भोग आणि ईश्वर ३७२
काल गुरुकृपेचा विषय निघाला त्याकडे वळण्याआधी आपण सद्गुरुकृपा का होते यावर बोलू. का व्हावी यावर , त्यानंतर चिंतन करूया. मुळात ईश्वरीय वा आध्यात्मिक मार्गाची वाट, मन आत नेऊन, त्याद्वारे, आत्म्यातील, ईश्वर जाणून, त्या ईश्वराकडे जाणं, यातून जाते. मन आत नेणं हे वाटतं तितकं सोप्पं वा सहजसाध्य नाही, हे नक्की.
याचं कारण म्हणजे, मन हे मुळातच चंचल. त्यात, त्याला निर्विषय वा निर्विकार होणं हे अत्यंत कठीण आणि अवघड आहे. निर्विषय होणं म्हणजे विषयापासून पूर्ण मुक्त होणं. मनाला निर्माण करताना ईश्वराने, त्या मनाला सर्वात चपळ व वेगवान बनवलं. म्हणजे त्याच्या वेगाशी फक्त आणि फक्त श्रीहनुमान यांचीच तुलना नेहमी केली जाते.
आता इथे आहे, असा अंदाज येईपर्यंत, ते कुठे भरकटत जाईल, हे ईश्वरसुद्धा सांगू शकणार नाही. म्हणजे वायू पेक्षाही वेगवान व भ्रमराहून चंचल असं हे मन, आधी विषयातून काढून घेणं, हे भल्या भल्या योगीनासुद्धा अशक्य आहे. कारण हा योग साधण्यासाठीसुद्धा त्याच ईश्वराची कृपा होणं हे अत्यंत आवश्यक आहे.
याचं कारण म्हणजे या चंचलतेला असलेला एक धागा जो, या चंचलतेला सहजी विषयाकडे नेतो किंवा विषया धीन करतो. म्हणजे आधीच मर्कट आणि त्यात मद्य प्यायला, अशी स्थिती. बर याच मायेच्या आधीन, सहज येण्याच्या प्रवृत्तीमुळे, मोह, लोभ, क्रोध, काम, द्वेष, मत्सर इत्यादी विकारांची बाधा अगदी आपसूक होत जाते.
म्हणजे त्या मद्य प्यायलेल्या मर्कटाला विषबाधा झाली की जी स्थिती उद्भवेल, ती स्थिती मनाची नित्य असते. अश्या मनाला, स्थिर करणं दैवदुर्लभ आणि त्याला स्थिर करून एकाग्र करणं, त्याहूनही महाकर्मकाठीण. मग त्याला एकाग्र करता आलं की, आत नेण्याचा प्रयत्न करणं, ही दुर्मिळातील दुर्मिळ बाब. म्हणजेच निर्विषयी होणं कठीण असल्यामुळे, निर्विकारी होणं त्याहून महाकठीण.
याचं कारण म्हणजे विषय आणि त्या विषयाचा विकार होणं या ओघानेच येणाऱ्या बाबी आहेत. जिथे विषय तिथे विषयांतून येणारा विषयांचा विकार हा सहजसाध्य रोग आहे. भवरोगच म्हणूया. विकार म्हणजे आजार किंवा रोग. म्हणजे विषयांचा ओढा,जो मनाला सहजी विषयातील तात्पुरत्या वा अल्पकालीन सुखाकडे आकृष्ट करतो आणि मग त्या बाधेची सवय होऊन, मनाला त्या विषयाचा विकार जडतो.
बर हा विकार फक्त कामवासना या एका विषयाचा नसून, सर्व षड्रिपूंच्या बाधेचा असू शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला काम किंवा वासना यांची बाधा होणार नाही, पण मद,मत्सर, द्वेष, क्रोध इत्यादींपैकी, कोणत्याही एका विषयाचा असू शकतो. कारण सहसा आपण विषय म्हटलं की, कामवासना इतकाच मर्यादित अर्थ मनात धरतो, म्हणून स्पष्ट केलं.
सद्यस्थितीत वा वर्तमान काळात, प्रसार माध्यमं, समाज माध्यमं, यातून प्रसारित होणाऱ्या वाहिन्या व त्यावरील मालिका, सहजी उपलब्ध होत असलेल्या व्हीडिओ क्लिप्स व अनेक प्रकारची इतर व्यवधानं, या सर्वांतून हे विषयाचं आणि विकारांचं गणित अजूनच अवघड होऊन बसलंय. म्हणून मन अधिकाधिक चंचल, विषयी व विकारी होण्याकडे कल वाढत आहे.
पाश्चात्य जगतातील समृद्धीच्या या पुरामुळे उद्भवलेल्या अश्या परिस्थितीत, चंचल मनाला विकारांचा उद्भव व उपद्रव प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. मधल्या काळा तील ही विकारांची चिंताजनक वाढ, करोना काळात जगाला अंतर्मुख करून गेली नसती तरच नवल. गेल्या वर्ष दोनवर्षात मनाच्या एकाग्रतेबाबत, त्याच्या विकारांच्या स्थितीबाबत व मनाच्या शांततेसाठीच्या अवश्यकतेबाबत, लोकं जागृत होत आहेत आणि मधल्या काळात झालेला विकारांचा जोर व धोका,निदान काही लोकांना जरी लक्षात आला असेल तरी, या आपत्तीतून हा शुभसंकेत म्हणायला हरकत नाही.
चिंतनाची व्याप्ती मोठी असल्यामुळे आपण यावर उद्या चिंतन करूया.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०७/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment