भोग आणि ईश्वर ४८४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।
स्मरण आणि विस्मरण या मनाच्या दोन बाजू आहेत. मेंदूतील पेशीत त्या आठवणी, ते नाम हे साठवलेलं असतं. त्यांचं पुन्हा पुन्हा स्मरण, ही समस्या असू शकते. आपण एखादी, विसरण्या योग्य गोष्ट, आठवण किंवा वस्तू असेल तर, ती कुठेतरी लिहून किंवा आठवणीत राहावी म्हणून काहीतरी सोय करतो. याचं कारण म्हणजे, ती गोष्ट, ते कर्म, हे तितकंच महत्वाचं असतं.
किंवा महत्वाचं असेल, त्याच गोष्टींचं आपण अश्याप्रकारे चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये, त्या कर्माची वेळ येईपर्यंत आपण तिला आठवत राहतो किंवा आठवण येईल, यासाठीचे वेगळे खास प्रयत्न करतो. यातून हे सिद्ध होतं की, जी गोष्ट आपल्याला महत्वाची असेल,ती गोष्ट, ते कर्म वा ती आठवण, आपण न विसरण्यासाठी सर्व करतो. अगदी आताच्या काळात, reminder लावून, अँप्स वगैरेंचा वापर करून, आपला हेतू साध्य होईल हे पाहतो.
असच एक अँप देह निर्मिती करतेवेळी, ईश्वराने स्थापित करून मानवाला, या देहात धाडलं आहे. ते reminder app म्हणजे मन. यात मनाने मनापासून जे स्थापित केलं जाईल, ते सतत चिंतनात ठेवणं हा या मनाला देण्यात आलेला धर्म आहे. मन तो धर्म नेटाने पाळतो. पण आपण त्या मनाला अनेक चुकीच्या गोष्टी, वासना, मोह, लोभ, द्वेष, मत्सर या सर्व गैर भावनांच्या आठवणी, लक्षात ठेवायला वापरतो. ते कर्मसुद्धा मन विनातक्रार मनापासून करतं.
मन हे एक सॉफ्टवेअर प्रमाणे आहे आणि मेंदू हार्डडिस्क प्रमाणे. जे जे दिवसभरात वा क्षणोक्षणी ज्ञानेंद्रियांतून ग्रहण होत राहील, ते सर्व साठवून ठेवण्याची जागा म्हणजे मेंदू. मन हा प्रोग्रॅम आहे, त्याला जसं काम करायला सांगू, त्यानुसार ते मेंदूसह संपूर्ण देहाकडून कार्य करवून घेतं. म्हणजे मेंदू हा मनाच्या आज्ञेनुसार त्या त्या गोष्टी, त्या त्या वेळी करून, मेंदू आणि देह दोन्हीना साथ देतं. पण तरीही मन व मेंदू दोन्हीना स्वतःचा प्रोग्रॅम सुद्धा आहे. खरा गुंता त्यामुळे निर्माण होतो.
मनाच्या या आठवणींच्या फाईली काढून, नित्य अनेक योग्य वा अयोग्य गोष्टींचं चिंतन, मनन करण्याच्या तंत्राचा वापर, योग्य कार्यासाठी व कर्मासाठी करवून घेण्यासाठी, प्रथम पासूनच शास्त्र, पुराणं, यांनी मानवी मनाला, त्याचा खरा उद्देश सतत सांगून,नित्य, त्या निर्गुणरूप परब्रह्म स्वरूप परम ईश्वराचं चिंतन करून, नित्य त्याला स्मरण्याची सवय जडवून घेण्यासाठी अनेक युक्त्या प्रयुक्त्या योजल्या आहेत. त्यांचा विचार आपण उद्याच्या भागात करूया. तरीही तोपर्यंत नामाचं नित्य स्मरण करून, ईश्वराला समीप पाहण्याची कल्पना करत, नित्य आनंदी राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२९/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment