भोग आणि ईश्वर ३६८
नित्य नवीन चिंता करणाऱ्या मनाला, नित्य नवीन छंद देत जाणं आणि त्यातून, नित्य कर्मरत राहणं, हा वास्तविक पणे जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे तसं पाहिलं तर मनाची निर्मिती गतिमानता, बदलांशी जुळवून घेणं आणि कालानुरूप चालणं, यांसाठीच आहे. त्याप्रमाणे मन कार्य करतं आणि सतत चिंतन शील, विचारशील व आचारशील अर्थात कृतिशील राहतं.
पण मुख्य समस्या आहे ती, या सर्व प्रकारच्या कर्मातून निर्माण होणाऱ्या फलांना भोगण्याची. म्हणजे असं की, ज्यावेळी फल प्राप्ती होते, त्यावेळी अमुक एका कर्माशी त्याची सांगड घालता येत नाही. खरी समस्या इथेच सुरू होते. बरेचवेळा, आपण केलेलं कर्म, काळाच्या ओघात आपणच विसरून जातो आणि नन्तर आपण स्वतः, स्वतःला किंवा आपल्या मनातील अंतरात्मा रूप देवाला प्रश्न करतो की,
मी हे केलंच नव्हतं, मग माझ्या प्रारब्धात हा योग का आला. खरी चुकांची सुरवात इथे होते. बरं हे विसरणं याच जन्मातील कर्मांचं असेल तर, नक्कीच चूक आहे. कारण आपणच केलेलं आपलंच कर्म, पण फलप्राप्तीच्या वेळी, आपणच सोयीस्करपणे विसरतो की, या फलांचे निर्माते आपणच आहोत. पण जेव्हा त्या कर्माचं बीज मागील कोणत्यातरी जन्मात त्या जन्मातील मन बुद्धी व देह यांनी पेरलेलं असतं, ज्याचं फलरूप आपल्या समोर या जन्मात येतं, त्यावेळी ही संभ्रमता निश्चितच योग्य आहे.
हा सर्व खेळ, जागृत मनाला फक्त या देहाशी कर्तव्य असल्या मुळे किंवा या देहात येताना, आत्म्याला मागील सर्वांचं विस्मरण होण्याचा अभिशाप असल्यामुळे होतो. मनाला असलेल्या नित्य खेळाच्या आवडीने व आत्म्यासह मनाला असलेल्या विस्मरणाच्या भवरोगामुळे, आपण कायम संभ्रमित असतो की, मला प्राप्त झालेलं फल वा समोर आलेले भोग, हे माझ्या योगात का आले.
यामागे विधात्याची योजना दूरदृष्टीपूर्ण आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला आपल्या या जन्मासह मागील अनेक जन्माचं स्मरण होत राहिलं तर, जीवन आज जितकं गतिमान आहे, साधसरळ आहे, तितकं सहज राहिलं नसतं. कारण एकच देह अनेक जन्मातील नाती, संबंध व ऋण यांना लक्षात ठेवून, त्यानादात काळाबरोबर जगणं विसरून गेला असता आणि गतिमानतेच्या कसोटीवर मन संभ्रमित राहिलं असतं.
म्हणजे विधात्याने एकप्रकारे दूरदृष्टीने देह, मन, बुद्धी यांना आत्म्याच्या स्वाधीन केलं आहे. थोडं अचंबित करणारं वाक्य आहे ना?. कारण आपण नेहमी उलट विचार करतो की, देह बुद्धी व मन यांमध्ये आत्मा बंदिस्त आहे. पण वास्तविक परिस्थिती उलट आहे. देह, बुद्धी व मन ही आत्म्याच्या हातात देऊन, देवाने त्या आत्म्याला, तो देह बुद्धी व मन यांना, उन्नती व उद्धार यांसाठी वापरण्याची एकप्रकारे मुभा दिली आहे.
म्हणजे आत्मा हा देह, बुद्धी व मन यांचा खरा मालक आहे. पण आपण प्रत्यक्षात पाहतो ते भलतंच आहे. कधी मन, कधी बुद्धी तर कधी देह किंवा यातील दोन वा तिन्ही संयुक्तपणे आपला अधिकार गाजवत, कर्मांना जन्म देत नित्य फलनिर्मिती होत राहील, हे पाहतात. म्हणजे "असुनी स्वामी घरचा, दास जन्मोजन्मीचा" , अशी स्थिती या आत्म्याची, प्रत्येक जन्मात होत जाते. म्हणजे एखादा देह बुद्धी वा मन कर्म करतं, पण जन्ममृत्यू या फेऱ्यांमुळे, आत्मा ते भोग पुढे नेऊन, भलत्याच देहाकडून ते भोगवून घेतो.
विषय थोडा मोठा आहे, त्यामुळे उद्या यावर चिंतन पुढे सुरू ठेवू. पण नामाच्या स्मरणात भोगांच्या विस्मरणाच्या वरदानाचा लाभ घेत जाऊया.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०३/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment