Skip to main content

भोग आणि ईश्वर १११

भोग आणि ईश्वर  १११
 
खूपदा एक प्रश्न येतो की, नामात प्रेम येत नाही किंवा प्रेमभाव उतरत नाही, त्यासाठी काय करावं. विश्वाची निर्मिती करणारा  ईश्वर, खरतर सर्वव्यापी आणि सर्वात्मक आहे. त्याच्या अस्तित्वाची जाणीव, मनःचक्षूंना आणि आत्मलोचनांना व्हावी किंवा असायला हवी. ती जाणीव छोट्या छोट्या प्रसंगातून, अनुभवांतून जागे होते, मनाला आणि आत्म्याला त्याची खूण खरतर पटते. पण संसाराच्या रगाड्यात ते विसरायला होतं. 

अनेकदा ती उणीव भोगाच्या, दुःखाच्या काळात जास्त प्रकर्षाने जाणवते. त्यावेळी वाटतं की देवाचं माझ्याकडे लक्ष नाही. मला एकट्याला भोग भोगायला लावून कुठे दडी मारून बसलाय काय माहीत, असा एक सहज स्वभावीभाव उत्पन्न होतो. सहजस्वभाव यासाठी म्हटलं की, आपल्याला अश्या काळात वाटतं, संकटं माझ्या झोळीत टाकून सुख वाटायला शेजारीपाजारी गेला बहुतेक देव.

मुळात देव, हा तुमच्या सर्वात समीप म्हणजे अगदी हृदयात अंतरात्म्यात नित्य विराजमान आहे. आपण त्याला जाणून, दिवसातून एकवेळातरी, त्या अंतरात्म्यातील देवाला, वंदन करण्याचा प्रघात वा प्रथा अथवा नेम सुरू केला पाहिजे. म्हणूनच, ज्यावेळी आपण अहंकार, द्वेष, मत्सर, वासना, राग, क्रोध इत्यादी नकारात्मक भावात असतो, त्यावेळी इतक्या जवळ असलेल्या भगवंताला, किती व्यथा होत असतील, याची फक्त कल्पना करा. 

मनातील विचारांच्या लहरी ज्यावेळी अशुद्ध वा नकारात्मक असतात, त्यावेळी त्याचा सर्वात जास्त त्रास हा आत्मा आणि परमात्मा यांना होतो. एकप्रकारे दिव्याच्या काचेवर ज्याप्रकारे काजळी जमा होते, त्याप्रमाणे नकारात्मक व अशुद्ध लहरींची काजळी जमा होऊन, आत्मा आणि मन झाकोळलं जातं. म्हणून निराशा, दुःख, मानसिक थकवा, अनुत्तरित प्रश्न ज्यावेळी मेंदू आणि मन यांना ग्रासून टाकतात, त्यावेळी फक्त आणि फक्त देवाचं स्मरण या विचारांच्या लहरींची काजळी, मनावर व अत्म्यावर न जमू द्यायला मदत करतं. 

पूजाअर्चा व त्यासाठीचे सर्व विधी, सोपस्कार हे, मुळात मनाची मूळ आनंदी स्थिती पुनः प्राप्त करून, मनाला उभारी देऊन पुन्हा रिचार्ज करण्यासाठी आहेत. ते किती गरजेचं आहे आणि त्यातून किती मानसिक समाधान व स्थिरता येते, हे खरतर आताच्या करोनाच्या काळात जास्त प्रकर्षाने जाणवलं वा लक्षात आलं असेल. म्हणजेच वेद, शास्त्र, पुराणं यातील उपचार वा पूजा इत्यादी विधी हे खरतर मानवी मनाचा आणि काळाचा विचार करून करण्यात आले आहेत हे आज नीटपणे लक्षात येतं. 

पण असं मन अस्थिर वा विचारी वा विखारी वा निराश झाल्यानंतर, मनाला उभारी देण्याऱ्या, अनेक उपायांचं महत्व त्याच काळात जाणवतं, कळतं व लक्षात येतं. पण म्हणजेच एरवी मनाला या गोष्टींची न होणारी जाणीव ही मनावर  तात्पुरता चढलेला सुखाचा, परिस्थितीचा आणि मायेचा पडदा, प्रभाव वा आभासी छाया आहे हे नक्की. हा पडदा  वा ही छाया त्यावेळी दूर जाते, ज्यावेळी मन निराश व नकारात्मक होतं.

इथे एक उदाहरण घेऊ म्हणजे समजू शकेल. कारमध्ये पावसाळ्यात वा थंडीत काचेवर वाफ जमते, जी सारखी पुसावी लागते. पण ज्यावेळी बाहेर उन्ह किंवा स्वच्छ प्रकाश येतो, अर्थातच ज्यावेळी या तात्पुरत्या  सुखाच्या वाफेच्या पडद्याला, दुःखाच्या, निराशेच्या वा नकारात्मकतेच्या उन्हाची आंच लागते, त्यावेळी तो सुखाचा पडदा मनावरून दूर होतो आणि मग आपल्याला, जीवनाचं वास्तविक रूप दिसतं किंवा जाणवतं. त्यानंतर मनाला खऱ्या आधाराची गरज असते, जी ईश्वरचिंतानातून प्राप्त होते. अर्थात काहीजण ती व्यसनात शोधतात जी अहितकारक व विनाशकारी असते. 

पण पुन्हा पडदा आला की, मन पुनः मूळ स्वरूपाला येतं आणि त्या छायेच्या धुक्यात, मनःचक्षूंच्या काचेवर पुन्हा आभासी धुकं जमा होतं. म्हणजे निराशा, नकार हे त्या आभासी धुक्याला दूर करून, मनाला वास्तव चित्र, चक्षूंवर प्रतिबिंबित करून दाखवतात. पण म्हणून ते धुकं, घालवणारं निराशेचं, नकारात्मक उन्ह येईपर्यंत का वाट पहायची. त्या आभासी धुक्याच्या काळातसुद्धा सदैव साथ देणारं साधन वा साधना करून आपण मनाची व आत्म्याची ती काच सतत स्वच्छ राहील याची व्यवस्था करूच शकतो, नित्य ईश्वर स्मरण करून. 

पहिल्या परिच्छेदतील प्रश्नाचं विवेचन पुढे सुरू ठेवू, उद्याच्या भागात. तोपर्यंत नाम घ्या, गुरुचरणी स्थिर रहा त्यातूनच पुढील गती मिळत जाईल. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२१/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...