Skip to main content

भोग आणि ईश्वर ५०१

भोग आणि ईश्वर  ५०१  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
    
खरंतर ईश्वराची इच्छा आणि सदिच्छा लहरी या पूर्ण शुद्ध, अतिसात्विक आणि सकारात्मक असतात. फक्त आणि फक्त जगताचं कल्याण आणि विश्वातील प्रत्येक जीवाची उन्नती आणि मुक्ती, ही एकमेव गोष्ट विश्व नियंत्याच्या मनात, हृदयात आणि परमांशस्वरूपातील आत्मतेजात आहे. खरतर या जगतात आलेला प्रत्येक जीव हा आनंदी असावा, उल्हसित असावा, सकारात्मक भावात असावा आणि षड्रिपूंप्रमाणे निराशा कधीही कोणत्याही जीवाला स्पर्श करता कामा नये, यासाठी कोमल हृदय  ईश्वर नेहमी चिंतनात असतो. 

ईश्वराने अखंड ध्यानग्रस्त असताना सुद्धा, या जगताच्या कल्याणार्थ, एकसूत्री व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे. त्यामाध्यमातून स्वतः ईश्वर या जगताचं नियंत्रण, संचालन व प्रशासन करत असतो. म्हणजे असं म्हणता येईल की, ब्रम्हादी अनेक स्वरूपं ही या ईश्वराची प्रतिरूपं आहेत. किंवा ईश्वराच्या अवलोकनाचे, नियमनाचे, संचालनाचे व नियंत्रणाचे कर, दृष्टी आणि ज्ञान यांची इंद्रियं आहेत असं म्हटल्यास, ते योग्य ठरेल. या अनेक ज्ञान व कर्म करण्याच्या इंद्रियांनी, ईश्वर कर्म करतच असतो. 

तरीही, अनेकरूपातील एक असलेला तो परमांश, या विश्वाच्या उत्पत्तीपासून या जगतातून अलिप्त आहे, त्रयस्थ आहे. म्हणजे या सर्व सुत्रसंचालनाच्या व्यवस्था, ईश्वरासाठी, निर्मित शासन व्यवस्था आहे हे नक्कीच. या सर्व माध्यमातून, जगताचा सर्व कारभार आणि त्याची पूर्ण व्यवस्था, ईश्वराने, स्वप्रेरणेने, स्वनियंत्रीत पद्धतीने तयार केलेली आहे. आज युगानुयुगे ही व्यवस्था, ईश्वरी मनातील इच्छांनुसार, ईश्वराच्या संकल्पातील कार्य योग्य व चोख पद्धतीने पार पाडत आहेत. 

अनेकातील या एकतेला ज्ञानी जनांनी जाणलं आणि ते सूत्रबद्ध पद्धतीने जगतासाठी मांडलं. हे ज्ञानी जनांच्या बुद्धितील तेज, प्रकाश, ज्ञान अर्जनाची इच्छा, ते जगत कल्याणार्थ मांडून, वेळोवेळी त्यासाठी प्रकटून, ईश्वरी कार्याला हातभार लावणारी सूत्रबद्ध पद्धत ऋषी, ज्ञानी, संत महंत, या सर्व माध्यमातून, जगात वेळोवेळी येऊन, ईश्वरी इच्छा प्रसाराचं, ईश्वरी मनीषा पुढे नेण्याचं कार्य, करत असतात आणि करत राहतील. 

त्यांच्या आत्म्यातील चैतन्य आणि त्या चैतन्यातील शुद्धता ही ईश्वरी कृपेचा, ईश्वरी प्रेमाचा आणि ईश्वरी चैतन्याचा परिणाम असतो. म्हणून असे आत्मे फक्त जगतामध्ये कल्याणार्थ येतात, कोणतीही अपेक्षा न करता आपलं कार्य करून, या जगतातच चैतन्यावस्थेत विहरत असतात. खरंतर हे मुक्त आणि मोक्षास पावलेले पुण्यात्मे असतात आणि वास्तविक अर्थाने जन्ममरण त्यांच्या भाग्यात लिहिलेलं नसतं. परंतु त्यांची देहधारणा ही जगतकल्याणाचा भाग असते. 

अश्या या ईश्वरी व्यवस्थेचा परामर्ष घेऊया, उद्याच्या भागात. पण तोपर्यंत त्याच ईश्वराचं स्मरण करत करत काळाला पुढे ढकलूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१५/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...