Skip to main content

भोग आणि ईश्वर ४८८

भोग आणि ईश्वर  ४८८  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।। 

काल आपण पाहिलेल्या तीनही उदाहरणात एक समान सूत्र आहे. त्या आधी त्यांचं वैशिष्ट्य पाहूया. भोवरा खाली निमुळता होत जातो आणि मोठ्या परिघाकडून अर्थात वरून वस्तू खाली लहान परिघाकडे, खेचून नेतो. म्हणजे गुरुत्वाकर्षण दिशेने. वावटळ खाली निमुळती असते आणि वर आकाशाकडे तिचा परीघ वाढत जातो.वस्तू कमी परिघाकडून मोठ्या परिघाकडे जाऊन बाहेर फेकली जाते. कृष्णविवर हे आडवं असतं. वस्तू कृष्ण विवरात जाऊन नष्ट केली जाते. 

या तीनही उदाहरणातील भेद पाहिल्यावर आता समानता पाहूया. तिन्हींची वस्तू खेचण्याची क्षमता अलौकिक असते. तीनही वस्तू नष्ट करतात किंवा गिळंकृत करतात. तीनही अर्थातच आपल्या चैतन्यात, बाहेरून आलेल्या वस्तुचं चैतन्य लुप्त करतात किंवा समाविष्ट करतात.  आता या तीनही गोष्टीतून वाचण्याचा किंवा तारून जाण्याचा उपाय काय. 

एकच उपाय आहे, तो म्हणजे तीनही शक्तींना शरण जाणं. या तीनही शक्तींची ऊर्जा आणि बल अभूतपूर्व असतं. खालून म्हणजे पाण्याकडून,  वर आकाश ते अवकाश यांकडे जाताना, त्यांची शक्ती व ऊर्जा वाढत जाते. भोवरा ते वावटळ आणि वावटळ ते कृष्णविवर ही शक्ती आणि ऊर्जेची चढती भाजणी आहे. पण त्यामुळे शरण जाण्यातील पातळी त्याप्रमाणे वाढवत नेली पाहिजे, तरच सुखरूप बाहेर पडू. 

आता या भूमी ते आकाश, आकाश ते अवकाश किंवा अंतराळ, या सर्वांना व्यापून उरलेल्या, भगवंतरुप शक्तीच्या या ब्रह्मांडरूप भोवरा, वावटळ किंवा कृष्ण विवरात, आपण आलो आहोत, हे लक्षात आलं असेल. जोपर्यंत देहात आहोत, तोपर्यंत देहाचे ताप, कर्मफलाचा व्याप, या सर्व कृष्णविवरात जीव, म्हणजे आपण अडकलो आहोत. पण हा देहच त्यातून बाहेर पडण्यासाठीचा उपायसुद्धा आहे. 

त्या भोवऱ्यात गटांगळ्या खात, जन्मोजन्मी फिरत, असलेले आपण, जगतपालकाच्या कृपेसाठी चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करतो. हे ज्ञानी झाले. त्यांना या वावटळीतून तरुन  जायचा उपाय माहीत होतो, ते सुटून जातात. जे कर्मरत राहून, त्या कर्माचा आलेख उंचावत नेऊन, आपल्या कर्माचं गणित सोडवण्यात यशस्वी होतात, तेही तरून जातात. जे योग,याग, सिद्धी, साधना, ध्यान समाधी या खडतर मार्गाने जातात, तेदेखील या कृष्णविवरात प्रभुकृपेचा प्रसाद घेऊन सहज पार होतात. 

ज्यांना यातील काही जमलं नाही किंवा जमत नाही, त्यांच्या साठी, ईश्वराने नामाचा अत्युत्तम अत्युच्च मार्ग योजून दिला. त्यांना त्यांच्या कर्मफलाचा हिशोब चुकता करता करता, ईश्वरी कृपेचा लाभ होऊन, एखाद्या जन्मात मोक्षप्राप्ती होते. प्रत्येक प्रकारातील, जगतरुपी कृष्ण विवर पार करण्याचा कालावधी, कष्ट,  साधना हे वेगवेगळ्या स्वरूपाचं आणि परिणामांचं आहे.

पण या सर्वात, ज्या जीवांना पोहण्याची, चालण्याची किंवा या  गोष्टींचा विचार करायची सवड, बळ, ज्ञान, ऊर्जा नाही, त्यांना, या वावटळीच्या पेचातुन बाहेर पडण्यासाठी काहीही विशेष न करता, फक्त ईश्वराला अर्थात या कृष्णविवराच्या निर्मात्याला शरण जाण्याचा उत्तम उपाय, स्वतः भगवंतांनी आखून दिला आहे. ही शरणागती संपूर्ण हवी, विनाशर्त विनाअट हवी. म्हणजे प्रत्येक सामान्यातील सामान्य कर्म करताना किंवा उच्च वा अलौकिक कर्म करताना आणि त्याचप्रमाणे प्रापंचिक कर्म करताना किंवा पारमार्थिक कर्म करताना, प्रत्येक श्वासागणिक ही शरणागती हवी. त्यात कोणतीही अट, सबब असता कामा नये व काही प्राप्त करण्याची इच्छादेखील त्यात असता कामा नये. 

याचीच पुढील बाजू किंवा मुद्दे आपण उद्याच्या भागात पाहूया, तोपर्यंत नामाच्या दोरीला दृढ धरून राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०२/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...