भोग आणि ईश्वर ६१
नाम सुरू करताच क्षणात सर्व भोग, कष्ट, काळज्या, दैन्य, निराशा दूर होतील असा भाग नाही. कारण तसा जर तो असता तर, श्रीकृष्णाच्या सर्वात निकट, नव्हे हृदयात अखंड निवास करणाऱ्या पांडवांना, वनवास घडला नसता. तो त्यांच्या चुकीच्या कर्माचा, अर्थात अन्याय कारक द्यूतात भाग घेऊन त्यात वाहावत गेल्याचा भोग होता आणि तो त्यांना भोगावाच लागला.
परंतु श्रीकृष्ण वनवासाच्या प्रत्येक क्षणात त्यांच्या सोबत होता, सावलीसारखा, कारण कुंतीसह पांडवांच्या हृदयात, मनात आणि ओठांवर नित्य श्रीकृष्ण जप होता, त्याचं नित्य स्मरण होतं, किंबहुना विस्मरणच नव्हतं. त्याचप्रमाणे हा भोग भोगूनच संपवू हा त्यांचा मनोनिग्रह दृढ होत, म्हणून परमेश्वर सोबत होता.
एक मुख्य गोष्ट लक्षात घ्या की, त्या वनवासात एक क्षण देखील पांडवांना असं क्षणमात्र मनात आलं नाही की, आपण अखंड श्रीकृष्ण स्मरण करत असूनसुद्धा हे भोग का.? कारण ते ज्ञानी होते. जाणत होते की, केलेल्या प्रमादांची ही कर्मफल प्राप्त शिक्षास्वरूप भोग आहे, तो भोगूनच संपवला पाहिजे. अन्य कर्तव्याप्रमाणे हेदेखील एक निजकर्तव्य आहे.
मग नामाने काय साध्य होतं. तर भोगांची सुलभता येते. त्यासाठी लागणारी आत्मशक्ती जागृत होते. नाम घेताना कोणताही किंतु राहता कामा नये. कारण साशंक मनाने केलेलं कोणतंही कर्म इष्ट फलप्राप्ती देत नाही. आपण जेंव्हा एखाद्या कार्यात साशंक वा पूर्णकेंद्रित नसतो, तेंव्हा मनातून त्या कार्यासाठी उत्पन्न होणाऱ्या लहरी या अल्प किंवा अपूर्ण क्षमतेच्या असतात आणि अपूर्ण क्षमतेने उत्पन्न झालेल्या लहरी वा तरंग ध्येयाप्रत पोचण्यास अकार्यक्षम असतात.
ज्याप्रमाणे इथून चंद्रावरील वा मंगळावरील यानाला पाठवलेले संदेश हे त्या यानातील सर्व व्यवस्था, मार्गातील सुलभता आणि संदेश पाठवणार्या पृथ्वीवरील यंत्राची कार्यक्षमता या सर्वांच्या एकूण प्रमाणात असते. आपण ही गोष्ट एक दोन वर्षांपूर्वी घडलेल्या मंगळावर पाठवलेल्या यानाच्या संदेशवहन यंत्रात, यान मंगळावर ऐन उतरण्याच्या क्षणी, झालेल्या बिघाडामुळे उत्पन्न तांत्रिक दोषांच्या वेळी पाहिलं. त्यावेळी सर्व शास्त्रज्ञांचे काही महिने वा वर्षांचे कष्ट अपूर्ण ठरले, मात्र संदेशवहनातील तांत्रिक दोषांमुळे.
या आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे मानवी देहरचना एखाद्या यंत्राप्रमाणे आहे. ज्यात संदेशवहन, प्रसारण व संदेशप्राप्ती अशी सर्व व्यवस्था विधात्याने घडवून ठेवली आहे आणि बाह्य जगताशी वा बाह्य जगतातून येणाऱ्या संदेशांना प्राप्त करण्याची क्षमता त्यात आहे. मात्र ती कार्यान्वित करण्याचं तंत्र हे अष्टांग योगयाग, होमहवन, इतर तंत्रमंत्र, चित्ताची एकाग्रता म्हणजेच ध्यानधारणा समाधी इत्यादी माध्यमातून प्राप्त होतं.
त्यामुळे ज्या ज्यावेळी आपण किंचित जरी साशंक होतो वा काही शंका, प्रश्न वा गैरहेतु मनात ठेवून नाम घेतो त्या त्यावेळी वर विवेचन केल्याप्रमाणे इच्छित स्थळी संदेश सदोष जातात आणि नाम घेण्याचं इच्छित साध्य होण्यास अडथळे येतात. त्यानंतर आपणच आपल्या नामाची उपयुक्तता प्रश्नाने अधोरेखित करतो. जे पूर्णतः अयोग्य व गैर आहे.
म्हणूनच काहीही शंका वा किंतु वा प्रश्न मनात आल्यास, त्याला नामाच्या मार्गातून खड्यासारखा दूर सारून, मात्र नामावरच लक्ष केंद्रित करून, पुढे जावे. शंकेचे निराकरण आपले सद्गुरू नित्य, योग्यवेळी करतील हा ठाम विश्वास ठेवावा. हेदेखील लक्षात ठेवावं की, सद्गुरूंची इच्छा ही अंतिम समजावी. तुम्हाला आजच एखाद्या प्रश्नाचं उत्तर हवंय, परंतु त्यांना त्याबाबत जास्त ज्ञान व माहिती असल्या मुळे त्याचा निर्णय सर्वस्वी त्यांच्यावर सोपवून निश्चीन्त राहावं.
नामाचा प्रथम व अंतिम उद्देश इष्टदेवतेपर्यंत आपलं नाम पोहोचवणं हाच असावा. यात आपणच आपलं सहाय्य करू शकतो, निःशंक मनाने, दृढ निश्चयाने आणि एकात्म भावाने नाम घेऊन.
एकात्म भाव म्हणजे काय ते पुढील भागात पाहूया.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३०/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment