भोग आणि ईश्वर ३४
आतापर्यंत केलेल्या विवेचनात आपल्याला काही गोष्टी कळल्या असतील, काही वळायला लागल्या असतील. तरी काही हळू हळू पचनी पडतील. मुळात या जगात आपलं येणं हे दोन कारणांसाठी आहे, हे आधी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला जन्मतः प्राप्त झालेल्या संचितातील भाग भोगून वा उपभोगून संपवण्यासाठी आणि त्याचबरोबर पुढील कर्मफल योग्य व्हावे याची तजवीज आता करावी यासाठी.
मुळात आपण यात जो गोंधळ करतो तो ध्यानात घेतला पाहिजे. आपण आज जे चांगलं कर्म करतो त्याची आणि आज जे भोग भोगतो त्यांना एकत्र करून समीकरण मांडण्याचा प्रयत्न करतो वा मांडतो. गडबड तिथेच होते. साधं उदाहरण देतो.तुमचं आधीचं कर्ज बाकी आहे, ते भरत असताना सध्याच्या गरजा कमी करून ते फेडावं लागेल. त्यामुळे आताची मिळकत जास्त असूनसुद्धा ती पुरणार नाही किंवा पुरली तर हाती काही उरणार नाही.
अश्या वेळी आपण सध्याच्या मिळकतीला दोष देऊ का. तर नाही देणार. मग आपण तो दोष आधीच्या शिल्लक कर्जाला देऊ आणि ते फेडू न शकलेल्या स्वतःला. यावर व्यवहारात एकच उपाय सध्याची मिळकत वाढवून आधीचं कर्ज फेडून टाकणं. म्हणजे मिळकतीवरील तो भार दूर करणं. पण हे करत असताना नवीन कर्ज होणार नाही याची दक्षता घेणं.
जे व्यवहारात शक्य आहे ते पारमार्थिक जीवनात शक्य आहे का. तर हो शक्य आहे. प्रथम संचितातील भोग आणि माझं आजचं सदवर्तन यांचा गोंधळ बंद करणं. तदनंतर आधीच्या कर्मभोगांना मिटवून नवीन कर्मभोग तयार होणार नाहीत यासाठी उपाय करणं. तोच उपाय म्हणजे मन पुढील वाटचालीवर स्थिर करून हे मर्म मनात पक्के करणं की, मी आजपासून जे करतोय त्याने माझं पुढील प्रारब्ध हळूहळू सुधारेल पण तोपर्यंत जे भोग येतील ते मला सहन करुनच पुढे जाणं गरजेचं आहे. कारण एका क्षणात काही बदल संभवेल हे शक्य नाही.
एक उदाहरण देतो, एखाद्या कोरड्या वा नवीन बांधलेल्या भिंतीवर पाणी मारताना सुरवातीला पाणी प्रत्येक वीट अन वीट शोषून घेते. त्यानंतर मग ते पाणी इतर कोरड्या भागाकडे प्रसारित करते. आपण आज सुरू केलेलं वा आजपर्यंत केलेलं नामस्मरण वा साधन हे त्या कोरड्या भिंतीवर मारत असलेल्या पाण्यासम आहे. ती कोरडी भिंत म्हणजे संचित. ते संचित संपायला वा भिंत भिजायला लागणारं पाणी हे जास्त असेल, म्हणजेच नामाचा जोर हा कायम ठेवून हळूहळू वाढवावा लागेल.
तो किती व कितीकालपर्यंत हे तुमचे सद्गुरू ठरवतील. गुरुकृपा व गुरुमहिमा ही अशी गुरुकिल्ली आहे की जी, या भिंतीवर मारत असलेल्या पाण्याच्या नळाप्रमाणे आहे. त्याचा प्रवाह जितका जास्त तितकी भिंत लवकर भिजेल. म्हणजेच गुरुकृपा जितकी लवकर तितका प्रारब्धाचा जमाखर्च लवकर भरून निघेल.
विचार करा. पुढील भागात बघूया.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०३/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment