Skip to main content

भोग आणि ईश्वर १५

भोग आणि ईश्वर  १५

लहरींबद्दल एक माहिती वाचली आहे, अर्थात शास्त्रीय आधारावर, की, त्या नष्ट होत नाहीत. पण विरळ होत जातात आणि अंतराळात म्हणजेच ब्रह्मांडात फिरत राहतात. अर्थात मला फारशी शास्त्रीय माहिती नाही, पण विचार आणि कर्म यांच्या लहरी या ब्रह्मांडात फिरत राहतात आणि योग्य वेळी आपलं कार्य करण्यासाठी योग्य काळी व स्थितीला प्रकट होऊन, आपला कार्यभाग साधल्यानंतर तृप्त होतात. तोपर्यंत त्या अतृप्त स्थितीत फिरत राहतात, अर्थात योग्यवेळी प्रकट होण्यासाठी. 

आपल्याच विचारांच्या, इच्छांच्या लहरी कार्य कसं करतात ते बघूया. प्रत्येक इच्छेमागे एक शक्ती कार्य करते. क्षीण अथवा क्षणभंगुर विचार वा इच्छांमागे क्षीण शक्ती असते. अर्थात तिची ताकद जितकी तितकंच कार्य ती करणार. परंतु वासना या मुळातच शक्ती वा अग्निरुप असतात. त्यामुळे त्या इच्छांच्या मागे असणारी शक्ती, कमी काळात व क्षीण वाटली तरी खूप मोठा परिणाम मनावर करते आणि अश्या इच्छांच्या लहरी लवकर प्रभाव दाखवतात. एक उदाहरण बघूया.

साध्या एक कप दुधामध्ये त्या दुधाला गोड करण्यासाठी चमचाभर तरी साखर घालावी लागते. त्यानंतर ते नीट ढवळावं लागतं. मग ती साखर दुधात पूर्ण विरघळते. पण त्याच दुधात एक कणभर तिखट पावडर घाला आणि ढवळण्याचीसुद्धा गरज नाही, पूर्ण दूध एक कणभर तिखट पावडर पडताच, रंगाने लाल आणि चवीने  तिखट होईल. हेच वासनायुक्त इच्छांमुळे होतं. त्या क्षणात मनाचा, मनाच्या लहरींचा ताबा घेऊन, शरीराला कामाला लावतात, त्या तिखटाप्रमाणे. कोणत्याही प्रकारचा नकारात्मक विचार वा इच्छा फार अल्पावधीत विचार आणि मेंदू यांचा ताबा घेऊन कार्य सुरू करतात.

सकारात्मक विचार गरजेचे, हितकारक असले तरी  त्या मानाने क्षीण शक्तीचे असतात, निसर्गतःच, म्हणून त्यांना दृढ संकल्पाची गरज असते. त्यांच्या मागे इच्छेचा व इच्छा शक्तीचा मोठा रेटा लावावा लागतो. सतत योग्य विचार, संस्कार यांचं खतपाणी घालावं लागते. मशागत करावी लागते, योग्य मार्ग व मार्गदर्शन घ्यावं लागतं. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. 

हे त्यासाठी आणि त्याचसाठी समर्थांनी मनाला आवर घालणारे, मनाचा अश्व वारू होऊ नये यासाठी, मनाला नियंत्रित करणारे संस्कार श्लोकरूपात लिहून कित्येक पिढ्यांचं कार्य करून ठेवलं आहे. मागील भाग आणि वरील सर्व विवेचन वाचल्यानंतर त्या श्लोकांचा अर्थ, गर्भतार्थ आणि मतितार्थ समजला असेल. नकारात्मक लहरी निर्माण न होऊ देता सकारात्मक लहरी वा इच्छा निर्माण व्हाव्या हाच त्यांचा हेतू. म्हणूनच परवचा, श्लोक, मंत्र, स्तोत्र यांचा वसा घ्यावा लागतो, संकल्प सोडून त्यामागे लागावं लागतं. पण दारूचा एक ग्लास सुद्धा बिघडायला पुरेसा होतो. 

मनात निर्माण होणाऱ्या वाईट, नकारात्मक, वामामार्गी, वासनयुक्त विचार, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ आदि अग्नियुक्त लहरींना नियंत्रणात ठेवून, त्याजागी सकारात्मक, सृजनशील, प्रवाही विचारांना निर्माण करून, त्यायोगे आपला उत्कर्ष साधण्यासाठी, सर्व भोग हे माझ्याच कर्माचं फल आहे, याची जाणीव ठेवून, त्यासाठी आपल्याच हातून कळत व नकळत घडलेल्या कर्माबद्दल वाईट वाटून न घेता पश्चातापयुक्त अंतःकरणाने त्यांना सामोरे जाऊन, पुढील फल सकारात्मक, पुण्यात्मक, सत्वशील मिळेल यासाठी कर्म करत राहून, जाणीवपूर्वक योग्य मार्ग चोखळण्यासाठी मनाला सतत बजावत राहून व जागरूक राहून उत्साही राहणं हे खरं जीवन जगणं. 

इच्छाशक्तीवर आधारित मनाच्या क्षमतेचा परिणाम काय असतो, ते कसं कार्य करतं आणि आपण त्यासाठी जाणीवपूर्वक विचारांची मशागत का व कशी करावी यावर पुढच्या भागात बोलू. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१५/१२/२०२०

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...