Skip to main content

गोग्रासवाडी (डोंबिवली) ४

गोग्रासवाडी (डोंबिवली) ४

गोग्रासवाडीचा मला माहीत असलेला अर्थ हा की, लोकमान्य (पूर्ण नाव लक्षात नाही) संस्थेने ही जमीन तिथे असलेल्या गायींना चरायला, कुरण वा चारा, म्हणून विकत घेतली होती, म्हणून गो- ग्रास. हे मला बहुतेक वडिलांनी सांगितल्याच आठवतय.

गणपती उत्सवात मोठ्या पडद्यावर प्रोजेक्टरद्वारे चित्रपट ही त्याकाळी पर्वणी होती. २ सिनेमे आमच्या वाडीच्या गणपतीमध्ये. पण फिरून माहिती काढून अजून कुठे चांगला सिनेमा आहे का ते बघायचं काम मी स्वतः उत्साहात करत असे. त्याशिवाय शाळेत इतर विभागात राहणाऱ्या मित्रांकडून बातम्या मिळत त्या वेगळ्या. मग या सगळ्याची जंत्री करायची आणि त्यावर ठरवायचं कुठे जायच.

उत्साहा बरोबर  नियोजन सुद्धा जरुरी असायचं. कारण वडील आमचे प्रत्यक्ष जमदग्नींचे अवतार. त्यामुळे  त्यांना बेमालूम फसवून परवानगी मिळवायचं महत्वाच काम अर्थातच माझं असायचं. त्याबाबत मी जात्याच हुशार आहे. ठिकाण जवळपासची वाडी जस नामदेव पाटलाची वा रामभाऊ पाटलाची चाळ वा अजून एखाद पटेल अस ठिकाण सांगून आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जायचं. बर लांब गेल्यामुळे  लेट झाला यायला,  तर ते कारण आधी ठरलेलं असायचं म्हणजे ठरवलेलं असायचं की रीळ अडकलं, प्रोजेक्टर बंद पडला, लाईट गेले मधेच इत्यादी. या विषयावर वडिलांशी नन्तर कधी बोलणं झालं नाही. पण तरीही मला अस वाटत की त्यांना ते कळत असावं. शेवटी ३०/३२ पावसाळे जास्त पाहिलेले आणि कुशाग्र बुद्धी असलेले ते असल्यामुळे बहुतेक त्यांना अंदाज असावा की आम्ही कुठेतरी लांब जाऊन आलो.  ..... असो

तर ह्या  सिनेमाच आकर्षण  त्यावेळी सर्वांनाच होत. त्याच मुख्य कारण म्हणजे त्यावेळी इतर कोणतेही साधन, सिनेमा बघायला, नव्हतं. एकतर चित्रपटगृहात जे पिताश्रींवर अवलंबून असायचं  वा अश्या वेळी व अश्या ठिकाणी. हे सिनेमे त्यावेळी गणेशोत्सवाबरोबरच कोणत्याही सण समारंभात बघायला मिळायचे. गोग्रासवाडीला लागूनच पाथर्ली गाव आणि छोट्या छोट्या वाड्या, चाळी यांचं छोटस साम्राज्य होत, आगरी लोकांचं. त्यामुळे बारसं, सत्यनारायण वा इतर कोणतीही  पूजा, त्यांच्या घरातील इतर समारंभ या प्रत्येक वेळी वा खुट्ट वाजलं तरीही मोठ्या पडद्यावर सिनेमे दाखवायची त्यांची हौस असे आणि आमच्यासाठी पर्वणीच. त्यामुळे दोस्ती, हाथकीसफाई,सच्चा झुठा, झुमरू, ब्लफ मास्टर , मुंबईचा जावई, असे कित्येक सिनेमे गणपती आणि समारंभ यात बघितलेत.

यातली अजून एक आठवण म्हणजे आमच्या चाळीत शेजारी येल्लूरकर राहायचे. त्यांचं गावाला थिएटर होत. त्यामुळे त्यांनी एकदा प्रोजेक्टर आणि कटीपतंग हा सिनेमा आणला होता.त्यांनी तो त्यांच्या घरात म्हणजे आमच्या शेजारी त्यांनतर अनेकवेळा दाखवला आणि तो तितक्याच वेळा मी पहिल्याच आठवतय. कदाचित १५, १६  वेळा असेल. त्यांचा मोठा मुलगा संदीप आणि धाकटा निनाद उर्फ नानू यांना कदाचित आठवत असेल.

वो शाम .मस्तानी .......
जीस गली मे तेरा घर न हो ......
प्यार दिवाना होता है.....
आज न छोडेंगे बस हमजोली .....
ये जो मुहोबत है ये उनका है काम ......
मेरा नाम है शबनम .......

आणि लास्ट अँड बेस्ट

ना कोई उमंग है ना कोई तरंग है मेरी जिंदगी है क्या इक कटीपतंग है

सुंदर सिनेमा , तितकीच सुंदर गाणी  आणि तेवढेच ग्रेट ते दिवस.

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले
०२/०८/२०१८

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...