Skip to main content

अध्यात्म विराम ९६

अध्यात्म विराम ९६

देहाच्या बाबतीत आपल्या हिताच्या आड येणाऱ्या अनेक गोष्टी आपण, भावनिक न होता, बाजूला सारून पुढे जातो. कारण अनेकदा आपल्याला त्यातील भौतिक प्रगती, विकास व लाभ दिसत असतो किंवा जाणिवेत असतो. आत्मिक प्रगतीच्या या द्वैतावर किंवा या संघर्ष काळात, बुद्धी, प्रेराणा वा चेतना ही अनेक गोष्टींवर अवलंबून आहे, हे आपण पाहिले. अनेक गोष्टीतून पुढे जाणारा हा संघर्ष जन्मोजन्मीचं हित आहे आणि ते साधलं पाहिजे, ही सुप्त आत्मजागृतीची जाणीव करून देतो. म्हणजेच आपले आत्महित कशात आहे,याची जाण येऊन,तसं करण्याची इच्छा व क्रिया यांच्या संयोगातून घडतं. कोणत्याही बाबतीत तयार उत्तरं, जीवनात नसतात. या बाबत सुद्धा, तीच स्थिती असते. 

इथे आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, भौतिक जगतात प्रगती व लाभ यांसाठी आपण, प्रसंगी भावना बाजूला ठेवून, अनेकदा जसे, दृढ व संयमी निर्णय घेऊन, ते अंमलात आणतो, तसे निर्णय किंवा तशी दृष्टी ही आपल्याला आत्मिक प्रगतीत दिसत किंवा दृष्टीत येत नाही. याचं महत्वाचं कारण, देहाची दृढ भावना, देह म्हणजेच मी, ही वृत्ती व दृष्टी, भौतिक जगत हा परीघ सोडू देत नाही. 

पण अशी किंवा त्या मार्गाची दृष्टी आणि वृत्ती असलेले, सद्गुरू नामक ईश्वर प्रतिनिधी, देहरुप धारण करून, ईश्वराच्याच प्रेरणेने व कृपेने, या भूतलावर देहात व देहापश्र्चात चैतन्यमय स्वरूपात या लोकी, वास करत असतात. यांना प्रत्येक जीवात्म्याचा अध्यात्मिक विकास, प्रगती व गती, यांचा आलेख ज्ञात असतो व तो तपासून, त्यां जीवांना, आत्मिक प्रगतीच्या विशिष्ट टप्प्यांवर, विशिष्ट समयी, अनेक रुपात सहाय्य करतात. म्हणजेच त्या प्रत्येक जीवाच्या, हिताची चिंता करतात आणि त्यांच्या हिताचा भार वाहतात. 

याच हिताच्या भार वाहनात, सद्गुरू किंवा ईश्वर प्रसंगी, आत्मिक प्रगतीच्या आड येणाऱ्या भौतिक भावनिक गोष्टींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात. कारण तसं न केल्यास,त्या देहातील आत्म्याचा विकास खुंटतो किंवा त्यात बाधा निर्माण होऊ शकते. काही भोग हे भोगून संपवणं, जीवाच्या हिताचं असतं. म्हणून आपण अनेक प्रसंगांत भोग भोगत असताना, त्यावेळी, जर ईश्वर किंवा सद्गुरू यांना ज्ञात असेल, की हे भोगून संपवणं, त्या आत्म्याच्या हिताचं आहे, तर त्या प्रसंगात आपल्याला नैतिक व आत्मिक बळ देऊन, त्या प्रसंगात धीराने बाहेर पडण्यासाठी ते नक्की अप्रत्यक्षरीत्या सहाय्यभूत होतात. 

म्हणजेच आपल्या आयुष्यातील भौतिक व आत्मिक द्वैतात, आपण आत्ममार्गी होऊन, किंवा ईश्वर व सद्गुरू यांच्यावर निष्ठा पूर्वक,श्रध्देने,विश्वास ठेऊन,पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.कारण कधीकधी देह झिजवून, देहाला कष्टवून आत्महित साधण्याचा विशाल, दूरगामी दृष्टी व दृष्टिकोन सद्गुरू व ईश्वर आपल्याला संकेत रुपात सांगत असतात. अश्या अनेक प्रसंगी, आत्मिक बुद्धीचा वापर करून, देह व त्या देहाभोवती गुंतलेली, बुध्दी व मन यांना आवर घालणे, हितावह ठरते. 

म्हणजेच यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की, दूरगामी विचार करणारे ईश्वर व सद्गुरू हे आपले खरे हीतेशी आहेत किंवा असतात. म्हणजेच हित पाहणारा, कोणत्या दृष्टीने व जाणीवेने आपल्याला प्रत्यक्ष वा सांकेतिक भाषेत व स्वरूपात सहाय्य करत आहेत वा असतात,हे जाणण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे. त्यासाठीच हित या शब्दाचा खरा अर्थ,समजून व जाणून घेऊन, तद्नंतर योग्य अयोग्य याचा निर्णय घेतला पाहिजे. 

या बाबतीत, विधीचे, सद्गुरुंचे सांकेतिक संदेश वा प्रासंगिक परिभाषेत केलेलं सहाय्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे. त्यासाठी आत्मिक बुद्धी जागृत झाली पाहिजे. याच विषयाला उद्याच्या भागात पुढे नेण्याचा प्रयत्न करत राहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...