भोग आणि ईश्वर ४७३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
वास्तविक एकदा एखाद्या गोष्टींचं ज्ञान मिळालं आणि जाणीवा जागृत झाल्या की, त्या मार्गाने माणूस पुढे जावा अशी अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात आपण पाहिलं तर फार थोडे जीव या जगतात असे आहेत की, ज्यांना एकदा ज्ञान प्राप्त होऊन, जाणीवा जागृत झाल्यावर, पुन्हा त्याच गुंत्यात न अडकणं जमतं आणि ते पुढील प्रवासाला निघतात. आपल्यासह अनेकांना कर्ममार्गातून धर्म व मोक्ष मार्गाकडे वळवतात.
कदाचित यात एक शक्यता गृहीत धरावी लागेल. ती म्हणजे असे जीव, त्यांच्या आत्मप्रवासातील अनेक अडथळे व अडचणी, अनेकानेक जन्मात, पार करून, या जन्मापर्यंत आलेले असावेत. आपण देहातील त्यांचा हा एकच जन्म पाहिलेला किंवा या एकाच जन्माबद्दल ऐकलेलं असतं. म्हणून आपण जे समोर दिसतं किंवा ज्या जन्माबद्दल ऐकतो, त्या विषयी जाणून, एकाच जन्मात हा आत्मोद्धाराचा त्यांचा प्रवास घडला असं मानतो किंवा जाणतो.
पण वास्तविक परिस्थिती तशी नाही किंवा नसावी. कारण आपण अनेक कथा किंवा संतचरित्रामध्ये वाचलं असेल की, त्यांना सद्गुरु प्राप्तीची ओढ, लहानपणा पासून लागते. ही ओढच त्यांना या जगतातून पार जाण्या साठी प्रवृत्त करते. म्हणजे जन्मतःच, त्यांची मूळ प्रवृत्ती वैराग्याची व त्यागाची असते. त्यांना व्यावहारिक संसारात व जगाच्या मोह माया या पसाऱ्यात काहीही रस वा रुची नसते. मात्र जगराहाटीनुसार, त्यांना काही गोष्टी कराव्या लागतात.
यातील दोन प्रमुख उदाहरणं म्हणजे संत श्रीरामदास स्वामी आणि श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. यांनी फार लहान वयात गृहत्याग करून, ईश्वर वा सद्गुरू प्राप्तीसाठी, कष्ट, हाल भोगून, साधना व तप आचरण केलं. श्री गोंदवलेकर महाराजांनी तर, सद्गुरू प्राप्ती साठी अनेक प्रकारचे कष्ट हालअपेष्टा सहन करून, सद्गुरु प्राप्तीची आपली सद् आणि दृढ इच्छा पूर्ण केली. त्याचप्रमाणे श्रीसमर्थ रामदास स्वामींनी, लहान वयात, खडतर साधना व देशभ्रमण केलं.
यासारख्या अनेक थोर विभूतींनी फक्त आपलं हित साधण्याचा स्वार्थीपणा न करता, आपल्यासह हजारो वा लाखो लोकांना या मार्गाकडे ओढून आणलं. यासारख्या, सद्गुरू परंपरेतील थोर विभूतींच्या चैतन्यरुप अस्तित्वाने त्यांच्या देहत्यागापश्चातसुद्धा लाखो लोकांना, त्यांच्या शक्तीचा व ऊर्जेचा लाभ झाला आणि होत राहील. लाखो साधक अश्या चैतन्यशक्तींशी जोडले जाऊन, त्यांनाही, त्याची प्रचिती आली आहेच आणि येतच राहील.
या सर्वांच्या मागे त्या साधकांची श्रद्धारूपातील ऊर्जा व सद्गुरूंची गुरुरूपातील शक्ती, हे असतात. सद्गुरूंचे नित्य चिंतन, त्यांनी सांगितलेल्या साधनेला श्रद्धेने जपणं, या दोन मुख्य गोष्टी साधकांना,सहाय्यक होतात. शास्त्रीय दृष्ट्या, साधकांच्या मनातील, श्रद्धा केंद्रातून प्रसारित होणाऱ्या लहरी, जर अत्यंत परिणामकारक व प्रभावी असतील तर,त्या आपल्या इच्छित लक्षापर्यंत पोचतात.
या विषयाचं चिंतन उद्या सुरूच ठेवू. नामाच्या सहाय्याने सद्गुरु कृपा प्राप्तीचा प्रयत्न करत राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१८/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment