Skip to main content

गोग्रासवाडी (डोंबिवली) ९

गोग्रासवाडी (डोंबिवली) ९

गोग्रासवाडीचा सुवर्णकाळ

आमची चाळ ७ बिऱ्हाडकरूंची होती. बरेच जुने सुरवातीचे शेजारी  आता लक्षात नाहीत, पण साधारण १९७२ ते १९८२चे (आम्ही चाळ सोडेपर्यंत) सर्व शेजारी आणि सर्व दिवस अजूनसुद्धा काल घडल्यासारखे आठवतायत. अगदी लख्ख. जणू की १९८२ नन्तर काळ पुढे गेलाच नाही. अर्थात तसही त्यानंतरच जगणं हे खरं जगणं नव्हतंच मुळात. चाळीत असताना जगलेले दिवस, हे खरंच मंतरलेले दिवस होते. आता फक्त काळ पुढे चाललाय इतकंच. तेंव्हा काळाची गती स्तब्ध का झाली नाही , अस आज राहून राहून वाटतय.

आमच्या चाळीत सर्वात पहिल बिऱ्हाड आमचं. नन्तर मागाहून एक एक आले. फाटक दोन घर होती.  दोघ सख्खे भाऊ म्हणजे त्यांची मुलं चुलत भावंड. त्यात प्रकाश व  सूचित (मूळ नाव गजानन) हे सख्खे आणि सतीश हा त्यांचा चुलत भाऊ.  खोड्या , मस्ती , दंगा यात माझा पार्टनर म्हणता येईल असा सतीश होता. साधारण दोन वर्षांनी लहान असेल. पण बऱ्याच खोड्या आणि उचपत्या आम्ही दोघांनी एकत्र केल्यात. किंबहुना कोणतीही नवीन गोष्ट डेरिंग करण्यात आम्ही दोघे पुढे असू. म्हणजे साधारण नवीन झाडावर चढण, वा काहीही प्रथम करायचं असेल तेंव्हा. याव्यतिरिक्त भडकमकर बंधू मिलिंद व विजय, पांचाळ, येल्लूरकर संदीप व निनाद , केतन गोरे, मी आणि माझा मोठा भाऊ प्रशांत अशी एक टीमच होती आमच्या चाळीची.

एक प्रसंग आठवला . शितला माता मंदिर परिसरात एक करंज्याच्या आकाराची छोटी शेंग आणि त्यात छोटीशी चपटी बी असलेलं एक झाड होत. आम्ही शेकडो वेळा त्या झाडाखालून गेलो होतो. पण एक दिवस त्या करंज्यातील बी मी आणि सतीश आम्ही दोघांनी खाल्लं. (इथेही डेरिंग आमचंच). ४,५ तरी बिया खाल्या असतील. वेळ साधारण ११,३०, १२ ची असावी. घरी आलो आणि थोड्याच वेळात सतीशला उलट्या सुरू झाल्या. त्याची आई, म्हणजेच प्रतिभाकाकू त्याला घेऊन आमच्या घरी आली. कारण तोपर्यंत त्याने सांगितलं होतं, उलटीचं कारण. म्हणून त्या विचारायला आल्या की, प्रसन्नाला पण झाली का उलटी. पण मला काहीही झालं नाही, एकदेखील उलटी झाली नाही.  असो.

अश्या असंख्य आठवणी आहेत लहानपणीच्या. त्या सर्व चाळींमधलं मैदान हा अनेक खेळांचा अड्डा होता. क्रिकेट हा मुख्य खेळ, पण इतर खेळ जसे कबड्डी, व्हॉलीबॉल, करवंटी डब्बा ऐसपैस, भोकंजा, चोरपोलिस,  विटी दांडू , पावसाळ्यात सळई घेऊन रूपवणी या मैदानी खेळांबरोबर पत्ते, बुद्धिबळ, सापशिडी, लुडो असे अनेक खेळ खेळायचो आम्ही. बैठे खेळ मुख्यतः दुपारी ज्यावेळी बाहेर खेळायला जायला परवानगी नसायची. त्यामुळे चाळीत वा मागच्या इमारतीत एकाच्या घरी जमून हे बैठे खेळ खेळायचो.

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले
०८/०८/२०१८

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...