Skip to main content

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १२

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १२

|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषिका ||४||

प्राणनाथा. मरुत अर्थात वायूदेवतेचा पुत्र असल्याकारणाने पवनपुत्र हनुमान हा जगतात श्वासोच्छ्वास रुपात सर्व अंतरात्म्यात वास करून असतो. अर्थात प्राणरूपात हनुमान या जगतात समस्त प्राणीमात्रांचं जीवन चालवतो. म्हणून जगतातील प्राणिमात्रांच्या प्राणांचा स्वामी वायूपुत्र हनुमान असल्यामुळे जगताचं चलनवलन हे हनुमंत नियंत्रित करतो. कलियुगात जगताची सुव्यवस्था हनुमंताकडे सुपूर्द केली असल्याकारणाने जगताचं जीवन हनुमान आहे. म्हणून प्राणनाथा. 

हनुमंताचं अस्तित्व हे रामायण काळापासून म्हणजेच त्रेतायुगापासून असल्यामुळे समर्थ हनुमंताला पुरातना म्हणत असतील का. मुळात हनुमंताचं देहरुप अस्तित्व हे भलेही त्रेतायुगापासून असेल तरीही रुद्राचा अंश असल्याकारणाने हनुमंत हा अनादी काळापासून अस्तित्वात आहेच. त्याचं प्रकट होणं त्रेतायुगात घडलं. त्याशिवाय नुसत्या युगांचा जरी विचार केला, तरी प्रत्येक चार युगांच्या नन्तर, प्रलयाच्या पश्चात सर्व रचना पुनः निर्माण होते. त्यांनतर त्याच क्रमाने सर्व जीव व जीवन क्रम पुनः सुरू होतो. 

अश्या वेळी सर्व घटित पुनः त्याच क्रमाने घटत जाते. याच क्रमाने सत्तावीस युगं होऊन गेली आणि  अठ्ठावीसाव्या युगातील शेवटचं युग अर्थात कलियुग सुरू आहे. म्हणजेच पहिल्या युगांच्या काळापासून रुद्र व त्याचे अंश या जगतात वावरत आहेत. अर्थातच प्रत्येकवेळी हनुमंत पुनः पुनः कलियुगाच्या अंतापर्यंत आपलं अस्तित्व जपून अंती पुनः शिवपदास प्राप्त होतो. तरीही त्याचे अस्तित्व जगतात राहतेच. म्हणून या पार्श्वभूमीवर समर्थ हनुमंतास पुरातना हे विशेषण लावत आहेत. 

ज्यांचं भाग्य थोर त्याला आपण भाग्यवंत, ज्यांचं औक्ष म्हणजे आयुष्य भरपूर असतं त्याला औक्षवंत म्हणतात. वंत म्हणजे भरपूर असलेला. अर्थातच वादातीत हनुमंत अमाप पुण्य असलेला असा भक्त, दासांचाही दास आहे. वंत या शब्दाचा अर्थ अतीव असलेला, असा आहे. हा वान या शब्दांचं रूप आहे. इंग्लिशमध्ये ज्याला सुपेरलेटीव डिग्री म्हटलं जातं त्याप्रमाणे. वान म्हणजे असणे. पण वंत म्हणजे अनंत प्रमाणात असणे. भाग्यवान भाग्यवंत, धनवान धनवंत, श्रद्धावान श्रद्धावंत. त्याचप्रमाणे पुण्यवान आणि पुण्यवंत. मारुतीचं पुण्य हे अमाप, अगणित, अमूल्य असं आहे म्हणून समर्थ म्हणतात मारुती हा पुण्यवंत आहे, नुसता पुण्यवान नाही. 

एखादा मनुष्य वृत्तीने एखाद्या विचारांचा वा गुणांचा असेल तर आपण त्याला शील हा शब्द वापरतो जसं कृतिशील, विचारशील, सुशील इत्यादी. समर्थांना त्याच उक्तीत हे सांगायचं आहे की हनुमंत हा अंतरात्मा वृत्ती चित्त असा अंतर्बाह्य पवित्र, मंगलमय, शुद्ध, सात्विक, सत् चित् स्वरूपी आहे. त्याच्या चित्ताची शुद्धता इतकी अंतर्बाह्य शंभर टक्के आहे की सीतामातेच्या शोधार्थ लंकेत रावणाच्या अंतःपुरात गेलेला असताना तिथे असंख्य राजकन्या अनावृत्त अवस्थेत असून देखील हनुमंताच्या चित्तातील शुद्ध जलाशयात एक अंश तरंग देखील उठला नाही. अत्यंत शुद्ध मंगल म्हणून शील अर्थात अंतरात्मा, चित्त, मन, हृदय शुद्ध आहे आणि जे जे शुद्ध पवित्र सात्विक ते ते शील पुण्यकारक.

मुळात पुण्य आणि पाप या शब्दांचे अर्थ हे आपण समजतो त्याप्रमाणे नाहीत. आपण समजतो त्याप्रमाणे आपण एखादं सत्कार्य वा सत्कर्म केलं की पुण्य मिळालं. पण मुळात हे मिळालं वा मिळवलं जिथे आहे तिथे देणंघेणं आलं. जिथे देणंघेणं आलं तिथे फक्त व्यवहार आला. पुण्य ही मनाची ती अवस्था आहे जिथे शुद्धता, सात्विकता, सत्यता ही वृत्तीत आणि कृतीत दोन्हीमध्ये समप्रमाणात ओतप्रोत भरलेली आहे. 

अशी शुद्धता सात्विकता वा सत्यता काही प्रमाणात सुद्धा जरी नसेल तरी मनात उमटणारे काही नकार तरंग मनाला  थोड्याफार प्रमाणात का होईना अशुद्ध करतात. ही शुद्धता हेच पुण्य आणि त्याचा थोडासा वा फार अभाव म्हणजे पाप. म्हणून गीतेतसुद्धा भगवंतानी सांगितलंय की पाप आणि पुण्य या मनाच्या अवस्था आहेत. ते जे सांगितलं ते याच अर्थाने. संपूर्ण शुद्ध सात्विक पवित्र मन म्हणजे पुण्यशील. मनातून वृत्ती तयार होतात. म्हणून वृत्ती पवित्र असतात तेंव्हा त्यामागे असलेलं मन हे पुण्यकारकच असतं. जे हनुमंताचं शील, वृत्ती, आत्मा शुद्ध आहे गंगा नर्मदेच्या निर्मळ जलासम. 

क्रमशः भाग १२ ..... 

|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
१३/११/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९७०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...