मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ८
|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||
महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें |
सौख्यकारी दु:खहारी, धूर्त, वैष्णवगायका ||२||
llभोळाभाव जगती जाणतो आत्माll llअवनीवर सर्वत्र जाणिजे परमात्माll.
या संकल्पनेला मानणारे भक्त साधक श्रद्धाळू हे विनाअपवाद साधे सरळ सन्मार्गी असतात.
कालच्या भागात मी मांडलेली संकल्पना वादातीत एखाद्या भगवत्भक्ताची आहे. तरीही याचा हनुमंत, मारुती स्तोत्र व धूर्त या शब्दाशी काय संबंध असा प्रश्न काल बऱ्याच वाचकांना आणि साधकांना पडला असेल. म्हणूनच काल पारंपरिक श्रद्धायुक्त व भक्तिमार्गी साधकाची, दासाची वृत्ती विषद केली आणि लेखात मुद्दाम थोडी उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
आता समर्थांकडे वळूया. त्रेतायुगात ज्यावेळी मानववृत्ती व प्रवृत्ती या सद् व सनद् मार्गावर प्रामुख्याने अग्रक्रमित होत्या, त्या काळात असुर वृत्तीशी प्रवृत्तीशी लढण्यासाठी देवपणाचा वा तत्सम दैवीशक्तींचा प्रभाव असणं गरजेचं आहे असा एक समज दृढ होता. तो तसा समज आजही बऱ्याच प्रमाणात कायम आहे. यात एक भजन देखील मला स्मरत आहे. वैष्णव जन तो तेणे काहीये जे पीड पराई जाने रे परदुःखें उपकार करे और निंदा न करे केणी रे. यात अर्धा भाग एखाद्या भगवंत भक्ताचा आहे.
कारण सर्वकाळी आणि सर्ववेळी सज्जन माणसंच आपल्या समोर येतील असं नाही. असुरशक्ती या मानवी मनात त्रेतायुगात देखील उपस्थित होत्याच. त्यांचं प्रमाण कलियुगात प्रचंड वाढलं आहे इतकंच . त्याचप्रमाणे अश्या शक्ती स्वमनात देखील दडलेल्या असतातच. अश्या नकारात्मक असुरी शक्ती नेहमी आपल्याला विशेषतः सन्मार्गी मनाला व व्यक्तींना सहज त्यामार्गाने जाऊ देत नाहीत. अश्या स्थितीत मन दुःखी होऊन खच्ची होण्याचा संभव जास्त असतो. किंबहुना तसाच धोका वा परिणाम सहसा पाहायला मिळतो. यात दुष्ट नकारात्मक शक्ती चांगल्या मनावर, संस्कारांवर मात करताना दिसतात. याचं कारण आपण सहसा स्वतः मार्ग बदलून वा असुर शक्तींना धडा शिकवायला युक्त्या क्लुप्त्या वापरत नाही. आपण सर्व दैवाधीन राहतो. परंतु इथे काही उदाहरणं देऊन हनुमंत हा महान सदभक्त असूनसुद्धा शत्रूशी लढताना संकंटांचा सामना करताना आपलं तत्व जपत असतानासुद्धा शत्रूच्या दुष्ट चाली, खेळी, कारवाया यांचा बुद्धी व युक्ती वापरून प्रतिकार तर करतोच पण त्याच्या चाली त्याच्यावर उलटवण्याचं कसबदेखील त्याच्या अंगी आहे हे सांगतो.
पहिल्याच लंका भेटीत फक्त देवी सीतेला श्रीरामांचा संदेश पोचवून कार्यसिद्धी झाली असे जाणून सहज परतून येऊ शकला असता. तरीही अशोकवनातील झाडांचा विध्वंस करून मुद्दाम आगळीक काढून रावण दरबारी दाखल करवून घेतो. विभीषणाच्या हस्तक्षेपानंतर अद्दल म्हणून फक्त शेपटीला आग लावण्याची शिक्षा मिळाल्यानंतर लंकादहनाने शत्रूला दिलेल्या शिक्षेचा पश्चाताप करायला लावतो. यातील कोणत्याच गोष्टी श्रीरामांनी करायला सांगितल्या नव्हत्या आणि या केल्याने प्रभू संतत्प होतील वा नाही याचाही विचार त्याने केला नाही. तरीही आपली चलाखी आणि बाजी उलटवून टाकण्याची कुशलता रावणाच्या लक्षात आणून देण्याचा धुर्तपणा हनुमंताकडे होता. म्हणून समर्थानी जाणीवपूर्वक हनुमंताच्या या गुणप्रवृत्तीचा उल्लेख केला आहे. यालाच सांप्रत काळात काही वर्ष आधी सावरकरांनी सद्गुण विकृती हा शब्द वापरला होता. तो याच संदर्भाने. या व्यतिरिक्त अनेक प्रसंगात हनुमंताने आपल्या धूर्तपणामुळे कार्य सफल करून शत्रूला परास्त केलं आहे. समर्थाना यातून जे सुचवायचं आहे ते हे कि, भक्त असलात, सन्मार्गी असलात म्हणजे भोळे असलंच पाहिजे असं नाही. त्याचप्रमाणे कपटी व कारस्थानी लोकांची कारस्थानं ओळखण्याचा धुर्तपणातरी, हनुमंताचा आदर्श समोर ठेवून, आपल्या अंगी बाणवा, अशी साद समर्थ अप्रत्यक्षपणे जनसामान्यांना घालत आहेत.
भोळाभाव हा भगवंताप्रती असावा. परंतु समोर जर लबाड व्यक्ती आली तर त्याच्या कुरापती त्याच्यावर उलटवून आपला धुर्तपणा त्याच्या लक्षात आणूंन देणं गरजेचं आहे. या गोष्टी सामान्य जीवनात, कार्यालयीन कामात, राजकारणात व युद्धजन्य परिस्थिती अश्या सर्व ठिकाणी उपयोगी आहेत. इथे मला माझे सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं एक सुंदर वाक्य वा सुभाषित आठवतं. ते म्हणायचे कि, "तुम्ही दुसऱ्याला फसवण्या इतके लबाड होऊ नये. परंतु दुसर्याकडून फसले जाण्याइतके भोळे देखील राहू नये". कदाचित समर्थाना अपेक्षित धुर्तपणा हा याच प्रकारातील आहे, जो हनुमंताने आपल्या आदर्श जीवनात दाखवून अनेक प्रसंगात उद्धृत केला. तो धुर्तपणा निदान आपल्या फसवणुकीच्या वेळीतरी वापरून स्वतःचं, फसवणुकीपासून रक्षण करावं. हीच समर्थांची अपेक्षा आहे.
वैष्णवगायक. पूर्वी म्हणजे समर्थांच्या काळापर्यंत गायक हा मुख्यतः एखादी देवाधर्माची वा पराक्रमी राजाची अथवा पुराणातील कथा आपल्या गाण्यातून, भजनातून मांडून आपल्या आराध्याचा प्रचार व प्रसार करून धर्माचं कार्य करत असत. हनुमंत देखील याच प्रकारातील भक्त आहे. हनुमंत हा प्रभूंच्या गुणवर्णनाने समस्त जगतात प्रभूंच्या नामाचा, त्यांच्या महिमेचा प्रचार वारंवार करतो. त्यासाठी ठराविक टप्प्याने वा काळाने प्रत्यक्ष पृथ्वीवर मानवीरूपात जन्म घेऊन प्रभू कीर्तनाचा प्रचार व प्रसार नित्य करत असतो. वैष्णव म्हणजे जो जगत्पिता प्रत्यक्ष महाविष्णू व त्यांचं अवतारी रुप यांच्या भक्तीत रममाण असतो तो वैष्णव जन. आपले प्रभू व त्यांच्या कार्याचा, नामाचा गौरव जगतात मांडून लोकांना त्याचं महत्व पटवून भक्तिमार्गाला लावून त्यांचा इहलोक आणि परलोक दोन्ही सुकर व्हावेत हाच उद्देश अश्या वैष्णव गायकाचा वा भक्ताचा असतो. हनुमंताच्या या भक्तिकार्याचा व फक्त आपले इप्सित सध्या न करता सर्वसामान्य जन या भक्तीत लीन होऊन स्वहित साधतील या भगवंत आणि भक्त यांच्याप्रती असलेल्या आपलेपणाचा यथोचित गौरव समर्थ करतात. म्हणूनच हनुमंत ज्या ज्या ठिकाणी रामानामाचा प्रसार व रामानामाचं कीर्तन भजन हे चालू असेल त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या रूपात उपस्थित असतो तो याच कारणाने. प्रभूंप्रती प्रेम भक्ती आस्था आणि अश्या वैष्णवजनांप्रती कृतज्ञता.
या इथे श्लोक दोन समाप्त होत आहे. पुढील भागात मारुतीच्या स्तुतीपर नामाभिधानांचा वा विशेषणांचा पुढील श्लोक आपण पाहू.
क्रमशः भाग ८ .....
|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
०९/११/२०२०
Comments
Post a Comment