(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ३७
राधेची भावावस्था ही शब्दातीत आहे. साक्षात परमध्येय कृष्ण अर्थात कान्हा, हा गोकुळ, वृंदावन सोडून कायमस्वरूपी द्वारकेस निघाला असतानाच आपल्या दैवताला भेटण्याची इच्छा पूर्ण न होणं, हा दुर्दैवी योग जिच्या आयुष्यात आहे, तीच ही राधा. निस्सीम प्रेम, जाज्वल्य निष्ठा, निष्कलंक भक्तीची परमावधी, मूर्तिमंत भाबडेपणा, अमूर्त त्याग आणि सेवा , अमर्याद नामाचं अपूर्व संचित असूनसुद्धा आपल्या परमेशाला भेटताही न येण आणि तरीही निरपेक्ष वृत्ती म्हणजे राधा.
विरहाचा हा अथांग सागर जीला आता पार करायचा आहे आणि पुनश्च भेट होणं न होणं सर्वस्वी जगनियंता अर्थात परमदयाळू , परमकृपाळू असा परमेश्वर भगवान श्रीकृष्ण यांच्या सुद्धा हाती नाही. कारण नियती कोणालाही चुकली नाही. अस साक्षात नियतीकाराच वचन आहे, शास्त्र आहे आणि त्यावर त्याला ठाम राहणं क्रमप्राप्त आहे. संसाराचे नियम न तोडता, जे शक्य आहे तेच करणं हे त्याचं ब्रीद आहे. म्हणून राधेला फक्त आणि फक्त नियतीचीच आस आणि आसरा आहे.
अश्या राधेची मनःस्थिती वर्णन करणं, प्रत्यक्ष देवर्षीनाही अशक्य होतं. त्यांच्याकडे शब्द कमी आहेत. विरही राधेची सद्यस्थिती दुस्तर भवसागरात अडकून अगतिक झालेल्या एखाद्या भक्ताहून निराळी नाही. सतत एकच आस, एकच नाम, एकच धावा मनात करता करता, राधा अश्रूंनी न्हाऊन निघाली आहे आणि मनात म्हणते आहे, जे देवर्षीच्याच शब्दात सांगायचं तर,
घन बरसत नयनी आले
या राधेला भिजवून गेले
मी शामक्षुधा मृगनयनी
थेंबांचे मोती झाले
घन बरसत ....
भिजली रे वसने सारी
मन तरीही शुष्क निमाले
तू येसी कृष्णा कधी रे
लोचनात अश्रू न उरले
घन बरसत ......
वेणूच्या सुरात थिजले
मल्हारी स्वर ते ओले
किती वीज येऊनि गेली
मन तरीही आसुसलेले
घन बरसत .....
तू कृष्णा येसी म्हणुनी
मनी आस लावूनी बसले
तू परीस लोह मी सखया
तव भक्तीने सोने झाले
घन बरसत .......
मागणे न काही माझे
मोहाचे क्षणही न माझे
एका तव दृष्टीसाठी
देहात श्वास हे उरले
घन बरसत .....
किती वाट पाहावी आता
बरसून नभही गेले
ओल्या मातीच्या गंधी
क्षण सारे स्तब्ध जहाले
घन बरसत .....
आता का जगणे माझे
तू नसता केवळ उरले
श्वासावीण देह जसा का
तैसी मी राधा झुरले
घन बरसत ....
परी आस एक ती आहे
हे प्राणही तुझेच झाले
राधा ही स्मरूनी तुजला
मी कृष्ण कृष्णमय झाले
घन बरसत ....
राधेची विकल अवस्था पाहून देवर्षी नारद, नारायणाचे परम भक्त , हेलावून गेलेत. काय करावं ते सुचत नाहीये. कृष्ण तिकडे द्वारकेत नगर , राज्य , प्रजा स्थिर करण्यात गर्क. अर्थात मनाच्या एका कोपऱ्यात तो सुद्धा राधेच्या भेटीची आस धरून आहे, असणार नक्की.
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment