Skip to main content

गोग्रासवाडी (डोंबिवली) ७

गोग्रासवाडी (डोंबिवली) ७
 
 या पहिल्या विहिरीमागे असलेल्या एल आकाराच्या चाळीच्या एका भागासमोर मोठी आणि पूर्ण परिसराला सावली देणारी  झाडं, विहीर, तीन देवळं आणि एका बाजूला शेती असा नयनरम्य परिसर होता. तर दुसऱ्या बाजूसमोर एक मोकळा भाग ज्याला दोन्ही बाजूला प्रत्येकी  ५,६ डेरेदार झाड होती. बरोबर दोन्ही रांगा जिथे संपत त्याठिकाणी मध्यभागी शितलामातेचं मंदिर होत, म्हणजे आजसुद्धा आहे. पण त्यावेळची मजा आज नाही. 

मंदिरात पायऱ्या उतरून खाली गेलं की शितला मातेची मूर्ती आहे. गाभारा फार मोठा नाही, पण मूर्ती प्रसन्न आणि छान आहे. या देवीला त्यावेळी नवस बोलले जात असत आणि त्यासाठी वस्त्र, कंकण आणि भेटवस्तू अर्पण केल्या जात. याच ठिकाणी समोरच्या झाडांमधल्या विस्तीर्ण परिसरात डोंबिवलीत प्रसिद्ध असलेला नवरात्री उत्सव साजरा होत असे. दर वर्षी १० दिवस नुसती धमाल असायची. नऊ दिवस रोज २ वेळा गरबा चालायचा. संध्याकाळी ५ वाजता बायकांसाठी आणि रात्री ९ नन्तर पुरुषांसाठी. डोंबिवलीत हा गरबा आणि नवरात्रौत्सव खूप प्रसिद्ध होता. अगदी मुंबईवरून गुजराती इथे गरबा खेळायला यायचे. आम्ही ९ च्या ९ दिवस रात्री गरबा बघायला जायचो. 

एरवी मंदिरात एरवी फार गर्दी नसायची. जवळ जवळ पूर्ण दिवस मंदिर रिकाम असायचं. मी खूप वेळा एकटा मंदिरात जात असे.  याच मंदिराच्या बरोबर मागे, अगदी लागूनच, एक विस्तीर्ण वटवृक्ष होता. आम्ही चाळीतली मुलं कायम तिथे जात होतो, त्या झाडावर चढून बसायला आणि तिथे बसुन खेळाचं प्लांनिंग आणि इतर गप्पा मारायला जात असू. 

बहुतेक सर्वच मुलांना त्यावर चढता येत असे.  या व्यतिरिक्त कित्येक वेळा मी एकटा सुद्धा या झाडावर जाऊन तासन तास बसत असे. ३६५ दिवस थंडावा देणार हे झाड होतं.  एकूणच विहिरीपासून ते मंदिराच्या आजू बाजूची भली मोठी झाडं, यामुळे सुद्धा तिथे  संपूर्ण दिवसभर सावली असायची. त्यामुळे उन्हाळ्यात जेंव्हा आम्हाला खेळायची परवानगी नसायची, तेंव्हा तेंव्हा या ठिकाणी यायला मुभा असायची.  आम्हीसुद्धा इमाने इतबारे याच ठिकाणी दुपारचे ३,४ तास काढायचो. 

या मंदिराला लागूनच गोग्रासवाडीच सुप्रसिद्ध मैदान होतं. हे मैदान पूर्ण डोंबिवलीत प्रसिद्ध होतं. जिथे एका वेळी साधारण २,३ टीम खेळायच्या, अर्थातच मुख्य खेळ हा क्रिकेट असायचा. त्यावेळी गोग्रासवाडीतील २,३ चाळींची मिळून एक क्रिकेट टीम होती. त्यांची प्रॅक्टिस चालायची आणि बाहेरच्या टीम बरोबर मॅचेस. एक अनोखी दुनिया आणि अजबघर होत गोग्रासवाडी. हे मंदिर आजू बाजूचा डेरेदार झाड, सावली, इतर झाडी, गवत, माती असलेला विस्तीर्ण प्रदेश आणि हे मैदान खर तर गोग्रास वाडीचा प्राण होता. 

एकूणच त्यावेळची गोग्रासवाडी हे एक छोटस गाव होतं. एक छोटंसं विश्व होत. जिथे भरपूर मोकळा प्रदेश, झाडं, झुडपं, काटे कुटे, रान, गवत, शेती आणि शेताडी, त्यातल्या त्या पायवाटा, त्यातल्या छोट्या पाउलवाटेवरून ते जपून जाणं, विशेषतः पावसाळ्यात, मधेच छोटेसे उंचवटे, या सर्वांवर गवताचं आच्छादन, कुठूनही कुठेही जायची सोय व सवय, दगडी खडबडीत रस्ते, संपूर्ण गोग्रासवाडी मातीमय होती. मोकळा प्रदेश एकतर झाड, गवत, झाडी यांनी सजलेला असेल वा त्यावर मातीच आच्छादन असेल. 

पावसाळ्यातली गोग्रासवाडी तर अवर्णनीय होती. बघूया पुढील भागात. .........
 
क्रमशः 

© लेखन : प्रसन्न आठवले
०६/०८/२०१८

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...