(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - २८
आली आली रे द्वारका आली
आमच्या कृष्णाची नगरी आली
हर्ष , उल्हास, मुक्कामी पोहोचल्याचा आनंद आणि कष्टप्रद सफलतेची धन्यता सर्वांमध्ये संचारीत झालं. समोर प्रतीक्षा करत असलेली सर्व मंडळी स्वागताच्या पूर्ण तयारीत, अनेक जन्म उभी असल्याप्रमाणे आणि अचानक आपले आप्तेष्ट, बंधू बांधव, सखे, सोबती, यांना पाहून अक्षरशः मोहरून गेले होते. बलरामाने काही अश्वस्वार आधीच पुढे धाडले होते, आगमनाची पूर्वसूचना द्यायला.
पण त्याही आधी काही निवडक मंत्रीगण, कर्मचारी वर्ग, मजूर आदी पुढे पाठवण्यात आले होते, निश्चित योजनेद्वारे, द्वारका नगरीच्या स्थापने साठी. त्यांच्याकडे खूप मोठं उत्तरदायित्व सोपवण्यात आलं होतं. अगदी सुरवातीला स्थान निश्चिती पासून नगराची योजना करे पर्यंत वासुदेव आणि दादा बलराम हे काही वेळा समवेत वा वेगवेगळे येऊन गेले होतेच. परंतु एकदा योजना सूचनेप्रमाणे सर्वांस समाजावल्यानन्तर प्रत्यक्ष नगरीच्या पहाणीला स्वये यदुवीर येऊन गेला होता. त्यावेळी जी मंडळी आली होती, ती त्यानंतर आपल्या आप्तस्वकीयांना सोडून काही मास नव्हे तर काही वर्षे इथे होती. तद्वत त्यांचा आणि त्यांच्या स्वकीयांचा उत्साह, जल्लोष, हर्ष, आनंद दोन्ही बंधूनी स्वये पाहिला.
माधवाच्या आणि दादाच्या नेत्रातून ते दृश्य पाहून नकळत अश्रू आले, अर्थात हे आनंदाचे भरते होते. ताटातूट झालेले स्वकीय पुनश्च भेट घेत होते. कारण सर्वात पुढे आलेल्या मंडळींमध्ये हाच जनसमुदाय जास्त होता आणि ती ओढ, आतुरता आणि मिलनाचा आनंद आणि उत्साह द्विगुणित करणारा होता. या उत्साहाला एका उत्सवाचा आनंद आणि संचार असल्याचा भास झाला. स्वागतासाठी तयार असलेल्यानी कृष्ण , बलराम, सर्व राणीपरिवार यांचं प्रातिनिधिक पंचारतींनी ओवाळून स्वागत केलं आणि खऱ्या उत्सवाला प्रारंभ झाला.
स्वागतासाठी नगरीच्या मुख्य प्रवेशद्वारी रांगोळ्यांची सजावट, गुढ्या, तोरणं, पताका, ध्वज, दीपमाळा असा सर्व थाटमाट होता. साजसजावट आणि रोषणाई इतकी मनमोहक होती की, द्वारकेहून आलेल्या मंडळींना दीपावलीचा भास झाला. कारण स्वागताचा उत्साह हा वर्षोत्सवाहून देखणा, दिमाखदार आणि भव्य होता. अर्थात कृष्णाच्या तश्या पूर्वसूचना होत्या. हे करण्या मागच अजून एक कारण होत, आलेला जनसमुदाय, हा कित्येक मैलांचा आणि काही दिवसांचा प्रवास करून आलेला असल्यामुळे त्यांचा शीण जाईल इतक उत्साह वर्धक स्वागत व्हायला हवं. हा खास योगेश्वराचा आग्रह होता.
आगतस्वागत झाल्यानंतर कृष्णाने दादाच्या अनुमतीने घोषणा केली की, पुढचे आठ दिवस या नगरीत सर्वांचं बस्तान बसे पर्यंत , भोजनव्यवस्था ही राज्यातर्फे असेल आणि आठही दिवस संपूर्ण द्वारका नगरीत उत्सव साजरा केला जाईल. या काळात सर्व व्यवस्था राज्यातर्फे असेल आणि रोज संध्यासमयाला दिवसभराच्या, घर स्थिर स्थावर करण्याच्या कार्यानंतर, नगरीत नृत्य , गायन, वादन आणि अर्थात रासक्रीडा यांचा जल्लोष असेल. हे ऐकून समस्ताना अत्यानंदाने आणि आपल्या लाडक्या राजाच्या कौतुकाने आनंदाश्रू आले. सर्व जण जय घोष करू लागले.
श्रीबलराम श्रीकृष्ण यांचा विजय असो !!!!!!
श्रीबलराम श्रीकृष्ण यांचा विजय असो !!!!!!
श्रीबलराम श्रीकृष्ण यांचा विजय असो !!!!!!
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment