मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २३
|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा |
वाढतां वाढतां वाढें, भेदिले शून्यमंडळा ||१३||
तर अश्या प्रकारची तयारी करून एखादं क्षेपणास्त्र झेपावतं त्यांनतर त्याचं उड्डाण , प्रयाण, प्रवास आणि पोहोचणे या क्रिया घडतात. ज्या हनुमंताच्या बाबत क्षणात म्हणजे जन्मतः काही मिनिटात घडल्या आणि हनुमंत सूर्याच्या दिशेने झेपावला. कसलं अंतराळवीराचं प्रशिक्षण नाही, तसला पोशाख नाही, यानाची, क्षेपणास्त्राची गरज नाही, स्वयंसिद्ध हनुमंत सूर्याचं फळ खाण्याच्या उद्देशाने झेपावला.
इथे अजून एक गोष्ट दडलेली दिसते, ती म्हणजे, अनेक अतर्क्य गोष्टी कुंडलिनी जागृतीमुळे शक्य असतात. याची प्रचिती म्हणजे जन्मतः सूर्याकडे झेपावणे. मला स्वतःला यात कोणतेही खगोलीय ज्ञान, प्रशिक्षण न घेतलेले एक बालक जन्मतः अवकाशाचा पडदा भेदून सूर्यमालेत प्रवेश करते आणि सूर्य, ज्याकडे आपण बघूही शकत नाही ठराविक अंतरापलीकडे, त्याकडे झेपावून, त्याला आपल्या स्थानापासून, (जे स्थान स्वयंसिद्ध आहे आणि स्वकेंद्रित असा सूर्य हा तारा आहे), हलवून गिळंकृत करण्यापर्यंतची अचाट शक्ती हनुमंतात आहे, याचं विशेष अद्भुत वाटतं.
कदाचित यात विश्वाच्या उत्पत्तीचं रहस्य तर समर्थानी मांडलं नसेल ना. किंवा जी गोष्ट विज्ञानाला त्यांनतर ४०० वर्षांनी शक्य झाली, ती समर्थांना त्याकाळी ज्ञात होती. ती म्हणजे पृथ्वीची कक्षा भेदणे, अवकाशात झेपावणे, सूर्यमालेत प्रवेशणं,( ज्याला आपण सूर्यमाला किंवा सोलर सिस्टीम म्हणतो, तेदेखील आजच्या खगोलीय व वैज्ञानिक ज्ञानामुळे, त्याला समर्थ त्याच काळी सूर्यमंडळ अस नाम देऊन दाखवून देतात की, त्याचं पूर्ण ज्ञान त्याकाळातही सनातन धर्माच्या ग्रंथांमध्ये होतं),
मार्गातील सर्व ग्रह तारे यांचे अडथळे पार करून सुर्यापर्यंत पोहोचणे, या मागे नक्कीच खूप मोठं शास्त्रीय ज्ञान दडलं आहे, जे इथले ऋषीमुनी, वेद ग्रंथ यात मांडलेलं आहे आणि अश्या ग्रंथांचा अभ्यास केलेले समर्थ ते जाणतात आणि भेदीले सूर्यमंडळा या दोन शब्दात ते ज्ञान प्रकटुन मांडतात. हे सर्वच अतर्क्य आहे. याचा अजून सखोल अभ्यास केला तर समर्थांची महती द्विगुणित वा पंच, अष्ट वा शतगुणीत होईल.
मुळात भेदणे म्हणजे छेद देणे, एखाद्या भिंतीला भेग वा खिंडार पाडून, त्यात जागा करून पुढे जाणं. यात अजून एक गोष्ट जी विज्ञानाने आज जाणली ती म्हणजे पृथ्वीची कक्षा आहे, ती भेदावी लागते, तिला भेदण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते, एका विशिष्ट कोनातून ती कक्षा भेदावी लागते हे सर्व ज्ञान दोन शब्दात समर्थ सार्थपणे मांडतात भेदीले शून्यमंडळा.
आता भेदणे म्हणजे काय हे पाहिलं आणि त्यासाठीची शास्त्रीय तयारी मानवाने विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सिद्ध केली.परंतु ती तयारी वा ज्ञान त्रेतायुगात वा त्या आधीपासून भारतात उपलब्ध होतं. कार्यरत होतं आणि दैनंदिन जीवनाचा भाग होतं. हनुमंतासारख्या अद्भुत शक्तीच्या वीरांना ते जन्मतः साध्य होतं.
म्हणजे हनुमंताची शक्ती ही अभिमन्यूहून अद्भुत आणि वंदनीय आहे व कार्य थोर आहे. आणि ते भेदण्याचा मार्ग कोणता तर झेपावे उत्तरेकडे. आधुनिक जगताने जितकी यानं पाठवली (मानवरहीत वा मानवासह) ती सर्व पृथ्वीची कक्षा भेदताना उत्तर दिशेनेच कक्षेबाहेर पडली आणि आत येतानासुद्धा त्याच कोनातून आली. जी चुकली त्यांचं कोलंबिया झालं.
शून्यमंडळ म्हणजे जिथे गुरुत्वाकर्षण अस्तित्वात नाही असा भाग अर्थात पृथ्वीच्या कक्षेबाहेर किंवा कोणत्याही ग्रहाच्या कक्षेबाहेर अवकाशात जिथे गुरुत्वाकर्षण अस्तित्वात नाही. म्हणजेच ज्याला आपण निर्वात पोकळी म्हणू ती जागा म्हणजे अवकाश. म्हणजेच गुरुत्वाकर्षण, त्याची शक्ती, पृथ्वीवरील त्याचं अस्तित्व आणि अंतराळात त्याचा अभाव म्हणून असलेलं गुरुत्वाकर्षण रहित शून्यत्व, असं शून्यमंडळ म्हणजेच अगणित मैलांचा वा परिघाचा प्रदेश हे सर्व समर्थांना ज्ञात होतं. अर्थातच न्यूटनच्या आधी ही गोष्ट वा हे ज्ञान समर्थांनी मांडलंय असं अभिमानाने आपण नक्कीच म्हणू शकतो. अन्यथा शून्यमंडळ हा शब्द समर्थांनी वापरला नसता. शून्य म्हणजे जिथे काहीही आकर्षण अस्तित्वात नाही ती जागा.
समर्थांच्या अध्यात्मिक ज्ञानापेक्षा या वैज्ञानिक ज्ञानावर खरतर अभ्यास करून काही नवीन गोष्टी आपल्याला नक्कीच समजतील. म्हणूनही मारुतीस्तोत्र वेगळं लिहून कदाचित खगोलीय शास्त्राचा पाया समर्थांनी मांडलाय, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
यावर अजून विवेचन पुढील भागात
क्रमशः भाग २३.....
|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
२४/११/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment