Skip to main content

भोग आणि ईश्वर ११५

भोग आणि ईश्वर  ११५
 
सांसारिक तापाचा, भोगांचा परिणाम बरेच वेळा मानसिक जडणघडण होण्यात होतो.  प्रत्येकाच्या प्रारब्ध आणि संचितानुसार त्याची भोगण्याची शक्ती, त्याला प्राप्त होते.  संचितातील पुण्याई आत्मबलशक्ती जन्मतः देते आणि या जन्मातील पुण्यकर्म, साधना वा नकारात्मक कर्म हे, त्यामध्ये वाढ वा घट करतं. 

आपण जर बघितलं असेल किंवा माणसं वाचण्याची कला प्राप्त असेल, किंवा बुद्धीची दारं उघडी असतील तर लक्षात येईल की,काही काही माणसं कोणत्याही परिस्थितीत डगमगत नाहीत, हार जात नाहीत किंवा मानसिकदृष्ट्या खचून जात नाहीत. उलट अश्या परिस्थितीतील सदर व्यक्तीला, आपण जर धीर द्यायला गेलो तर, ते त्यांना आवडत नाही वा त्याची त्यांना काही गरज नसते. ही आत्मिक शक्ती मूलतः पूर्वसुकृताने प्राप्त होते.

अश्या धीरोदात्त माणसांच्या, मागील जन्मांमधील पुण्याईचं फलस्वरुप, या जन्मात ही वृत्ती त्यांना जन्मतः वारसा म्हणून मिळालेली असते. अनेक जन्मांच्या पुण्य कारक कर्मांचा योग जुळून आला की अश्या व्यक्ती जन्माला येतात. म्हणजेच काही शुभकारक, सकारात्मक कर्म करत गेल्यास अशी वृत्ती प्राप्त होते आणि असे योग जुळून येतात. 

योग आणि योगायोग हे शब्द बरेचवेळा आपण वापरतो. खरतर दोन्ही समानार्थी शब्द आहेत, म्हणून आपण योग हा शब्द वापरू. योग शब्द खरतर युज या धातूपासून तयार झाला आहे. ज्याचा वास्तविक अर्थ समाधी अवस्था. अर्थात जेंव्हा देह, बुद्धी, मन आणि आत्मा एकाच ठिकाणी स्थिर होऊन, त्या ठिकाणी जोडले वा जुळले जातात आणि तो क्षण वा तो काळ जीव आणि शिव एकाच पातळीवर येतात. अश्या वेळी आणि स्थळी सर्व गोष्टी शून्य असतात. अर्थात सर्व ओढले व जोडले गेलेले असल्याकारणाने योग होतो.

हा व्यापक अर्थ झाला. पण आपण ज्यासंदर्भात योग हा शब्द वापरतो तो अर्थ म्हणजे माझं कर्मफल आणि त्या गोष्टी, भेट, व्यक्ती इत्यादी एकत्र येण्याची वेळ जुळून आलेली असते. त्यालाच आपण योग जुळून आला म्हणतो. पण खोलात जाऊन विचार केला तर लक्षात येईल की यात आधी केलेलं  कर्म आणि त्या कर्माची परिणती म्हणून प्राप्त होणारं कर्मफल यांचा योग घडला म्हणून एखादी वाईट वा चांगली घटना घडली, एखादी वाईट वा चांगली व्यक्ती भेटली. . म्हणजेच कोणताही योग वा योगायोग घडायला, या सर्व गोष्टी आधी घडलेल्या असतातच, फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते वा आपल्या ते लक्षात येत नाही.  

प्रारब्धात एखादा योग घडला म्हणजे तो वास्तविक अर्थाने योग वा योगायोग नव्हताच. तर तो तुमच्याच कर्माचा परिपाक होता, जो त्याचवेळी घडण्यासाठी, आपणच या जन्मात पूर्वी वा मागील अनेक जन्मात कधीतरी त्या योगासाठीचं कर्म केलं होतं. त्यामुळे शुभयोग, अशुभयोग, चांगल्या व्यक्ती वा वाईट व्यक्ती आणि चांगल्या घटना वा वाईट घटना हा योग मागील कर्माचं फलस्वरुप आहे हे निश्चित. म्हणजेच आपल्या आयुष्यात नात्यातून, ओळखीतून, मैत्रीतून अथवा क्षणकाल भेटलेल्या सर्व वा प्रत्येक व्यक्ती, क्षणाक्षणाला घडत असलेली प्रत्येक गोष्ट हा एक योग आहे आणि मीच तो कधीतरी लिहून ठेवला आहे. 

याचा अर्थ असा घ्यायचा की, प्रत्येक गोष्टीची जबाबदारी माझी व प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार मीच आहे. कारण त्याचं सरतेशेवटी कार्यकारण भाव मीच आहे अथवा होतो. आता यावर एक प्रश्न निर्माण होतो की, माझा योग ठीक आहे पण माझ्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीचं काय. तर त्याचं सोप्प उत्तर म्हणजे त्यांचंही काही निहित कर्मफल होतं, म्हणून ती व्यक्ती काही क्षण ते काही वर्षे तुमच्या आयुष्यात आली, राहिली आणि त्याच्या कर्मफळाचा भाग संपला की, त्याच्या निहित  कर्मातील पुढील मार्गी निघून गेली. 

तो योगच तितका होता. यात दुसरी बाजू म्हणजे आपलासुद्धा योग त्याव्यक्ति संदर्भात तेवढाच काळ वा तेवढेच क्षण होता आणि हा नियम एक क्षण ते अनेक वर्षे या सर्व योग संबंधांना, घटनांना, व्यक्तींना लागू आहे. अगदी मनात क्षण क्षण येणाऱ्या प्रत्येक विचारांच्या योगालासुद्धा हा नियम लागू आहे, कसं ते बघूया पुढील भागात. 

चिंतन करा, चिंतन हा साधनेचा प्राण आहे. नाम घ्या, घेत रहा. गुरुचरणी स्थिर रहा त्यातूनच पुढील गती मिळत जाईल. 

भोग आणि ईश्वर भाग १ या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा. बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२५/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments