मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ५
|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम उय जयराम ||
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें |
सौख्यकारी दु:खहारी, धूर्त वैष्णवगायका ||२||
रामदूता या नामाभिधानात मारुतीचं एक रूप, दास्यत्वाची प्रचिती दिल्यानन्तर समर्थ त्याच्या शक्तीचं प्रत्यंतर देणारं आणि मरुताचं प्रलयंकारी स्वरूप हनुमंतात प्रकट करणारं नाम वा स्वरूपविशेषण सांगून पहिल्या श्लोकाची समाप्ती करतात.
वाऱ्याच्या प्रलयंकारी वादळी वावटळी रुपाला प्रभंजन म्हणतात. प्रभंजन म्हणजे वादळाचं विराट रुप. भंजन म्हणजे नष्ट करणं. प्र भंजन म्हणजे प्रलयंकारी भंजन. या हनुमंताच्या स्वरूपात वा गुणविशेषात मारुतीची प्रत्यक्ष शक्ती किती असामान्य आहे याचा प्रत्यय समर्थांना द्यायचा आहे. कारण मुळातच हे स्तोत्र मारुतीच्या शक्तीस्वरूपाचा उपयोग समाजाला समजावा या उद्देशाने लिहिलं आहे. हेदेखील सांगायचं आहे की, अश्या स्वरूपाला थांबवण्याची शक्ती जगतात कोणतंही नाही.
वनारीचा एक अर्थ इथे सांगतो जो एका वाचकांनी लिहिला होता, प्रस्तुत श्लोकात तो अर्थ अभिप्रेत असावा असं मला देखील जाणवलं. वन आरी म्हणजे अशोकवनात मोठं मोठ्या वृक्षांना आपल्या विराट शक्तीने सहजी जमीनदोस्त करणाऱ्या मारुतीच्या स्वरूपाला उद्देशून समर्थानी हा शब्द वापरला असेल. हा अर्थ गृहीत धरून, या एका श्लोकात त्यांनी मारुतीच्या आठ नावांनी संबोधून आवाहन केलं आहे. भीमरूपी, महारुद्र, वज्रहनुमान , मारुती, वनारी, अंजनीसुत, रामदूत, प्रभंजन.
दुसऱ्या श्लोकातसुद्धा समर्थ हनुमंताच्या गुणविशेष अजून विस्ताराने प्रकट करतात. पहिलाच गुणविशेष महाबळी म्हणजेच महाबली. बळ आणि बल हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत. बळ म्हणजे शक्ती. शक्तीची अत्यंत विराट आवृत्ती म्हणजे महाबळी. अत्यंत बलवान, बलिष्ठ, शक्तीवान. हनुमंताच्या या बळापुढे कसलीही इतर उपमा न सुचल्या कारणाने वा दुसऱ्या कसल्याही शब्दात ती मांडण्यापेक्षा समर्थांनी एकच शब्द आधारभूत घेतला. महा. म्हणजे अत्यंत, असाधारण अतुलनीय या अर्थाने महा.
प्राणदाता. या हनुमंताच्या पराक्रमात प्रत्यक्ष श्रीराम कायम स्वरूपी ऋणी राहिले. इतकं विलक्षण कर्तृत्व हनुमंताचं या एका शब्दात प्रकट होतं. आपण खूप वेळा म्हणतो की होणार तेच होतं, प्रारब्धात जे असेल ते होतं. परंतु काही काही वेळा वा प्रसंग असे असतात की ते एखाद्या कार्यावर अवलंबित असतात. म्हणजे ते घडण्याचा योग क्षीण असतो आणि तो एखाद्या कर्माने, प्रयत्नाने साध्य होतो.
लक्ष्मण ज्यावेळी इंद्रजीताच्या अस्त्राने मूर्च्छित होतो. वैद्य सुशेण यांना त्यांच्या राहत्या घरासह मारुती घेऊन येतो. हे कार्यसुद्धा अतुलनीय आहे. प्रभू शोकमग्न आहेत. त्यांना माता कौशल्येचे शब्द आठवतात. माझ्या लक्ष्मणाला घेऊनच अयोध्येत पाऊल ठेव, अन्यथा परत येऊ नकोस. जर लक्ष्मणाला खरच काही झालं तर माता कौशल्येला कोणत्या शब्दात सांगू.
इथे एक लक्षात घ्या की, माता कौशल्येला ज्ञात होतं की, लक्ष्मण हा बंधुप्रेमी आहे. ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्यासाठी प्रसंगी प्राणांचीही पर्वा करणार नाही. त्यामुळे त्याच्या प्राणांचं रक्षण करण्याची मोठी जबाबदारी मातेने श्रीरामांच्या शिरावर टाकली आहे. श्रीराम सर्व शक्तीवान, सर्वज्ञ परंतु मानवी रूपातील मर्यादा इतक्या कठोरपणे पाळतात की, अमोघ अस्त्र, शस्त्र, दैवी विद्या ज्ञात असूनसुद्धा प्रत्यक्ष बंधू लक्ष्मण यांच्यासाठीही न वापरण्याची मर्यादा ते पाळतात. इतकी कठोर मर्यादा पाळतात म्हणूनच त्यांना मर्यादापुरुषोत्तम हे नाम शोभून दिसतं.
त्यांची ही स्थिती मारुतीराया जाणून आहेत. अश्या कठोर परिक्षेच्या प्रसंगात हनुमंताने आपलं बल, बुद्धी, सिद्धी, धैर्य, स्वामिनिष्ठा आणि कार्याउपरांत प्रभूंच्या चरणी लीन राहून त्यांना सर्व श्रेय देण्याची महान विनम्रता यांचा परिचय व प्रत्यय दिला.
या प्रसंगावर पुढील विवेचन उद्याच्या भागात.
क्रमशः भाग ५ .....
|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
०६/११/२०२०
Comments
Post a Comment