मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २८
|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||
हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी |
दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||
या स्तोत्राच्या पठाणाचा दृढसंकल्प संदेहरहित भावाने मनात योजून तो कार्यान्वित करावा. कश्या प्रमाणात याबद्दल माझा तर्क पुढील प्रमाणे.
संख्या चंद्रकळा गुणे. याचं मी वाचलेलं विवेचन असं आहे की, शुक्ल पक्षात चंद्राची जशी प्रतिपदा ते पौर्णिमा कला वाढत जाते, तशी या स्तोत्रपठणाने साधकाची उत्तरोत्तर प्रगती होत जाते. पण यातून दुसरा अर्थ असा निघू शकतो की कृष्ण पक्षात जश्या चंद्राच्या कला कमी कमी होत जातात त्याप्रमाणे अधोगती होऊ शकते का?. समर्थांनी फक्त उपमा देण्यासाठी या दृष्टांताचा वापर केला असेल हे संभवत नाही.
म्हणजे मग नक्की काय अर्थ अभिप्रेत असेल, याचं संशोधन करूया. यात संख्या शब्द आला आहे आणि संख्या म्हणजे गणना, मोजणी, अर्थात किती वेळा, असा अर्थ अभिप्रेत आहे असा माझा तर्क आहे. गुणे म्हणजे गुणोत्तरीत उत्तर अर्थात गुणाकार करणे. कसा तर चंद्राच्या जशा कला आहेत त्याप्रमाणे गुणोत्तर काढून. अर्थातच जश्या चंद्राच्या कला शुक्लपक्षात चढत जातात व कृष्ण पक्षात उतरत जातात, तश्या प्रमाणात वा त्या संख्येसम या स्तोत्राचे पठण करावे.
म्हणजे प्रतिपदेला एकवेळा द्वितीयेला दोनवेळा अश्या पद्धतीने पौर्णिमेला 15 वेळा पठण करून पुन्हा कृष्णपक्षा तील प्रतिपदेपासून संख्या कमी कमी करत जाऊन अमावास्येला एकवेळ पठण करावे असा त्याचा अर्थ निघतो असं माझं अनुमान आहे. या प्रमाणात पठण केल्यास या स्तोत्राचा जो शारीरिक व मानसिक लाभ आहे तो योग्य पद्धतीने होईल आणि अंती अंतरात्मा योग्य मार्गाला जाईल.
शरीरशास्त्र, योगशास्त्र यांच्या अभ्यासप्रमाणे , कुंडलिनीच्या सात चक्रांच्या व मेंदूच्या कार्यक्षमता वाढीसाठी ज्या स्वरांची आवश्यक असते, ते सर्व स्वर त्यांच्या योग्य त्या उच्चारांसह व अपेक्षित शब्दांसह मारुतीस्तोत्रात समर्थांनी योजले आहेत. ट ठ ड ढ ण ळ या विशिष्ट पद्धतीने उच्चारायचे स्वर व त्या स्वरांनी तयार होणारे शब्द, मारुतीस्तोत्रात समर्थानी जाणीवपूर्वक रचले आहेत हे नक्की. याकारणाने व त्यांच्या सुनियोजित गुणोत्तर पद्धतीने केलेल्या पठणाने १,२,३,४ ते १५ आणि पुन्हा १५, १४, १३ ते १ अश्या विशिष्ट क्रमात पठण केल्यास त्याचे योग्य ते शास्त्रीय लाभ, पठणकर्त्यास नक्कीच होईल. म्हणून समर्थांनी संख्या चंद्रकळा गुणे असा शब्दप्रयोग योजला असावा. अन्यथा गुणे हा शब्द योजण्याचं प्रयोजन काय असावं.
म्हणून जर या चढत्या व उतरत्या क्रमाने याचे पठण करून पाहिले तर निश्चितपणे, समर्थांना अपेक्षित लाभ होतील. म्हणून समर्थांना अपेक्षित पद्धतीने करून पाहायला हरकत नाही. मात्र कमीतकमी तीन मास करून बघावं. हानी नक्कीच होणार नाही, हे नक्की.
इथे अजून एक गोष्ट सांगताना आनंद होत आहे की, रामरक्षा आणि मारुतीस्तोत्र भावार्थ यांचं एक सामायिक पुस्तक वा पुस्तिका काढायचा प्रयत्न चालू आहे. लवकरच त्यासंबंधी घोषणा इथेच करीन. परंतु ज्यांना आगाऊ नोंदणी करायची आहे अथवा नाव देऊन ठेवायचं असेल त्यांनी आज सांगितल्यास त्याप्रमाणे कमीतकमी तितक्या प्रतीच्या छपाईचा विचार करता येईल. इथेच अथवा लेखाखाली दिलेल्या व्हाट्सऍप क्रमांकावर सांगू शकता.
भाग २९ अंतिम भाग असेल.
क्रमशः भाग २८ .......
|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
२९/११/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment