Skip to main content

भोग आणि ईश्वर ३८२

भोग आणि ईश्वर  ३८२ 

कली ब्रह्मदेवांच्या पृच्छेनुसार, आपलं कथन पुढे सुरू ठेवून सांगू लागला 

पण माझ्या प्रभावामुळे लोकांना सर्व मोह लोभ होणार असल्यामुळे, बहुतांश लोक, सर्व प्रकारे म्हणजेच भौतिक व आत्मिक दृष्टीने अशुद्ध व विकारग्रस्त होत जातील. कारण मुख माध्यमच असं आहे.माझ्या प्रभावाने, जीवनात संस्कृतीत वर्तणुकीत विचारात आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. जगण्याची परिमाणं, प्रमाणं माध्यमं, दृष्टी व दृष्टिकोन, संस्कृती यात कल्पनातीत परिवर्तन होईल. 

त्यामुळे अनेक प्रकारचे मोह व प्रलोभनं हे सर्वसामान्य मानवाला सहजी प्राप्त होईल. धनसंपत्तीला अति व अवास्तव महत्व प्राप्त होईल. मद्य मादकता व मंचक  यांचा प्रभाव अमर्यादित वाढेल. जिव्हेच्या जोरावर खाणं पिणं यांच्या सवयी, वेळा व मर्यादा यांचा कोणताही धरबंध उरणार नाही. याच प्रभावातून पुढे भ्रष्ट विचार आचार उच्चार, उपचार होऊन, यामध्ये न अडकलेला पथभ्रष्ट समजला जाईल. अश्या संयमात व मर्यादेत राहणाऱ्यांना नियमबाह्य ठरवलं जाईल आणि असे जन हे चेष्टेचा, थट्टेचा व टवाळीचा विषय होतील. 

अनेकविध  मार्गानी धनप्राप्ती होईल. यामध्ये अवैध मार्ग बहु आकर्षक व अमाप धन प्राप्त करून देतील. अश्या धनाने अनेक भौतिक सुखांना प्राप्त करता येईल. अश्या सुखांना भूलोकी स्वर्गाची उपमा दिली जाईल.  त्यामुळे त्या धनाच्या प्रभावाने अनेक गैर इच्छा अपेक्षा, आकांक्षा जन्म घेऊन त्या मानवाला गैरमार्गाकडे घेऊन जातील. अधोगतीच्या मार्गाकडे निघालेल्या या मानवाला उन्नतीचा व सावरण्याचा मार्ग उरणार नाही. 

सामान्य जन अनेकप्रकारे बुद्धिभ्रष्ट व मार्गभ्रष्ट होण्या साठी त्या प्रकारचं पोषक नीचतम वातावरण सर्वत्र असेल. धनाला प्रत्यक्ष देवाचं स्वरूप प्राप्त होईल आणि या नूतन देवाच्या प्राप्तीसाठी लोकांना भुलवावं लागणार नाही. ते आपोआप, प्राप्त परिस्थिती मुळे त्याकडे ओढले जातील. षड्रिपु हे रिपू न राहता, सखेसोबती होतील. त्यांच्या संगतीत राहणाऱ्यांना यशस्वी व किर्तीवान समजलं जाईल. अश्यांच्या अनैतिकतेकडे आणि आचरणाकडे प्रभाव म्हणून पाहिलं जाईल.  त्यांचा प्रभाव वाढवणाऱ्या लोकांना विशेष महत्व प्राप्त होईल. 

इथे श्रीब्रह्मदेव विचारतात 

पण जिव्हा धरण्याचं प्रयोजन काय ? 

त्यावर कली म्हणतो म्हणूनच मी जिव्हा यासाठी धरली की, अधोगतीच्या मार्गाकडे न जाण्याचा कलियुगातील एक महत्वाचा मार्ग आहे की, ग्रहण आणि श्वास या दोन्ही सेवनांवर नियंत्रण ठेवणं. अश्या प्रकारचं नियंत्रण असलेल्या लोकांना माझ्याकडून बाधा पोचणार नाही.मी अश्या लोकांना प्रभावात आणण्यासाठी अनन्य प्रयत्न करत राहीन. परंतु जोपर्यंत ते उदर व श्वास यांच्या मर्यादा सांभाळून जगतील, तोपर्यंत त्यांना विकार व वासना यांचं भय नाही. 

कलीच्या या कथनाकडे सर्व सभागृह दिगमूढ होऊन पहात होतं. 

कलीने आपलं कथन पुढे सुरू ठेवलं. 

आता आपल्या मनातील दुसरा प्रश्न की मी दुसऱ्या हाताने लिंग का धरलं. तर तेही ऐका. 

ब्रम्हाजी स्मित करून म्हणाले अवश्य सांग, आम्ही उत्सुक आहोत. 

कलीने पुन्हा सांगायला सुरवात केली 

मुखावाटे भोग भोगायची सवय,  काही वासना तात्पुरत्या तृप्त करेल. पण पुन्हा त्या बळावतील आणि त्या चक्रात मानव, इतर प्राण्यांप्रमाणे ओढला जाऊन अडकेल. पण साधनांच्या उपलब्धतेमुळे, अधिकारामुळे, सत्तेच्या गैरवापरामुळे, बेशिस्त व बेताल वागण्याचा परिपाक म्हणून, वासनेच्या तृप्तीतून प्राप्त होणाऱ्या क्षणिक आनंदाच्या मोहामुळे देहसुख भोगण्याकडे जनांची वाटचाल होत जाईल. 

मुखाव्यतिरिक्त उपभोग घेण्याचं दुसरं महत्वाचं इंद्रिय जे असेल ते म्हणजे जननेंद्रिय. वास्तविकपणे प्रजोत्पादन या महत्वाच्या कार्यासाठी विधात्याकडून प्राप्त , या इंद्रिया मुळे मिळणारा आनंद हा स्वर्गसुखासम भासेल. तो प्राप्त व्हावा यासाठी जन सामान्य सर्व बंधनं, मर्यादा, नीति नियम, सांस्कृतिक व सामाजिक शृंखला तोडून हा आनंद मुक्तपणे व अमर्याद उपभोगून, कामजीवन हेच पूर्णजीवन या निष्कर्षाला येतील. 

त्यासाठीची सर्व साधनं सहजी उपलब्ध असतील. नसलेली निर्माण केली केली जातील. सहज उपलब्ध साधनं आणि मुक्त विचारांच्या चुकीच्या प्रभावाने वासना याच सर्वसामान्यपणे मनावर आरूढ होऊन, देहावर, मनावर व बुद्धीवर पूर्ण सत्ता गाजवतील. 

सभागृहात जमलेले सर्व देवसुरवर, गण इत्यादी कलीचं कथन ऐकताना आश्चर्य व भय यांनी ग्रस्त झाले होते. 

कलीचं पुढील कथन उद्याच्या चिंतनात आपण पुढे नेऊ. पण नामाच्या स्मरणात, आपण आपलं  विचलित होणारं चित्त निश्चल करण्याचा प्रयत्न करत राहू. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१७/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...