(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - २५
नारायणदास महाराज मी कस वर्णन करू त्याच. माझं शब्दसामर्थ्य अत्यन्त अल्प आहे आणि मती फक्त त्याच्या चरणांशी अर्पित, हृदय त्याचच नाम घेतं, ज्याच्यासाठीच मी जगते, अश्या माधवाच वर्णन मी कसं काय करू महाराज"
अस म्हणून राधा प्रेमविव्हळ आणि विरहीघायाळ, अश्रूंसहित हात जोडून नारायणदास महाराजांच्या चरणांवर लोळण घेते. महाराज शांतपणे तिला उठवत म्हणाले
जो तिन्ही लोकी असे पूर्ण व्यापी
जयाचेनी श्वासे ब्रह्मांड झाकी
जयाचे चरणी माया विलासी
तया नाम घेता तरतील पापी
जो सारे उभे तेज फाकून आहे
जो विश्वरूपी प्रकटोनि वाहे
जो जगाचेनि व्यापार संपूर्ण पाहे
तयालागी शब्दात कैसे पाहावे
जो हृदयांबुजे आत्म तत्वे विराजे
रवी शशी तारांगणी व्यापिलें जे
जयानाम घेऊन प्रल्हाद तरिजे
तयानाम नरसिंह अवतार धरिजे
जो माया सकळांसाठी धरुनी
विहारी ऐसा तरीही तरोनी
जो योगांतरी येई योगी बनुनी
म्हणती महाविष्णू तोचि स्मरोनी
माते तुझी भक्ती , प्रेम अलौकिक आहे. ज्याचं वर्णन करता येत नाही असं म्हणत तू त्याच अद्भुत वर्णन करून त्याच संपूर्ण चित्र माझ्या डोळ्यापुढे उभं केलंस. तुझ्या या यथार्थ वर्णनाने जणू तू त्याच दर्शनच घडवलंस मला.
तो घननीळ , योगेश्वर, योगियांचा योगी, परमदयाळू , तेजोमय, महापराक्रमी, पराममंगल स्वरूपाला मी तुझा निरोप पोहोचवीन, असं मी वचन दिलंय तुला , त्या नुसार मी त्वरित भगवान श्रीकृष्ण अर्थात वासुदेव यांच्याकडे जाऊन तुझं दुःख आणि इच्छा त्यांच्याप्रत नेऊन ठेवीन. अर्थात यावेळी ते द्वारकेच्या मार्गावर आहेत आणि उद्या व्दितीय प्रहरी ते द्वारकेस पोहोचतील.
त्यावेळी मी स्वतः त्यांच्या समक्ष जाऊन तुझी मनीषा आणि मनःस्थिती स्वतः कथन करून, इथला समस्त वृत्तांत, अर्थात चक्षुर्वे सत्य त्यांच्यासमोर मांडीन.
भावविव्हळ राधा, या क्षणापर्यंत सावरली होती. ती महाराजांच्या कथनाने आनंदित झाली, पण क्षणात तिला उमगलं कि, महाराज कथन काय करत आहेत. तिने आश्चर्यकारक मुद्रेने पृच्छा केली.
"महाराज इतक्या त्वरेने आपण कसे पोहोचणार. द्वारका तर खूप दूर आहे आणि यात्रा काही दिवसांची आहे. "
महाराज किंचित स्मित करून म्हणाले
"माते आम्हाला काहीही अशक्य नाही. "
"आणि आपण श्रीकृष्णाला ओळखणार कस. आपण तर पहिलच नाहीत."
"माते "
असं म्हणून महाराज आपल्या मूळ रूपात प्रकट झाले. क्षणात राधेला समोर प्रत्यक्ष देवर्षी नारद उभे आहेत हे दिसत. ती सुखद आश्चर्याने थक्क होते. अचानक हे सर्व घडलं असल्यामुळे तिला शब्द सुचत नाहीत. नारद तिला म्हणतात.
"नारायण नारायण, मी नारायणदास अर्थात देवर्षी नारद. राधे तुझ्या भक्तीची आणि प्रेमाची परीक्षा घेण्यास आलो होतो. तुला भेटण्या आधी प्रत्यक्ष भगवान नारायण अर्थात श्रीकृष्ण यांना भेटूनच मी इथे आलो आहे. अर्थात त्यांनी तुझी भेट घेण्याची संमती दिली नाही. तरीही तुझी मनःस्थिती जाणून घेण्याची इच्छा मला इथपर्यंत घेऊन आली. तुझी भक्ती आणि कृष्णाप्रती निर्व्याज प्रेम, निष्कलंक प्रीती, कृष्णाच्या नामात निजानंदी असलेली तुझी वृत्ती हे सर्व पाहून मी थक्क झालो. तू साक्षात एक महान भक्त आणि योगीयांची योगी आहेस. कारण जे करण्यास जन्मोजन्म वाया जातात ते , अर्थात श्रीकृष्णाच्या हृदयात स्थान , तू याच जन्मी साध्य केलं आहेस. म्हणून माझ्या मूळ रूपात येऊन तुला सर्व सत्य कथन करण्याचा मोह मला आवरला नाही. वास्तविक तुझा कृष्ण आणि माझा नारायण हे दोन नसून एकच आहेत. मी देखील तुझ्या प्रमाणे नारायणाचा दास आहे. पण तुझी अपार श्रद्धा, दृढ विश्वास निष्कलंक प्रीती आणि भक्ती हे अनेक पटींनी थोर आहे. मी निश्चित तुझी मनोकामना पूर्ण करण्याचा माझ्या परीने यत्न करिन."
राधा या सर्व घटनेने आधीच दिग्मूढ झालेली , नारदांच्या कथनाने ती स्तंभित होऊन पहात आहे. या सर्व घटनाक्रमात राधेला याच गोष्टीचा आनंद आहे कि, देवर्षी नारदांच्या प्रयत्नाने का होईना, पण कान्हाची आणि आपली एकदा भेट होऊ शकेल. अर्थात कधी ते स्वये नारद आणि कृष्ण जाणतात.
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment