्या एका दृष्टीनेही नव्हे तर कळस दर्शनाने सुद्धा आपली वारी सार्थकी लागली, यात धन्यता मानतात. 

त्यावेळी तिथे जमलेल्या, भक्तिरसात आकंठ बुडालेल्या अनंत आत्मजीवांना, आपल्या आत्म्याचा मूळ अंश, परम आत्मा सखा पांडुरंग प्रत्यक्ष भेटल्याचा अवर्णनीय आनंद मिळतो.त्या अनोख्या,अद्भुत भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या आणि तहानभूक विसरलेल्या लाखो जनांच्या या महासागराचा प्राण एकच असतो. म्हणजे अनेक देहात एकात्म रुपात प्रकट झालेल्या, त्या वैकुंठात वास करणाऱ्या, श्री विष्णुने भक्तांच्या आग्रहाखातर, नव्हे भक्तांच्या प्रेमाखातर, धारण केलेल्या सावळ्या विठाईत, आपली माय बाप बघणाऱ्या वारकरी जनांना आत्मरुप,  आत्मानंद, आत्मसंतोष, आत्मस्वरूप दर्शनयोग प्राप्त होतो.

नव्हे त्या अनेक आत्म्यांना एकच नामरुपात, सांक्षीरुपात, संयम रुपात, निज भक्तीच्या संगमी न्हाताना पाहून, वैकुंठात वास करणारा प्रत्यक्ष ईश्वर सुद्धा, भुलोकी येऊन धन्य होत असेल. नवविधा भक्तीच्या अनेक पायाऱ्यांना स्पर्श करणाऱ्या आणि भक्त व भगवंत यांच्या दास्य व सख्य रूप भक्तिचं एकाचवेळी दर्शन करवून देणाऱ्या, या भागवत धर्माच्या ध्वजेची धुरा,अशीच वाहती ठेवण्या साठी,भक्तवत्सल पांडुरंग, स्वतः सुद्धा अंशरूपात अवतरित होऊन संत सज्जन रुपात भक्तांच्या या भक्तीला हातभार लावतो.

म्हणजेच स्वतःच्या भक्तांनी, माझी भक्ती करावी, ह्या विचाराने नव्हे तर, त्यांच्या भक्तीने बांधले जाऊन, त्यांच्या भक्तीला बांध येऊ नये किंवा खंड पडू नये म्हणून आणि त्यांच्या इश्वरावरील प्रेमाने बद्ध होऊन, त्यांची ऊर्जा, शक्ती, भक्ती व जागृती कुठेही कमी पडू नये व त्यांना आपला भक्तिमार्ग स्वयम् स्फूर्तीने पुढे नेता यावा आणि त्यातील अडथळ्यानी त्यांची ऊर्जा, चेतना कुठेही मंद होऊ नये, यासाठी स्वतः पांडुरंगाने, अनेक प्रकारे सहाय्य केल्याची, शेकड्याने उदाहरणं आहेत. हे आधुनिक काळातील सख्य भक्तिचं जिवंत व ज्वलंत उदाहरण आहे, असं माझं स्वतःचं सुद्धा मत आहे.

भागवत धर्माबद्दल अजूनही बरच काही चिंतन योग्य आहे. म्हणून हाच विषय उद्या पुढे सुरू ठेवू. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१२/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...