Skip to main content

भोग आणि ईश्वर ५०८

भोग आणि ईश्वर  ५०८  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

वैराग्य या शब्दाचा खूप मर्यादित आणि संकुचित अर्थ, आपण कायम बघत वाचत आलेलो आहोत  वैराग्य आणि संन्यास यांचा परस्परांशी संबंध लावला जातो, पण तो पूर्ण अर्थ ध्वनित करत नाही. याचं कारण वैराग्य म्हणजे संसार प्रपंच सर्व सोडून, जीवनाकडे फक्त अध्यात्मिक अंगाने आणि त्याच उद्देशासाठी पाहून, भक्तीरस सोडून जीवनातील बाकी सर्व रस शुष्क करणे म्हणजे वैराग्य असा अर्थ कायम गृहीत धरला जातो. 

वैराग्य म्हणजे सर्वसंगपरित्याग करून राहावं, असा याचा अर्थ आपण गृहीत धरलाय. एका अर्थाने ते योग्य असलं तरी, त्याने वैराग्य वृत्ती  म्हणजे काय हे ध्वनित व अधो रेखित होत नाही. वैराग्य या शब्दाचा संधीविग्रह केल्यास  तो शब्द वि + राग या शब्दाचा बनलेला आहे. शब्दशः अर्थ आहे, रागापासून विलग होणं. पण व्यापक अर्थाने मनाला ग्रासणाऱ्या रोगांपासून स्वतःला  विलग करणं. म्हणजेच मनाला नियंत्रित करणारे किंवा करू शकणारे असे जे भवरोग आहेत, त्यांपासून मनाला मुक्त करणं. मुक्त म्हणजे विलग करणं म्हणजेच वैराग्य. 

पण हा व्यापक अर्थाने अभिप्रेत असलेला अर्थ ध्यानात न घेता,फक्त योगी, संन्यासी, संत महंत अश्या विरक्त लोकां साठीच वैराग्य हा शब्द वापरला जातो किंवा त्यांच्या वृत्तीसंबंधात हा योजला जातो. जे मूळ अर्थाला अभिप्रेत नाही. याला खऱ्या अर्थाने अपेक्षित अर्थ म्हणजे मनाला, चित्ताला,चित्तातील वृत्तींना आवरून, त्यांचा अवरोध करून, त्यांना आत ओढून घेऊन, मनात कोणतेही अनिष्ट, अपायकारक, अहितकारक,  नकारात्मक भाव निर्माणच होणार नाही, याचा अभ्यास करून, तो नित्य स्वभावाचा भाग बनवणं, म्हणजे वैराग्यवृत्ती धारण करणं. 

वैराग्य आत्मसात करणं किंवा अंगी बाणवणं, सर्व सामान्य माणसालासुद्धा तितकंच गरजेचं आहे. याचं कारण, सद्य जीवनातील वाढता तणाव, अचानकपणे उद्भवणारी अनिश्चितता जीवनातील वाढत जाणारे धोके, अनेक कारणांनी बाळगावी लागणारी सावधता, प्रलोभन व मोह यांचा वाढता आलेख आणि संख्या, त्याप्रमाणात मर्यादित उत्पन्न साधनं, अनिश्चित राजकीय व सामाजिक स्थिती, या सर्व गोष्टींमुळे मनावर जाणवणारा अतिरिक्त ताण, निराशा, न्यूनगंड, कमतरता, लोकांच्या वागण्या बोलण्यातील विसंगती या सर्वात मनाला नियंत्रणात ठेवून, सतत कार्यरत ठेवणं अत्यंत कठीण आहे. 

वृत्ती व मनाचा आवेग हे अनिर्बंध आणि अनियंत्रित होण्यामागे अनेक कारणं असतात. पण सर्वात महत्वाचं कारण आसक्ती आणि भूक यांची वाढत चाललेली मर्यादा. ज्याच्यामुळे मनाला नियंत्रित करणं कठीण होत चाललं आहे. या सर्व समीकरणात खरा आनंद हा मर्यादेत राहून मनाला मर्यादांचं महत्व लक्षात आणून देणं आणि त्याद्वारे मनाला छोट्या छोट्या गोष्टीतील निर्भेळ आनंद व समाधान शोधून, त्यांची सवय मनाला लावण्या साठी वैराग्य अनेक प्रकारे उपयोगी येतं. पण मन मारून जगणं आणि वैराग्य किंवा  विरक्ती यात अंतर आहे. त्यावर उद्या चिंतन करूया. तोपर्यंत नामाच्या माध्यमातून वैराग्यवृत्ती बाणवण्याचा प्रयत्न करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२२/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...