भोग आणि ईश्वर ३७३ मनाला चंचलता प्रदान करून आणि त्यासह माया व विकार उत्पन्न करून ईश्वराने एकप्रकारे सूत्रबद्ध सापळा रचून त्यामधून, जीवाने बाहेर पडून, सर्व मोह माया, वासना, वाईट विचार व वृत्ती आणि त्याद्वारे उत्पन्न होणारे विकार यांना जिंकत किंवा नियंत्रणात ठेवत, मनाला एका विशिष्ट नादात नेऊन, उच्च पातळीवर घेऊन जायचं. या पातळीवर, मनाला स्थिर करून, तिथे वृत्ती, प्रवृत्ती, वासना आणि इच्छा यांना पूर्ण शून्यावर नेऊन, मन एकाग्र करून, साधन केल्यास, उच्च विद्युत, चुंबकीय, ईश्वरीय सान्निध्याच्या लहरींची अनुभूती घेता येईल आणि त्याद्वारे ईश्वराच्या किंवा ईश्वरी अनुभूतीच्या वा प्रचित्तीच्या समीप राहण्याचा आनंद घेत घेत आपली साधना दृढतेने व आत्मबल जागृत करून, सर्वोच्च पातळीला पोचता येईल. त्या स्थितीत आणि भावात भक्त आणि भगवंत हे दोनच अंश समोरासमोर उरतात. मग एक क्षण असा येतो की, साधकाला आपल्या अस्तित्वाची जाणीव राहात नाही. म्हणजे तिथे फक्त भगवंत शिल्लक राहतो. म्हणजे भूलोकातील ईश्वराचा अंश हा, परम ईश्वरी अंशाशी पूर्ण तादात्म्य पावल्याची अलौकिक आणि अद्भुत जाणीव व अनुभूती, भक्त घेतो....