(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - २७
नारद नमस्कार करून म्हणतात
" नारायण नारायण. जशी आपली आज्ञा."
नारद चिंताग्रस्त आहेत., राधेला दिलेलं वचन आणि भगवंताचा राग या चिंतेत. याच मनःस्थितीत देवर्षी विचार करत आहेत की आता पुढे काय. देवर्षी नारद आकाश मार्गे जात असताना वरून हृदयद्रावक चित्र दिसत आहे. गोकुळात राधा कृष्णभेटीसाठी व्याकूळ आहे आणि इकडे द्वारकेच्या मार्गावर कृष्ण नारदांनी केलेल्या कारस्थानामुळे क्रुद्ध आणि राधेच्या काळजीने व्यथित. दोघांच्याही अंतरातम्याची तगमग वरून स्पष्ट दिसत असताना , आपण काहीही करू शकत नाही याचसुद्धा देवर्षीना वाईट वाटत आहे. यावर ते एकच वाक्य म्हणतात
" कालाय तस्मै नमः . हे गिरीधारी, राधा आणि माझ्या वाचनाची लाज आता आपल्याच हातात आहे. नारायण नारायण"
सर्व लवाजमा रात्रीच्या गाढ निद्रेत ग्रस्त झाला. दादांनी नेहमीप्रमाणे कान्हाला पहुडलेला पाहिलं आणि मगच आपण निद्राधीन झाले. कृष्ण शारीरिक अर्थाने निद्रिस्त भासला तरीही वैचारिक पातळीकर जाग होती. काय करावं आणि कसं करावं. पण देह थकल्यामुळे विचार कधी थांबले ते न समजता कृष्ण भल्या पहाटे दादांच्या उठवण्यामुळे जागा झाला. दादा म्हणत होते
" कान्हा अरे ब्राम्ह मुहूर्त टळून गेलाय. काय आज पुढे जाण्याचा विचार नाही की काय.? "
" दादा निद्रा इतकी गाढ लागली की कधी ब्राम्ह मुहूर्त टळून पहाट झाली समजलच नाही."
"असुदे , असुदे. पण आता लगोलग आवरून तयार हो. तुझं आवरलं की लगेच निघायचं. सारेजण तयार असतील. तुझ्यामुळे खोळंबा नको. आज दुसऱ्या प्रहरापर्यंत आपण द्वारकेस पोहोचूच."
" हा मी आलोच स्नानादी आन्हिक उरकून "
थोड्याच वेळात देवी रेवती, देवी रुक्मिणी यांसह सर्व राण्या त्यांचा सेवकवर्ग आणि समस्त मंडळी तयार झाली प्रस्थानासाठी. कृष्ण येण्याची सर्व जण प्रतीक्षा करत आहेत. कृष्णदेखील लगोलग सर्व उरकून प्रस्थानासाठी सर्वासमक्ष उपस्थित होतो.
"चला दादा आपण आज्ञा द्यावी प्रस्थानाची."
अस कृष्णाने म्हणताच बलरामदादा त्वरित प्रस्थान करण्याची आज्ञा आणि अनुमती देतात. सर्वजण त्वरेने पुढील मार्ग क्रमू लागतात. प्रत्येकालाच आता द्वारकेस पोहोचून आपली गृहस्थी आणि काजसामान नीट लावून लवकरात लवकर स्थिरस्थावर होण्याची जणू घाई लागली आहे. अर्थात ते सहाजिक आहे. कारण आपला सर्व जन्म, नव्हे तर आता पर्यंतच्या सर्व पिढ्यान पिढ्या जिथे गेल्या तो देश, तो प्रांत, त्या भाषिकांना त्या मायभूला सोडून, दूर देशी पूर्णतया नवीन प्रांती यायचं आणि स्थिर व्हायचं आणि यास्तव ही काही दिवसांची यात्रा करावयाची म्हणजे शारीरिक आणि मानसिक पातळीकर जणू परीक्षाच होती.
कृष्ण आणि बलरामदादा यांना या गोष्टीची कल्पना असल्यामुळे मार्गात कोठेही फार कष्टदायक होईल अशी कोणतीही बाब येऊ दिली नव्हती. तसच खाण्या पिण्याची उत्तम व्यवस्था आणि मुक्कामाच उत्तम व्यवस्थापन देखील करण्यात आलं होतं. या सर्वांवर स्वतः दोन्ही बंधू जातीने देखरेख ठेवून होते. प्रत्येक मुक्कामी जास्तीतजास्त लोकांची विचारपूस, एक राजा म्हणून नव्हे तर, सखा म्हणून करण्याचं महत्वाच कार्य, यदुविराने स्वतः पाहिलं होतं. अर्थात ज्येष्ठ बंधू बलरामदादा सुद्धा याला अपवाद नव्हते. किंबहुना घरच्या मंडळींपेक्षादेखील बरोबरीच्या सर्व लोकांची विचारपूस हा धर्म नव्हे तर इतिकर्तव्यता म्हणून पार पडली होती, दोन्ही बंधूनी.
त्यामुळेच मंडळी जरी आता पोहोचण्यास अतिउत्सुक असली तरीही हा कंटाळा प्रवासाचा होता. व्यवस्थेचा नव्हता.
आणि तेवढ्यात पुढील व्यवस्था लावून घेण्यासाठी आधीच पोहोचलेली मंडळी दिसताच, कृष्णाच्या रथापुढे असलेली काही मंडळी अचानक आनंदाने, नव्हे अत्यानंदाने, नव्हे जवळ जवळ हर्षोल्हासाने नाचू लागली
" ती बघा आली द्वारका नगरी, आली आली रे आली द्वारका नगरी"
या घोषाबरोबर कृष्ण , दादा , राण्या आणि त्यांचा साजसंगत, सोबतची सर्व मंडळी हर्षोल्हासित झाली. समोर वाट पहात उभी असलेले सर्व लोक आणि इकडील सर्वजण एकाच आनंदात नाचू गाऊ लागली. मंगल वाद्ये , तुताऱ्या, दुंदुभी, ढोलक, मृदुंग, आदी चर्मवाद्य यांचा नाद आकाशात पोचला. मंडळी नाचू लागली.
आली आली रे द्वारका आली
आमच्या कृष्णाची नगरी आली
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment