भोग आणि ईश्वर ४५८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
मनाचं श्रेष्ठत्व आणि त्यावर आधारित संपूर्ण आध्यात्म विज्ञान हा सगुण ते निर्गुण सर्व मतांचा, शास्त्राचा, वेद पुराणं, संतवाङ्मय, या सर्वांचा पाया आहे. किंबहुना अध्यात्मविज्ञानातील कोणत्याही मार्गाचा मूळ पाया आणि त्यावर आधारित सर्व कर्मकांड ते योग इत्यादी जे केले जातात त्याचाही मूळ पाया मनावर आधारित आहे.
ईश्वराने स्वतः रचलेल्या या संकल्पित ब्रह्मांडाला भेदून, निर्गुण रूपातील ईश्वरी तत्वाला प्राप्त करण्याची किल्ली किंवा किलक, हे स्वतः ईश्वराने, मन या इंद्रियरूपात स्वतःला गुंफून, म्हटलं तर एकप्रकारे माणसाचा मार्ग सुलभ करण्याचा प्रयत्न स्वतः ईश्वरानेच केला आहे. मानवी देहातील सर्वात चंचल, पण देह बुद्धी यांना आपल्या कवेत सामावून, त्यांच्याकडून निहित कार्य करवून घेण्याची क्षमता या मनात आहे. मनात आणलं तर काहीही करू शकणारं मन, अनेक गोष्टी लीलया करतं.
या मनाची शक्ती इतकी अमर्याद आहे की, प्रसंगी देहाची मर्यादा या मनाला बांधू शकत नाही. म्हणजेच मनाच्या शक्तीने प्रसंगी भौतिक व भौगोलिक अंतरसुद्धा सहज पार करून, हेच मन, देह स्थिर असतानासुद्धा कार्य घडवून आणू शकतं. त्यासाठी मनाला मनातील ऊर्जा व शक्ती यांना स्थिर करून, त्यांना नियंत्रित जरून, त्याद्वारे मनातील लहरींच्या शक्तीने अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात.
अर्थात त्यासाठीचा अभ्यास, प्रयास व सराव हा तितकाच कठीण व गहन आहे. पण आपल्याला इतक्या टोकाची शक्ती व ऊर्जा मिळवायची नसली तरीही,आपण आपल्या या जन्मासाठी आणि पुढील जन्मातील प्रगतीसाठी या मनातील अपार शक्तीचा सदुपयोग करून घेऊच शकतो. त्यासाठी मनाला एकाग्र करून, त्या मनाला साधनेच्या फेऱ्यातून फिरवून, अनेक योग बसल्या जागी सहज साध्य करता येतात.
म्हणूनच कोणत्याही तत्वाची व्यक्ती असो, या मनाच्या शक्तीला जागृत करून, आव्हानीत करण्यासाठी आपण सर्वात प्रथम मनातील वेगवेगळ्या वृत्तींना नियंत्रित करून त्यांना एका लक्ष्या वर स्थिर करण्याचा प्रयास करावा. यासाठी वृत्तीचा पसारा आवरता येणं जरुरी आहे. ज्या तत्वावर आपण देह बुद्धी व मन रुपात आधारित आहोत, ते प्रारब्धाप्राप्त आहे.
त्यामुळे आपण हे आधी जाणून घ्यावं की, पाच तत्वावर आधारित या देहाचा बुद्धीचा वा मनाचा पाया कोणतं तत्व आहे, त्याला आधी जाणलं पाहिजे. ते एकदा जाणल्यावर त्याला स्थिरचित्त करण्यासाठी प्रयास केले पाहिजेत. जल तत्वावर आधारित मन हे प्रवाही असतं, त्यामुळे त्या मनाला एका विषयात वा इच्छेत गुंतवून, त्यात प्रवाहित करणं गरजेचं आहे.
म्हणून त्या लोकांनी मनाला अंतर्मुख करण्याच्या प्रवाहात गुंतवून, त्यायोगे, मनाच्या प्रवाहिपणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. कारण पाण्याला थांबवता येत नाही, पण त्याला योग्य दिशेने प्रवाहित करता येतं. म्हणूनच जलतत्व प्रभावित व्यक्तींनी मनाच्या स्थिरतेपेक्षा, त्याला योग्य मार्गावर प्रवाहित करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून मनाला गतीमय ठेवता येईलच, पण तो प्रवाह व ती गती योग्य दिशेला प्रवाहित करता येईल.
याप्रमाणे इतर तत्वांना चित्तशांतिकडे नेण्याबद्दल।चिंतन करू. पण तरीही नामाची कास न सोडता,चिंतन सुरूच ठेवू.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०३/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment