(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ३०
अत्यन्त मनोवेधक, चित्ताकर्षक, मनोहारी, अद्भुत आणि मायावी भासणाऱ्या अश्या त्या रम्य द्वारकानगरीच हे दर्शनी रूप पाहता, मनोमन सर्वांनी कृष्णबलराम या बंधूंना नकळत प्रणिपात केला खरा आणि सर्वांचे हात नकळत कधी जोडले गेले ते त्यांना देखील समजलं नाही. ते देखील विस्मय व चमत्कृतीपूर्ण भावाने. एका आश्चर्यचकित करणाऱ्या नवीन नगराला सामोरे जाणारे ते सर्व प्रजाजन , या प्राथमिक दर्शनाने मोहित आणि रोमांचित झाले होते.
जस जसे ते नगरात प्रवेश करत पुढे पुढे जात होते, तस तसे ते अजूनच आश्चर्यमग्न होऊन दंग होत होते. प्रत्येकालाच आता आपापल्या गृहाची आणि त्याच्या अलौकिकपणाची उत्सुकता लागून राहिली होती. पण जे समोर येणार होते ते नक्कीच सुखद धक्का देणारे असेल, हे सुनिश्चित या निष्कर्षाला सर्व आले होते. कारण नगराची सुरवात इतकी सुंदर मनोहारी होती तर बाकीची नगरी नक्कीच देखणी असणार हे सर्व जाणूनच पुढे पुढे जात होते.
सर्व प्रकारच्या सुखसोयी , सुविधा, उत्तम मार्ग मार्गिका, उद्याने , उपवने, ह्या सर्वांचं अवलोकन करत कर्मचाऱ्यानी सांगितल्या प्रमाणे प्रत्येक ग्रामस्थ आपापल्या घराचा ताबा घेऊ लागला. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या सामानाच्या गाड्या पोहोचत्या करण्यात येत होत्या. सर्व प्रजानन राजाने पुरवलेल्या यां सोयीसुविधेमुळे जन्मस्थान बदलाचं दुःख विसरून गेले.
इकडे सर्व व्यवस्था ठरवून दिल्याप्रमाणे होत आहे हे बघितल्यानंतर मगच कृष्ण , बलरामदादा देवी रेवती सह सर्व राण्या यांनी पुढे प्रस्थान ठेवलं. सर्व नगरी फिरून द्वारकेची अवर्णनीय शोभा पाहून समस्तास अचंबा वाटला आणि कौतुक सुद्धा. द्वारका जणू प्रत्यक्ष देवेंद्राच्या अलकापुरीला लाजवेल अशी देखणी आणि मनमोहक दिसत होती. सर्व नगरी संपल्यानंतर राजप्रसादाचा भव्य परिसर सुरू होत होता. कित्येक मैल त्याचा विस्तार होता.
आधीपासून योजना करून नगराची रचना करण्यात आल्यामुळे राजप्रासाद चारही बाजूनी सुंदर वनांनी वेढलेला होता. त्यात उत्तमातले उत्तम विस्तीर्ण व डेरेदार वृक्ष, सुंदर लता, वेली, अनेक सुंदर फुलांची अगणित झाडं, त्या वनांच्या परिघानंतर, उत्तम सजावट व कारंजे यांनी युक्त उद्याने व उपवने होती. उत्तम कारागिरी असलेली बाके, यांची आकर्षक मांडणी, यामुळे ती उद्याने एक उत्तम शिल्पकलेचे नमुने होते. त्यानंतर सेवकवर्गासाठी उत्तम निवास व्यवस्था व अन्य सुविधा यांची वसाहत होती. ज्याला सेवकग्राम अस नाव देण्यात आलं होतं. याच ग्रामात अतिथीग्रामातील सेवकवर्गाची घरे होती.
सेवकग्रामानंतर अतिथीग्राम होत. जिथे एकाच वेळी काहीशे अतिथी उतरण्यासाठी उत्तम गृहव्यवस्था होती. यातील घरे ही उत्तम वास्तुकला योजनेतून साकारण्यात आली होती. आलेल्या अतिथींना विश्राम आणि मनःशांतीचा आनंद मिळावा या उदात्त हेतूने त्यातील खोल्या ह्या हवेशीर आणि मुबलक पाणी व्यवस्था यांनी युक्त होत्या. अतिथीगृहे ही श्रेणीनुसार बांधण्यात आली होती.
जशी राजदूतासाठी एक श्रेणी , आलेल्या अतिथीच्या सेवकांसाठी गृहव्यवस्था , अतिथी हा राजाचा कर्मचारी असल्यास थोड्या वरच्या श्रेणीची घरे, राजाचे मंत्रीगण व अन्य मान्यवर अतिथी असल्यास त्याहून वरच्या श्रेणीतील घरे, राजाचे सेनाप्रमुख व प्रधान यांसाठी अजूनच वरच्या श्रेणीतील गृहरचना व अंतर्गत सजावट आणि प्रत्यक्ष राजासाठी सर्वात उत्तम व्यवस्था असलेली गृहरचना व उत्तम कारागिरीची अंतर्गत व्यवस्था करण्यात आली होती.
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment