भोग आणि ईश्वर ४७४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
माणसाच्या श्रद्धा या मनातील भावांना प्रकट करण्याचं माध्यम आहे. मुळात श्रद्धा म्हणजे फक्त देवाप्रति हा एक संकुचित अर्थ आपण लहानपणापासून ऐकत, वाचत आणि समजत आलोय. पण श्रद्धा हा खूप व्यापक अर्थाचा शब्द आहे. श्रद्धा म्हणजे जिथे मनाची द्विधा मनःस्थिती संपते आणि इच्छाशक्ती दृढ आणि जागृत असते. श्रद्धा म्हणजे एखाद्या ध्येयावर,इच्छेवर, आकांक्षे वर, एखाद्या व्यक्तिविशेषावर असलेला गाढ विश्वास.
श्रद्धा म्हणजे एखाद्या गोष्टीला संकल्पनेला सत्य मानून, त्यासाठी केलेले प्रयत्न. श्रद्धा म्हणजे अभ्यासाचा पाया. श्रद्धा म्हणजे आत्मशक्तीचं केंद्र व प्रेरणास्थान. श्रद्धा म्हणजे मनाची ती स्थिती ज्यामुळे, माणूस देह आणि बुद्धी यांच्या परिसीमांना उल्लंघून कार्य करू शकतो. मला एखादं लक्ष प्राप्त करायचं असेल तर, त्यावर माझा असलेला विश्वास म्हणजे श्रद्धा आणि त्यापाठी मी लावलेली इच्छा आणि कर्म ही त्याची परिणती. तीच श्रद्धेची शक्ती.
श्रद्धा ही संकल्पना, फक्त सकारात्मक गोष्टींसाठी वापरली जात असली तरीही, नकारात्मक हेतू मनात धरून, त्यासाठीदृढ विश्वासाने केलेलं कर्मदेखील श्रद्धा असते. थोडक्यात श्रद्धा ही मनाची ती स्थिती आहे, ज्यामुळे इच्छित प्राप्तीसाठी माणूस, कर्म करण्यास, साध्य करण्यास, साधना करण्यास, अभ्यास करण्यास, कष्ट घेण्यास प्रवृत्त होतो. म्हणजेच श्रद्धा मनाला कार्य करण्यास प्रवृत्त करते.
श्रद्धा मनाच्या इच्छांना गती आणि शक्ती देणारं माध्यम आहे. परीक्षा हे लक्ष मानलं तर, त्या परीक्षेत चांगला अभ्यास करून मार्क मिळणार ही श्रद्धा आणि त्यासाठी कार्यप्रवण होऊन, केलेला अभ्यास, त्या श्रद्धेपोटी केलेलं कर्म आहे. आपल्याला एखाद्या ज्येष्ठ वा श्रेष्ठ व्यक्तीने एखादी गोष्ट सांगितली की, त्या व्यक्तीच्या आदरापोटी आपण त्यावर ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा.
श्रद्धा ही व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असते. श्रद्धेचं निश्चित मापदंड किंवा मोजमाप करता येऊ शकत नाही. तरीही त्या श्रद्धेपोटी केल्या गेलेल्या कष्टाचं, प्रयत्नांचं, कर्माचं मोजमाप करून, त्यामागे असलेल्या श्रद्धेचा अंदाज बांधता येऊ शकतो. ज्या गोष्टीवर, व्यक्तीवर, ध्येयावर, परिस्थितीवर विश्वास वा दृढ विश्वास किंवा श्रद्धा बसलेली असते, त्या गोष्टीला, व्यक्तीला श्रद्धास्थान म्हणतात.
असं श्रद्धास्थान देव देश, धर्म ध्येय, व्यक्ती, संकल्पना, इच्छा दृढ इच्छा यापैकी काहीही असू शकतं. दृढ किंवा गाढ श्रद्धा त्या गोष्टीपुरता मनाचा बराच भाग व्यापून, मनाला त्यासाठी प्रवृत्त करतात. श्रद्धा खरंतर बुद्धीतून मनात किंवा मनातून बुद्धीत उतरते. पण श्रद्धेचं मुख्य स्थान हे मनच आहे. मनाच्या कार्य शक्तीला वृद्धिंगत करण्याचं महत्वाचं काम, श्रद्धा नामक एक अदृश्य पण तरीही अत्यंत परिणामकारक गोष्ट सहजी करते.
श्रद्धा हाच विषय आपण उद्या सुरू ठेवू. पण नामावरील आपली श्रद्धा दृढ करूनच, हे चिंतन सुरू ठेवू.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१९/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment